07 December 2019

News Flash

फिट-नट : विशाल निकम

साताऱ्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण सुरू आहे तिथेच जवळपासच्या गावी त्याने जिम शोधून काढली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रियांका वाघुले

‘साता जल्माच्या गाठी’ या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील मालिकेमधून नुकताच आपल्या समोर आलेला अभिनेता विशाल निकमचा फिटनेस पाहताक्षणी लक्षात येतो. या मालिकेचे चित्रीकरण सध्या साताऱ्यात सुरू आहे. त्यामुळे आपला फिटनेस सांभाळण्याची कसरत चित्रीकरण सुरू असतानाही करावी लागत असल्याने सेटवर नाना शकला लढवत व्यायामासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असल्याचे विशाल सांगतो. त्याच्या धडपडीचे किस्से ऐकून हसूही येते, मात्र त्याच्या मेहनतीला दादही द्यावीशी वाटते.

साताऱ्यामध्ये ज्या ठिकाणी त्याचं चित्रीकरण सुरू आहे तिथेच जवळपासच्या गावी त्याने जिम शोधून काढली आहे. मालिकेत निवड झाली तरी फिटनेसचं गणित सांभाळणं हे अवघड प्रकरण वाटत होतं, पण नियमित व्यायाम करणं ही गरज असल्याने इथे आल्यानंतर पहिल्यांदा जिम शोधमोहीम हाती घेत त्याने गावातली ही जिम शोधून काढल्याची माहिती दिली.

अर्थात, गावात जिम असल्याने तिथले सगळे व्यवहार हे बऱ्यापैकी संध्याकाळी लवकर संपतात. मात्र चित्रीकरण खूप वेळ सुरू असतं. त्यामुळे चित्रीकरणानंतर जिममध्ये जाता यावं यासाठी जिमच्या मालकाला विनंती करून त्यांच्याकडून चावीच घेऊन ठेवली असल्याचे विशाल सांगतो.

वेळ मिळेल तसं जिममध्ये व्यायाम करणं. सेटवर असलेल्या गोष्टींचा पुरेपूर फायदा करून घेणं, या गोष्टी विशाल करत असल्याचे सांगतो.

विशालने मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणही घेतले असल्याने तो ते प्रामुख्याने करतो. शिवाय, लाठीचा खेळ करत असल्याची माहिती त्याने दिली. लाठी घेऊन व्यायाम करण्याचा प्रकार हा ऐकायला थोडासा विचित्र वाटला तरी यामध्ये शरीराचा पुरेपूर वापर करावा लागत असल्याने त्याचा शरीराला फायदा होत असल्याचे तो सांगतो. स्वत:च्या संरक्षणाबरोबरच शरीराची हालचालही योग्य पद्धतीने होत असल्याने विशाल सेटवरदेखील वेळ मिळेल तेव्हा हा लाठीचा खेळ करत असल्याचे सांगतो. फिटनेस राखण्यासाठी केवळ अत्याधुनिक जिम आणि तिथल्या मशीनच हव्यात असे काही नाही. उलट, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वापरूनही व्यायाम करू शकता, याकडेही त्याने लक्ष वेधलं.

First Published on November 1, 2019 1:36 am

Web Title: fit artist vishal nikam abn 97
Just Now!
X