प्रियांका वाघुले

‘युथ’सारख्या मराठी चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण करणाऱ्या तुषार मानेच्या मते कलाकारामध्ये नेहमीच दुहेरी ऊर्जा असावी लागते. एकाच वेळी तो पडद्यावर त्याच्या वाटय़ाला आलेली भूमिका रंगवत असतो आणि त्याच वेळी वास्तवातही त्याचा संघर्ष सुरू असतो. या दोन्हींचा मेळ घालण्यासाठी त्याला साहजिकच इतरांपेक्षा जास्त ऊर्जा अंगात असावी लागते. सातत्याने काही तासांची शिफ्ट सांभाळून चित्रपट-मालिकेत काम करताना हवी असणारी ऊर्जा आणि उत्साह मिळवण्यासाठी फिटनेसच महत्त्वाचा ठरतो, असं तुषार म्हणतो.

कलाकाराला त्याची ऊर्जाही कायम ठेवावी लागते, त्याचबरोबरीने आपली देहबोली आकर्षक ठेवणे तसेच वेळेनुसार त्यात काही बदल घडवून आणणेही गरजेचे असते. यासाठी जी शारीर मेहनत घ्यावी लागते त्याचे सकारात्मक परिणाम शरीरावर आणि मनावर होतात. किंबहुना, मन आनंदी राहण्यासाठी ही शारीर मेहनत आवश्यक असते, असं तुषार म्हणतो. कोणताही अतिरेक न करता आपल्या शरीराची गरज आणि क्षमता लक्षात घेऊन व्यायाम करायला हवा, असे तो म्हणतो.

जिममध्ये कार्डिओबरोबरच शक्य असेल तसे सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत चालण्याला, धावण्याला वेळ देत असल्याचे तो सांगतो. त्याचबरोबर जिममध्ये वेट ट्रेनिंगही तो नियमितपणे करतो. वेट ट्रेनिंगमध्ये हिप थ्रस्ट, डेडलिफ्ट, शोल्डर प्रेस, स्प्लिट स्क्वॉटसारख्या व्यायाम प्रकारांचा यात समावेश केलेला आहे, असे त्याने सांगितले. व्यायामाला योग्य त्या आहाराचीही जोड द्यावी लागते, असे तो आवर्जून सांगतो. रोजच्या फिटनेस प्रकारांनुसार तुषार कार्ब्सचे प्रमाण हे कमी-जास्त करत असल्याचे सांगतो. कारण मंदगतीने, कमी मेहनत घेणाऱ्या शरीरात जास्त कार्ब्स घेतले गेले तर शरीरातील मेद वाढून आपली शारीरिक स्थिती मंदावते आणि एकंदरीत माणसाची हालचालेही कमी होते. त्यामुळे फिट राहण्यासाठी व्यायाम आणि आहार या दोन्हींचा समतोल राखण्यासाठी मनापासून मी प्रयत्न करतो, असं तो म्हणतो.

सतत नवीन गोष्टी स्वीकारण्यासाठी, सक्षम राहण्यासाठी व्यायामाचा फायदा होत असल्याचे तो सांगतो. फिटनेस शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याने आपल्या व्यायामात खंड पडू नये म्हणूनही सातत्याने प्रयत्न करत असल्याचे तुषारने सांगितले.

viva@expressindia.com