13 July 2020

News Flash

फिट-नट : सोनाली कुलकर्णी

मी सर्व प्रकारचे व्यायाम हे आठवडय़ातले सातही दिवस करते, असे सांगणाऱ्या सोनालीने या व्यायाम प्रकारांचे काटेकोर नियोजन केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

|| प्रियांका वाघुले

सध्या ‘हिरकणी’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेली प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दररोज वेगवेगळे प्रकारचे व्यायाम करत असल्याचे सांगते. तिच्या रोजच्या फिटनेस लिस्टमध्ये योगा, एरिअल योगा, वेट ट्रेनिंग, कार्डिओ, १० किमी रनिंग, किक बॉक्सिंग यांसारख्या अनेक व्यायाम प्रकारांचा समावेश आहे. मला एकाच प्रकारचा व्यायाम करायला आवडत नाही, कारण एकाच प्रकारचा व्यायाम केल्याने आपल्या शरीराला त्याची सवय होते आणि कुठेतरी त्याचा परिणाम फिटनेसवर होतो, असं ती म्हणते.

मी सर्व प्रकारचे व्यायाम हे आठवडय़ातले सातही दिवस करते, असे सांगणाऱ्या सोनालीने या व्यायाम प्रकारांचे काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्येक व्यायाम प्रकार हा आठवडय़ातील प्रत्येक दिवशी कशा प्रकारे करता येईल, याचा विचार करून विभाजन केले असल्याची माहिती तिने दिली. दररोज एक ते दीड तास व्यायाम मी नित्यनियमाने करते आणि सर्व व्यायाम प्रकार हे मी व्यायाम प्रशिक्षकाच्या सूचनेनुसारच करते, असेही सोनालीने सांगितले.

‘मला फिट राहायला आणि नेहमी व्यायाम करायला खूप आवडतं’, असं ती सांगते. ‘व्यायामामुळे माझं आरोग्य चांगलं राहतं. मला अधिकाधिक काम करण्याची ऊर्जा मिळते. त्याचबरोबर मी अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मला फिटनेसचा खूप फायदा होतो. याचा फायदा मला सिनेमामधील भूमिका साकारतानादेखील होतो. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘हिरकणी’ चित्रपटानंतर आता माझा ‘विक्की वेलिंगकर’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. हा थोडासा थरारपटांमध्ये मोडणारा चित्रपट असल्याने त्यात अ‍ॅक्शनदृश्ये भरपूर आहेत. ही अ‍ॅक्शनदृश्ये चित्रित होताना ती सफाईदारपणे केलेली आहेत, असं वाटणं गरजेचं असतं. आणि म्हणून खास ही दृश्ये साकारताना मला व्यायामाचा खूप फायदा होतो, असं सोनाली सांगते.

सोनाली तिच्या व्यायामाच्या फंडय़ाविषयी सांगते की, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात तरी स्वत:ची काळजी घेणं, स्वत:ला फिट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जिमला जायला जमत नसेल तर योगा करण्यावर भर द्या किंवा काहीच नाही झालं तर तासभर वॉक करा. यामुळे आरोग्य चांगलं राहतं. एवढं प्रत्येकाने दररोज स्वत:साठी नक्कीच केलं पाहिजे. आपलं शरीर हे मंदिरासारखं आहे. त्याची पूजा करताना त्याला लागणारा आहार आणि व्यायाम देणं हे खूप गरजेचं असतं, असं ती आग्रहाने सांगते.

सोनाली प्रत्येक व्यायाम हा प्रशिक्षकाच्या सूचनेनुसारच करते, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणं खूप गरजेचं आहे, असं ती म्हणते. किक बॉक्सिंग, एरिअल योगा आणि यासारखे व्यायाम प्रकार हे प्रशिक्षकाच्या सूचनेनुसारच करायला हवेत. एरिअल योगा हा मल्लखांबासारखाच प्रकार आहे. ती म्हणते, प्रत्येकाने कोणताही नवीन व्यायाम करताना तो प्रशिक्षकाच्या सूचनेनुसारच करावा, कारण साधं वेट उचलतानादेखील ते नेमकं कसं उचलावं आणि किती वेळा व्यायाम प्रकार करावेत हे समजून घेणं गरजेचं असतं. त्या व्यायाम प्रकाराचा नक्की फायदा तुमच्या शरीराच्या कोणत्या भागाला होणार आहे, हे लक्षात घेऊन ते करावे लागतात. अन्यथा, एखादा स्नायू दुखावला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे फिटनेस सांभाळताना त्यासाठी काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने करायचा या सर्व बाबी खूप महत्त्वाच्या असतात. ते लक्षात घेऊनच व्यायाम करा, असं आवाहन सोनालीने तरुणाईला के लं.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:56 am

Web Title: fit artist sonalee kulkarni abn 97
Next Stories
1 जगाच्या पाटीवर : ‘विदा’कारण
2 डिझायनर मंत्रा : फॅशनचा नवा चेहरा
3 शेफखाना : इन्स्टाग्रामची फुडी दुनिया
Just Now!
X