प्रियांका वाघुले

‘बेधडक’, ‘झरी’सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री नम्रता गायकवाडच्या मते मानसिक संतुलन ठेवण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा ठरतो. नित्यनियमित व्यायामाने आपले शरीर ताजेतवाने राहते, अधिक कार्यक्षम होते. आणि त्यामुळे साहजिकच मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे नम्रता सांगते.

फिटनेससाठी नियमित जिममध्ये व्यायाम करणे आणि शक्य होईल त्या वेळी मोकळ्या हवेत चालणे, याला ती प्राधान्य देत असल्याचे सांगते. एखादी गोष्ट सातत्याने करत राहिल्याने त्याचा चांगला परिणाम होतो हे सर्वज्ञात आहे. व्यायामाच्या बाबतीतही ते चपखल लागू पडते. त्यामुळे अगदी नियमित व्यायाम करता आला नाही तरी निदान आठवडय़ातून कमीत कमी तीन दिवस तरी व्यायामाला देणे आवश्यक असते, असे ती सांगते. कलाकार म्हणून काम करत असताना अनेकदा तेही होणे म्हणजे तारेवरची कसरत असल्याचे नम्रता सांगते. अशा वेळेस काहीच न करता आपला दिवस घालवण्यापेक्षा ज्या पद्धतीने व्यायाम जमेल त्या पद्धतीने करण्यावर भर देत असल्याचे तिने सांगितले. वेळ मिळेल तेव्हा मोकळ्या हवेत चालणे हाही फिटनेससाठी रामबाण उपाय आहे. अशा वातावरणात चालताना मन प्रसन्न होते. निसर्ग, हिरवळ ही शांतता आणि समृद्धतेचे प्रतीक असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो. फिट राहण्यासाठी मानसिक स्थैर्य अधिक महत्त्वाचे असते, असेही नम्रता म्हणते.

नियमित किंवा वेळेनुसार व्यायाम करण्याबरोबरच योग्य प्रमाणात आहार घेणे नेहमीच आपल्याला फिट ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे नम्रता म्हणते. आहारात योग्य प्रमाणात प्रथिनांचा समावेश असणेही तिला गरजेचे वाटते. आणि त्यासाठी आवश्यक तेवढय़ा प्रमाणात ते घेण्यावर ती भर देते. योग्य आहार आणि योग्य व्यायाम हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र असल्याचे ती आवर्जून सांगते.

viva@expressindia.com