News Flash

वस्त्रांकित : लोकसाहित्य आणि वस्त्र परंपरा

महाराष्ट्राच्या पैठणीला शेकडो वर्षांंची परंपरा आहे. पैठणी ही एक प्रकारे महाराष्ट्राची ओळख आहे,

विनय नारकर

लोकसाहित्य हे समाजमनाचा आरसा असतं, असं नेहमी म्हटलं जातं. लोकसाहित्यातील कलागुणांचीही चर्चा होते. अनेक अभ्यासकांनी त्याबाबत आपली बरी-वाईट मते नोंदवून ठेवली आहेत. या लोकसाहित्याला या पलीकडे जाऊन वेगळे असे महत्त्व आहे.

आपल्या वस्त्र परंपरा आपल्याला माहिती करून घ्यायच्या असतील तर कोणकोणती साधने उपलब्ध आहेत? आपण संग्रहालयात जाऊन तिथली निवडक वस्त्रे पाहू शकतो, काही पुस्तकांमधून त्रोटक लिखाण वाचू शकतो, काही जुन्याजाणत्या लोकांकडून माहिती करून घेऊ शकतो. या सगळ्या पर्यायांचा आधार घेऊनही आपल्या वस्त्र परंपरेचं एक चित्र आपल्या मनासमोर साकारत नाही. काही वस्त्रांची ओळख होते, एवढंच. संग्रहालयात आपल्याला काही निवडक वस्त्रे पाहायला मिळतात. बहुतेकदा ही वस्त्रे संग्रहमूल्य असणारी असतात. त्यातल्या विशेष कारागिरीसाठी ती जतन केली जातात. या वस्त्रांमुळे आपल्याला आधीच्या पिढय़ांनी वस्त्रकलेत गाठलेली उंची पाहायला मिळते, पण समाजात रूढ असलेल्या वस्त्र संस्कृतीचे दर्शन होत नाही. अशा ठेवणीतल्या वस्त्रांनी समाजातील अभिजन संस्कृतीचेच बहुतेक वेळा दर्शन होते.

महाराष्ट्राच्या वस्त्र संस्कृतीबाबतही हेच होत आले आहे. महाराष्ट्राच्या पैठणीला शेकडो वर्षांंची परंपरा आहे. पैठणी ही एक प्रकारे महाराष्ट्राची ओळख आहे, परंतु पैठणी ही नेहमी अभिजनांचीच ओळख राहिली आहे. अभिजनांसाठी ही पैठणी विशेष प्रसंगासाठीच असायची. असे असताना महाराष्ट्र म्हटलं की फक्त पैठणीचाच उल्लेख होतो. महाराष्ट्राच्या साडय़ा म्हणून आणखी एखाददुसऱ्या साडीचं नाव घेतलं जातं, पण यातून महाराष्ट्राच्या वस्त्र संस्कृतीबद्दल कल्पना येत नाही.

जनमानसांत वस्त्रांबद्दलच्या काय भावना असायच्या, कोणती वस्त्रं कधी नेसली जायची, कोणती वस्त्रं जास्त प्रिय होती, वस्त्रांच्या रंगांबद्दल काय संकेत होते, कोणत्या साडय़ा प्रचलित होत्या, निरनिराळ्या प्रकारची वस्त्रं कुठे विणली जायची, त्यांच्या बाजारपेठा कोणत्या होत्या?  या सगळ्या बाबी आपल्याला कुठून समजू शकतात? ही सगळ्या बाबींनी बनणारी वस्त्रांसंबंधी लोकसंस्कृती, म्हणजेच ‘वस्त्रसंस्कृती’ जाणून घेण्यासाठीचे सगळ्यात महत्त्वाचे साधन हे आपले लोकसाहित्य हेच आहे. आपल्या लोकसाहित्यात अगदी सहजपणे या सर्व बाबी प्रतिबिंबित झाल्या आहेत.  लोकसाहित्य हे सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाचे साधनसाहित्य आहे, याची जाणीव आपल्या समाजामध्ये नाही आहे, अशी खंत नरहर कुरुंदकर यांनीही व्यक्त केली होती. ते असेही म्हणतात की ओवी साहित्याबाबत हे फार होते. कुरुंदकर पुढे म्हणतात, संस्कृतीचे धागेदोरे, परंपरेचे विस्कळीत पदर हुडकून काढण्याचे हे साधनसाहित्य आहे. लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे ज्या समाजाचे ते साहित्य असेल त्या समाजाच्या सांस्कृतिक समजुतींचा, श्रद्धांचा, रूढींचा व जीवनावर नियंत्रण करणाऱ्या घटकांचा अभ्यास आहे.

लोकसाहित्याची व्याख्या करताना कुरुंदकर म्हणतात, ‘सांस्कृतिक संचिताच्या माहितीसाठी जे उपयोगी पडते ते लोकसाहित्य. हे सांस्कृतिक संचित म्हणजे, समाजातील श्रद्धा, चालीरीती आणि संकेत. या बाबींचा अभ्यास हेच लोकसाहित्याचे अभ्यास क्षेत्र आहे’. वस्त्रांबद्दलचे संकेत आणि प्रथा हे आपल्या समाजाचे असेच संचित आहे. आपल्या समाजात नजीकच्या भूतकाळात अस्तित्वात असलेल्या वस्त्र परंपरा आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी लोकसाहित्य, विशेषत: ओवी साहित्य हे अतिशय उपयोगी आहे हे माझ्या लक्षात आले. कुरुंदकरांनी लोकसाहित्याचे महत्त्व ठरवताना, असे साहित्य सांस्कृतिक संचयावर प्रकाश टाकण्यास कुठवर उपयुक्त होते यावर आहे असे प्रतिपादन केले आहे. माझ्या मते या निकषावर ओवी साहित्य हे तंतोतंत उतरते.

मराठी साहित्यात जिथे जिथे वस्त्रांचे उल्लेख आले आहेत ते साहित्य बहुतांशी स्त्री लेखिकांचे आहे. वस्त्रे ही जास्त करून स्त्रियांच्या आपुलकीचा भाग असतात. साडय़ा आणि काही अन्य वस्त्रेही बहुतेकदा स्त्रियांच्या भावविश्वाचा भाग असतात. दुर्गा भागवत, शांता शेळके, इंदिरा संत यांच्या साहित्यांमधून वस्त्र प्रतिमांची लोभस पखरण दिसून येते. काही वेळेस वस्त्र परंपरांबद्दल माहितीही मिळते. पुरुष साहित्यिकांच्या कामामधून अशी माहिती फारशी मिळत नाही, निदान माझ्या वाचण्यात तरी फारसं आलं नाही आहे. ओवी साहित्य हे तर प्रामुख्याने स्त्रियांनी घडवलेलं असल्याने त्यामधून तर समाजातील वस्त्र संस्कृती लालित्यपूर्ण पद्धतीने उलगडत जाते.

शतकापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात कित्येक वस्त्र परंपरा, वस्त्र प्रकार अस्तित्वात होते. त्यातील काही परंपरा तर कमीत कमी सातशे—आठशे वर्षे जुन्या होत्या. गेल्या एका शतकात त्या जवळपास संपून गेल्या. समाजमनाच्या एवढय़ा जिव्हाळ्याच्या असूनही या परंपरा संपून गेल्या. या वस्त्र परंपरांचं नीटसं दस्तऐवजीकरणही केलं गेलं नाही आहे. हे दस्तऐवजीकरण आपल्याला लोकसाहित्यामध्येच सापडते. ओव्यांमध्ये, वेगवेगळ्या सणांच्या व सोहळ्यांच्या गीतांमध्ये, लावण्यांमध्ये, गौळणींमध्ये हे दस्तऐवजीकरण आपल्याला पहायला मिळते. वस्त्र परंपरांचा इतिहास समजून घेण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून लोकसाहित्याकडे पाहिले पाहिजे. आणि हे दस्तऐवजीकरण केवळ यांत्रिक नाही आहे, या वस्त्र परंपरांना, वस्त्र प्रकारांना साजेसा लहेजा या गीतांमध्ये आहे.

चंद्रकळा ही खास मराठी साडी. महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेतील, मराठी स्त्रियांच्या मनातील हळवा कोपरा म्हणजे चंद्रकळा. सातशे—आठशे वर्षांंपूर्वीच्या काळाला आपल्याशी जोडणारा दुवा म्हणजे चंद्रकळा. मराठी स्त्रियांच्या भावविश्वात इतकी वर्षे अढळ स्थान असणारी साडी म्हणजे चंद्रकळा. अशी महत्त्वाची वस्त्र परंपरा गेल्या शतकात संपून गेली. या किंवा अन्य वस्त्र परंपरा नष्ट झाल्या याच्या कारणांचा ऊहापोह आपण अन्य लेखात करू. प्रभावी लोकाश्रय असलेली ही साडी होती तरी कशी? ती दिसायची कशी? ती कोणत्या रंगांमध्ये बनायची? तिचे स्वरूप काय होते? तिचे काठ कसे होते? पदर कसा होता? नक्षी काय होती? कुठे विणली जायची? कोणत्या बाजारपेठेत मिळायची? किंमत काय होती? कोणत्या प्रसंगी चंद्रकळा नेसली जायची? मुळात चंद्रकळा म्हणजे काय? हे नाव कसे पडले?, हे सगळे प्रश्न केवळ वस्त्र प्रकाराबद्दलचे नाहीत. या सगळ्या बाबींमधून आपल्या समाजाच्या सांस्कृतिक समजुतींवर आणि सौंदर्यदृष्टी यावर प्रकाश पडतो. आपलं सांस्कृतिक संचित काय आहे हे समजून घ्यायला मदत होते. आपल्या समाजाची सौंदर्यदृष्टी आपल्या वस्त्र परंपरेतूनही प्रतिबिंबित झालेली असते.

क्रमश:

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:16 am

Web Title: folklore and textile tradition zws 70
Next Stories
1 नावातच ‘युजर’आहे!
2 केक आणि बरंच काही…
3 सदा सर्वदा स्टार्टअप : दृष्टिकोन गुंतवणूकदारांचा
Just Now!
X