गायत्री हसबनीस

रोजच्या घाईगडबडीत फिटनेस योग्य पद्धतीने कसा जोपासता येईल याच्या शोधात आपण असतो. आपल्या फिटनेसने सर्वाना मोहित करणारा आणि त्यासाठी आदर्श असलेला आघाडीचा अभिनेता, सुपरमॉडेल मिलिंद सोमण याच्याकडून फिटनेस फंडे जाणून घेण्याचा हा प्रयत्न. लॉकडाऊनच्या या काळात निश्चितच फिटनेस छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून जोपासत आपली जीवनशैली उंचावण्याच्या दृष्टीने आपल्याला निश्चित पावलं उचलता येतील.

स्पोर्ट्स आणि फिटनेसचं समीकरण पक्कं जमवणाऱ्या मिलिंदला यासाठीची प्रेरणा कु ठून मिळते? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. ‘आज कुठल्याही क्षेत्रात भरपूर प्रेरणादायी उदाहरणं सापडतील. आपण आपल्या प्रेरणेचा शोध घ्यायला हवा. माझ्या आईला तिच्या वयाच्या ८१ व्या वर्षी पुश—अप्स आणि प्लॅक करताना पाहणं हे माझ्यासमोरचं प्रेरणादायी उदाहरण आहे. आज कित्येक लोक  त्यांच्यात असणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत त्यातूूूनच एक वेगळी प्रेरणा प्राप्त करतायेत. याचे उदाहरण आज आजूबाजूला असलेल्या अंध धावपटू आणि अपंग गिर्यारोहकांकडे पाहून लक्षात येईल. मला प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधता येतो आणि त्यांचा हा संघर्ष प्रेरणादायीच असतो’, असे सांगतानाच प्रेरणा ही आपल्या आजूबाजूलाच असते, आपण तसं आपल्या सभोवताली सजगपणे पाहणं गरजेचे आहे, असं मिलिंद म्हणतो.

मॉडेलिंग, मॅरेथॉन आणि अभिनय अशा सर्वच क्षेत्रांत असूनही मिलिंदचा फिटनेस मात्र वाखाणण्याजोगा आहे. फिटनेससाठी नक्कीच तो व्यायाम आणि डाएटवर भर देतो. तो स्वत: आपले प्रोफेशनल काम आणि डाएट यात योग्य समतोल राखून आहे. त्याच्या मते डाएट करताना पौष्टिक गुणधर्माच्या आहारावर भर द्यायला हवा आणि तिन्ही वेळा म्हणजे न्याहरी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यात योग्य आहाराचे प्रमाण ठरवले पाहिजे. तसेच बदामासारखा सुकामेवा दिवसभरात क धीतरी पोटात जायला हवा कारण त्यात मोनोअनसॅच्यूरेटेड फॅट्स असतात ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहते. ‘रोज आपल्या जेवणाच्या तिन्ही वेळेला मी किती खावं याचं प्रमाण आखून ठेवलं आहे. मी रोज एक फंडा फॉलो करतो म्हणजे दुपारचे जेवण मी मध्यम प्रमाणात ठेवतो, माझे रात्रीचे जेवण अगदीच कमी असते, पण माझा नाश्ता मात्र मी भरपूर प्रमाणात करतो. कामाच्या वेळी मी माझ्या जेवणाचे वर म्हटल्याप्रमाणे तीन विभाग केले आहेत. माझ्या ‘वर्क डे’ची सुरुवात भरपूर नाश्त्याने होते ज्यात मी फळं खूप जास्त खातो. दिवसभरात मी मध्ये मध्ये कमी पण पोषक आहार घेतो, ज्यात सुकामेव्याचा समावेश आहे. प्रामुख्याने प्रोटीन, मॅग्नेशियम, रायबोफ्लेविन आणि फायबर यांचे संतुलित प्रमाण असलेल्या बदामाचे सेवन मी रोज करतो,’ अशी माहिती त्याने दिली. रूटीन लाइफमध्ये डाएट फॉलो करण्याबद्दलदेखील मिलिंदने कोणतेही कडक नियम बांधून घेतलेले नाहीत. पण आपल्या डाएटमध्ये मात्र तो शिस्त पाळतो. मिलिंद डाएट पाळताना अगदी साधं, मूलभूत आणि निरोगी डाएट फॉलो करतो. त्याला भारतीय जेवण प्रचंड आवडतं. खासकरून घरगुती खिचडी. त्याच्या खिचडीची रेसीपी म्हणजे १/३ वाटी भात आणि उरलेलं भाज्यांचे मिश्रण. तो सर्वात जास्त प्रमाणात रताळं खातो. सुरण आणि टॅपिओका यांचा त्याने त्याच्या डाएटमध्ये समावेश केला आहे. (टॅपिओका हा एक उत्तम पिष्टमय आणि पौष्टिक पदार्थ आहे. जो साधारणपणे साबुदाण्यासारखा दिसतो) तसेच त्याच्या जेवणात तो अनपॉलिश्ड ग्रेन्सचा वापर करतो ज्यात भात आणि गहू असतात आणि मिलेट्स म्हणजे बाजरी आणि नाचणी यांपासून तयार केलेले पदार्थ त्याने त्याच्या डाएटमध्ये समाविष्ट केले आहेत. बकरीच्या दुधापासून बनवलेले चीझ, दही आणि बटरमिल्क याबाबतीत तो आग्रही असतो, असे त्याने सांगितले. आहाराविषयी अधिक सविस्तरपणे बोलताना तो म्हणतो, ‘मी सकाळी उठून बदामाचे सेवन तर करतोच पण त्याचबरोबर मी कोमट पाणी पितो’.

‘खरंतर प्रत्येकाने आपलं शरीर आणि मनाची परस्परसंबंध बांधलेली गाठ लक्षात घ्यायला हवी’,  असे तो म्हणतो. कारण शेवटी आपलं मन आणि शरीर हे एकमेकांवर अवलंबून आहे. या दोहोंची क्रिया आपण समजून घ्यायला हवी. मी स्वत: भरपूर किलोमीटर धावतो.  धावल्यामुळे माझ्या स्वभावात एक कमालीचा कूलनेस येतो. मी सतत वेगवेगळ्या आऊटडोअर स्पोर्ट्समध्ये सहभागी असतो आणि माझा सहभाग हा अशा क्रियांमध्ये असतो ज्यात माझ्या सहनशीलतेची कसोटी लागेल, कारण त्यामुळे माझ्या मनाला नवचैतन्य मिळते, असे मिलिंद सांगतो.

मला तरुण पिढीलाही हेच सांगायचे आहे की फिटनेसबाबतीत घाई करू नका. हळूहळू आणि स्थिर विचाराने पुढे जा. तरच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. स्पर्धा स्वत:शी करा. इतरांशी करू नका, खास करून फिटनेसबाबतीत मुळीच नाही.  स्वत:ची गती लक्षात घ्या. तिथेही घाई करू नका. पेशन्स खूप महत्त्वाचा आहे,’ असं मिलिंद आवर्जून सांगतो. फिटनेस फ्रिक असणाऱ्या तरुण पिढीला, विद्यार्थ्यांंना मिलिंदचे सकारात्मक बोल नक्कीच उपयुक्त ठरतील.

आपल्या दैनंदिन आयुष्यात कितीही कामं आली तरीही आरोग्याचा विचार पहिला करणं अत्यंत गरजेचं आहे. झोप, निरोगी आहार आणि सतत अ‍ॅक्टिव्ह राहणं हेच फिटनेसचं रहस्य आहे. तसेच चांगल्या सवयींचा अवलंब करणे म्हणजेच आपले जीवन आनंदमय आणि सुखमय जगणे आहे. 

मिलिंद सोमण

viva@expressindia.com