प्रियांका वाघुले

वडील ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेला चिराग लवकरच पडद्यावर त्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या हिंदी चित्रपटातून चिराग वडिलांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे, अर्थात हा चिरागचा पहिला चित्रपट नाही. त्याने याआधीच मराठी चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले आहे. कलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात वावरत असल्याने फिटनेसशी त्याचे घट्ट नाते आहेच, मात्र हे नाते वडिलांमुळे फार आधीपासून जुळून आले आहे, असे तो सांगतो. किंबहूना, फिटनेस-खेळाच्या बाबतीतच वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालत असल्याचे त्याने सांगितले.

घरातील वातावरण हे खेळाशी संबंधित असल्याने त्याच वातावरणातच लहानाचा मोठा झालेल्या चिरागच्या मनात खेळाला कायमच मोठे स्थान आहे, असे सांगतो. खेळात उत्कृष्टता साधणे हेच त्याचे उद्दिष्ट होते, कारण त्याचा वापर पूर्णपणे आपल्या फिटनेससाठी करून घेता येणे सहज शक्य असल्याचे चिराग सांगतो. फिटनेससाठी खेळ आणि व्यायाम दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे तो सांगतो.

फिटनेसकरता नियमित जिमला जाणे हा पर्याय थोडा बाजूला ठेवून तो  टेनिस हा खेळ प्रामुख्याने खेळत असल्याचे सांगतो. त्याला टेनिसची आवड आहे, त्यामुळे या खेळातून आवडही जपली जाते आणि फिटनेससाठी त्याचा उत्तम फायदा होतो, असे तो म्हणतो. टेनिस हा खेळ आपल्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक विश्वावर ताबा ठेवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे अडचणींना सामोरे जाण्याची आणि त्यांना तोंड देण्याची आपली क्षमता वाढते, असे चिराग म्हणतो.

याशिवाय नित्यनेमाने रनिंगही करत असल्याचे तो सांगतो. व्यायामासाठी मोकळ्या वातावरणात क्रॉसफिट करण्यावर भर देत असल्याचे तो सांगतो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम त्याने समाविष्ट केले आहेत. अर्थात, स्नायू बळकट करण्यासाठी पुलअप्स, पुशअप्स महत्त्वाचे ठरतात. धावण्यामुळे ह्रदयाची क्षमता वाढते, त्यामुळे तेही रोजच्या रोज केले जाते. अशा पद्धतीने प्रत्येक खेळ आणि व्यायामाचा शरीराला होणारा फायदा लक्षात घेऊन रोजचे फिटनेसचे गणित आखले असल्याचेही चिरागने स्पष्ट केले.

viva@expressindia.com