डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना!

गेले काही दिवस सारखं तोंड येतंय. पुन्हा आईला सांगितलं, तर ती माझ्या खाण्याच्या सवयींवर घसरणार म्हणून सांगत नव्हते. पण परवा अतीच झोंबायला लागलं तोंडात. शेवटी आईला सांगायला गेलेच- ‘आई, अगं सारखे तोंडाला फोड कशामुळे येतात? तोंडाला चवही नाहीये. सारखे पाय दुखताहेत.’ गेले तीन-चार महिने मी अधूनमधून एकेक करत आईला हे सांगत होते, पण तोंडाच्या निमित्ताने सगळं एकदम सांगितलं. आई मला म्हणाली, ‘अगं, जरा नीट खा. नीट पाणी पी. सुकामेवा खा आणि मुख्य म्हणजे भरपूर व्यायाम कर. म्हणजे तुला असं होणार नाही.’ पण तीन महिने हेच चाललं होतं. वांगं मी खात नाही व मला कुठल्या गोष्टींची अशी अॅलर्जी नाही की त्यामुळे तोंडाला फोड येईल. पण तरी तोंडात फोड आले. मग दोन-तीन दिवसांपासून ओठांच्यावर जरा भेगाही पडल्या. आईने लिपबाम आणलं. तेही रेग्युलर लावणं सुरू झालं. शेवटी पायामध्ये रात्री गोळे यायला लागले. ते आईला सांगितलं, तेव्हा आई जरा चरकली. लगेच सकाळी रक्त तपासायला डॉक्टर बोलावले. सकाळी मी रक्त दिले आणि तशीच कॉलेजला गेले. कॉलेजमध्ये मला एकदम गळून गेल्यासारखं झालं होतं. काहीही करायची इच्छा नव्हती व त्यामुळे कशातही मन लागत नव्हतं. अर्थात अभ्यास न करण्यातील अनेक कारणांपकी हे असल्याने मला काही त्यात काही नवीन नव्हतं. पण या वेळी मात्र ते तसं एक कारण नव्हतं तर मी ते अक्षरश: अनुभवत होते.
घरी आले, तर आई रिपोर्टकडे डोळे विस्फारून बघत होती. मला एकदम धडधडलंच. ती रिपोर्ट हातात घेऊन फोनवर कोण्या दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेत होती. फोन ठेवला आणि मला म्हणाली, अगं, तू एवढी अंडी आवडीने खाणारी मुलगी. आपण नॉनव्हेजही खातो. तशा तुझ्या खाण्याच्या फारशा तक्रारी नाहीत. तरीदेखील तुझं व्हिटॅमिन बी १२ कमी झालंय. हे जीवनसत्त्व पाण्यात विरघळणारे असल्याने याचा साठा भरपूर दिवस शरीरात असतो. तो ज्याअर्थी कमी झाला आहे, त्याअर्थी पचनशक्तीवर कुठे तरी परिणाम झाला आहे.’ मग जीवनसत्त्व बी १२ची सगळी झाडाझडती झाली.
10
आपण सर्व पौष्टिक खातो खरे, पण आपण तरुण मुलं खूप साखरयुक्त पदार्थदेखील खातो. त्यामुळे जंत होतात. ते काही लहान मुलांसारखे पडत नाहीत. त्यामुळे समजत नाही आणि तेच सर्व अन्नातलं सत्त्व शोषून घेतात. हे व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेचं अनेक कारणांपकी एक कारण. लगेच आम्ही सर्वानी सहकुटुंब सहपरिवार अगदी कामवाल्या मावश्यांसह जंतांचं औषध शनिवारी घेतली. रविवारी खाली मान घालून बाथरूमात बसलो. पुढचं वर्णन नको!
आईने ताबडतोब १० इंजेक्शनं चालू केली. पहिल्या ३-४ इंजेक्शनमध्येच बरं वाटलं, पण लक्षात आलं फक्त नॉनव्हेज खाऊन जीवनसत्त्व ब मिळतं. पण त्याच्या पचनासाठी अनेक गोष्टी गरजेच्या आहेत. दूध- दुधाचे पदार्थ, आंबलेले पदार्थ म्हणजे- डोसा इडली यामधूनही थोडय़ा प्रमाणात बी १२ आपल्याला मिळतं.
व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेला बऱ्याच वेळा प्रचंड अॅसिडिटी कारणीभूत ठरते. एक विशिष्ट प्रकारचा अॅनिमिया, आतडय़ांचा रोग, क्रोन्स् डिसीज किंवा सेलिक डिसीज, रोगप्रतिकारशक्ती कमी होणं इत्यादी अनेक कारणंदेखील यामागे आहेत. तत्त्वज्ञान देण्यात आलं जे माझ्या नेहमीप्रमाणे डोक्यावरून गेलं. पण आईच्या स्वभावावरून मला एक गोष्ट आवडते, ती म्हणजे सोपं-साधं काय ते विचार करा, मग कॅन्सर वगरेच्या मागे लागा.
चला आता माझी साखर बंद झाली असल्यामुळे चॉकलेट लॉलीपॉपही बंद झाले आहेत. मी फळांचा गोडवा चाखत आहे. खूप कंटाळलेली आहे हे सांगायला नको. पण गोड कमी खाल्ल्यामुळे एक प्रकारचा शिथिलपणा कमी झाला आहे. पाचवं इंजेक्शन गेल्यामुळे जरा बरंही वाटतं आहे. त्यात आईने फॉलिक अॅसिडच्या पण गोळया चालू केल्या आहेत. बी १२ आणि फॉलिक अॅसिडचं जुळ्याचं दुखणं असतं म्हणतात. माझं दुखणं कमी झालंय पण मी कुतूहल म्हणून सर्व खाद्यपदार्थाची लिस्ट परत एकदा तयार केलीय.