दरवर्षी रमजानचा महिना सुरू झाला की, मुंबईतल्या अस्सल खवय्यांची पावले दक्षिण मुंबईतील मोहम्मद अली रोडकडे वळू लागतात. संध्याकाळी या रस्त्यावर खवय्यांचा स्वर्ग फुलतो. मात्र शाकाहारींसाठी येथे फक्त इरानी फिरनी, अफलातून किंवा तत्सम पदार्थावरच भागवावे लागेल, हे देखील लक्षात असू द्या.
खाऊचे पैसे किंवा शुद्ध मराठीत सांगायचं, तर पॉकेटमनी ही समस्या सगळ्याच मुलांना भेडसावत असतेच. मग ते उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेजचे विद्यार्थी असोत की साध्यासुध्या कॉलेजचे. खिशात शंभराच्या आतबाहेरच्या नोटा आणि बरोबर भलीमोठी गँग अशा समस्येत असाल, तर तुम्हाला मदत करायला हा ‘खाबू मोशाय’ एकदम तत्पर आहे. ‘खाबुगिरी’ करायला वयाची अट नाही. फक्त खिशात थोडे पैसे आणि बरोबर बराचसा वेळ ठेवून निघायला हवं. कॉलेज विश्वातल्या तमाम कडकीबहाद्दर खवय्यांसाठी खास जॉइंट्स सांगणारा हा नवा कॉलम.
संगीताच्या दुनियेत तानसेनांप्रमाणेच अस्सल ‘कानसेन’ही महत्त्वाचे असतात. हे ‘कानसेन’ उत्तमातले उत्तम गाणे ऐकण्यासाठी एखाद्या कोठय़ाची पायरी चढायलाही कमी करत नाहीत. किंबहुना त्यांच्या रसिकतेमुळेच गाणे जास्त खुलते. संगीतातील ‘कानसेनां’सारखेच खाबुगिरीची दुनिया अलम जगतात रोशन करणारे ‘खानसेन’ही महत्त्वाचे आहेत. हे ‘खानसेन’ उत्तमातला उत्तम जिन्नस खाण्यासाठी कोणत्याही खड्डय़ात उतरायला तयार असतात. तर आजचा फेरफटका अशा ‘खानसेनां’साठी आहे.
दक्षिण मुंबईतून ठाण्याकडे जाण्यासाठी निघाल्यावर जेजे फ्लायओव्हर सुरू होतो. इतर वेळी त्या फ्लायओव्हरवरून जाण्यासाठी अगदी बाइकवालेही नियम मोडायला तयार असतात. मात्र रमजान सुरू झाला की, काही गाडीवाल्यांना या फ्लायओव्हरखालूनच गाडी नेण्यात प्रचंड रस असतो. याचे मुख्य कारण म्हणजे मोहम्मद अली रोडवर लागणारे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स! इतर कोणत्याही वेळी या रस्त्यावर गाडी टाकण्याचे दिव्य न करणारी माणसे या दिवसांत, खरे म्हणजे रात्रींत बिनधास्त आपल्या गाडय़ा इथे वळवतात.
मोहम्मद अली रोडला गाडी लागली की, उजव्या बाजूला झकेरिया मस्जिद नावाची एक मस्जिद दिसते. ती मस्जिद येण्याआधीच बाजूच्या गल्लीत लागलेल्या खाण्याच्या स्टॉल्सवरील पदार्थाचा गंध तुमच्या नाकापर्यंत पोहोचलेला असतो. मग पार्किंगसाठी जागा शोधत एकदाची गाडी लावलीत की, मग भटकंती करायला मोकळे झालात. या रस्त्याने गाडी न आणण्याचा शहाणपणा केलात, तर जिंकलात!
सगळ्याच ‘खानसेनां’ना एक गोष्ट सांगणे खाबू मोशायचे कर्तव्य आहे. गणपती विसर्जनाच्या गर्दीतील धक्के खाण्याची सवय नसेल, तर मोहम्मद अली रोडवरच्या स्वर्गाच्या वाटेला जाऊच नका. दुसऱ्याला धक्का न देता चालणे केवळ अशक्य असते. झकेरिया मस्जिदच्या बाजूच्या गल्लीत शिरलात की, स्वर्ग अगदी दोनच बोटे उरला म्हणून समजा. स्वर्गात सर्वात पहिले चित्रगुप्त वगैरे मंडळी भेटतात. मग छोटय़ामोठय़ा देवांचे दर्शन होते, मग इंद्र वगैरे मंचावर बसलेले दिसतात आणि सर्वात शेवटी इंद्र दरबारातील अप्सरांचे दर्शन होते. याच न्यायाने मोहम्मद अली रोडवरच्या या स्वर्गात सुरुवातीला शोर्मा, फिरनी वगैरे चित्रगुप्त व छोटय़ामोठय़ा देवांची पाले लागतात. त्याच्या पुढे खजुरादी इंद्र दिसतात आणि त्याच्या पुढे चिकन तंदुरी, बैदा रोटी, मटण रोल्स, रोटी, चिकन मोगलाई आदी अप्सरांचे विभ्रम जिव्हेला भूरळ पाडतात.
खूपच भूक लागली असेल, तर शोर्मा नावाच्या पदार्थाने सुरुवात करता येऊ शकते. एका उभ्या सळीला भरपूर चिकन गुंडाळले असते. हे चिकन सतत गरम राहील, अशी व्यवस्था केलेली असते. हे चिकन पोळीसारख्या एका गोलाकार वस्तूमध्ये गुंडाळून, मसाला वगैरे टाकून देतात. दुबई वगैरे आखाती देशांमध्ये हा पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे. हा शोर्मा इथे फक्त २० रुपयांत मिळतो. शोम्र्यानंतर मटण रोल्स उडवायचे असतील, तर थोडे पुढे सरका! मटण रोल्स आणि बैदा रोटी वगैरे पदार्थ टेस्टी तर आहेतच पण अगदी स्वस्तातही मिळतात. ४० ते ६० रुपयांत हा ऐवज तुमच्या पोटी जाऊ शकतो.
त्यानंतर मग मेनकोर्सची वेळ येते. इतर वेळी या रस्त्यावर खूप मोकळी जागा असते. मात्र रमजानच्या दिवसांत इथेच तात्पुरत्या कनाती टाकून टेबले मांडलेली असतात. त्या टेबलांभोवती बसून सर्व वयोगटातील माणसे समोरच्या चविष्ट पदार्थावर यथेच्छ ताव मारत तृप्त होताना बघणेही खूप आल्हाददायक असते. मग इथे अगदी चिकन तंदूरीपासून, बटर चिकन, चिकन मोगलाई, चिकन भूना, दाल गोश्त असे पदार्थ, रोटी, बिर्याणी असे जेवण मिळते. या सर्वाची किंमत फार नसते. म्हणजे अर्धी चिकन तंदुरी १२०-१५० रुपयांपर्यंत मिळते. तर चिकन भूना, बटर चिकन वगैरे पदार्थही याच किमतीत मिळतात. मात्र या पदार्थाची क्वाण्टिटी तीन-चार जणांना पुरेल एवढी असते. पण यातच भूक भागवू नका. कारण त्याच्यानंतरही अनेक पदार्थ खाण्यासारखे आहेत.
गोड खाण्याचे शौकीन असाल, तर मोहम्मद अली रोडवर रमजानच्या काळात मिळणारी इरानी फिरनी खायलाच हवी. मँगो, स्ट्रॉबेरी आणि साधी अशा तीन फ्लेवरमध्ये मिळणारी ही फिरनी मातीच्या वाडग्यातून देतात. या वाडग्यामुळे तर फिरनीच्या चवीला चार चाँद लागतात. फिरनीशिवाय अफलातून नावाचा एक महा तुपकट गोड चॉकलेटसदृश पदार्थ मिळतो. सातारच्या कंदी पेढय़ांच्या धाटणीचा हा पदार्थ असतो मात्र खरेच अफलातून! त्याचबरोबर सांदण नावाचाही एक प्रकार खायलाच हवा. तांदळापासून बनवलेली खीर वाटीत भरून ती वाटी तब्बल तासभर बर्फात ठेवतात आणि हा पदार्थ बनतो. त्या खिरीवर असलेली बदाम, चेरी आणि पिस्त्याची पखरणच जास्त भाव खाऊन जाते. त्याशिवाय हे सर्व पदार्थ ५० रुपयांच्या आतबाहेरचेच आहेत.
तुम्ही उच्च श्रेणीतील खानसेन असाल, तर खाबू मोशाय तुम्हाला एक पदार्थ जरूर चाखून बघायला सांगेल. हा पदार्थ म्हणजे मालपोवा! बासुंदीमध्ये अंडे फेटून तो जिन्नस तुपात तळल्यावर मालपोवा हा पदार्थ तयार होतो. भटूऱ्याच्या आकाराच्या मालपोव्यावर रबडी घालून लोक चापतात. खाबू मोशाय एवढा पट्टीचा खाणारा, पण त्यालाही हा प्रकार घशाखाली उतरला नाही. पण ज्या अर्थी लोक चवीने खातात, त्या अर्थी खाबू मोशायचीच जीभ तयारीची नसावी!
खाबुगिरी झाली की, पचनासाठी थोडा फेरफटका मारायलाही हरकत नाही. या फेरफटक्यात खजुरांची दुकाने तर खूपच दिसतात. येथे भारतीय, इराण, दुबई, जॉर्डन अशा अनेक देशांमधील खजुर विक्रीसाठी असतो. त्याची किंमत १२० रुपये किलोपासून १५०० रुपये किलोपर्यंत असते. खाबू मोशायने इराणचा २०० रुपये किलो या किमतीचा एक खजूर तोंडात टाकला आणि काही कळायच्या आतच तो विरघळला! १५०० रुपये किमतीचा खजूर म्हणजे लोणीच असणार, याबाबत खाबू मोशायला एकदम खात्रीच आहे.
रमजानच्या काळात मोहम्मद अली रोडवर एक अख्खी संस्कृती रात्रभर जितीजागतीअसते. मुलींच्या हिजाब, नकाबपासून ते मुलांच्या डोक्यावरील कोरीव काम केलेली टोपी, चकचकीत चपलांपासून ते उंची अत्तरांपर्यंत अनेक वस्तू या रस्त्यावरच्या पालांमध्ये मिळतात. एक वेगळेच रसरसलेपण या वातावरणात असते. इतर वेळी या संपूर्ण भिन्न संस्कृतीशी पडदा ठेवणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना या संस्कृतीची एक सैर घडवण्याचे सामथ्र्य इरानी फिरनी, दाल गोश्त, शोर्मा, सांदण आणि मालपोवा या वरवर निर्जीव वाटणाऱ्या पदार्थात नक्कीच आहे.

IPL 2024 : विजयी पुनरागमनाचे गुजरातचे लक्ष्य
Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
All three parties in mahayuti are fighting for Nashik Lok Sabha seat
भुजबळ मुंबईत तर, गोडसे दिल्लीत… इच्छुकांची पडद्याआडून मोर्चेबांधणी
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी