पुण्यात कात्रजच्या भारती विद्यापीठाच्या परिसरातला खाऊ अड्डा म्हणजे फूडलव्हर्ससाठी स्वर्ग आहे. कारण इथे ब्रेकफास्टपासून डिनपर्यंत, डेझर्टसकट सगळं काही भरपूर पर्यायांसह उबलब्ध असतं आणि तेही कॉलेजियन्सना परवडणाऱ्या दरात. वडापाव आणि कोल्ड कॉफीच्या असंख्य व्हरायटी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं.
पुण्यातल्या कॉलेजविश्वातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे भारती विद्यापीठ. कात्रज परिसरात उभ्या असलेल्या या विद्यापीठात जवळपास सर्व फॅकल्टी मध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत आणि आता मोठ्ठं कॉलेज-कॅम्पस-हॉस्टेल-कॉलेजियन्स आहेत म्हटल्यावर ओघाने येतात ते खाऊअड्डे. कॉलेजियन्सला टीपी करायला तर हॉस्टेलाइट्स ला पोट भरायला हे खाऊअड्डे मदत करतात आणि मग असे अनेक खाऊअड्डे किंवा कट्टे मिळून तयार होते ती खाऊगल्ली. अशीच एक मोठ्ठीच्या मोठी खाऊगल्ली विद्यापीठच्या बॅकगेटला आहे.
या खाऊगल्लीमध्ये अनेक कॅफेज-रेस्टॉरंट्स तसंच छोटे छोटे स्टॉल्सही समाविष्ट होतात. खरं तर कुठूनही खायला सुरुवात केली तरी तुम्हाला पोट-जीभ तृप्त झाल्याची प्रचिती येईलच. परंतु बॅकगेटसमोरून या गल्लीला फेरफटका मारायला सुरूवात करा..हो आधी फेरफटकाच मारा कारण आणि काय खायचं ते ठरवता येईल. कारण नंतर हे खायचं-ते राहिलं म्हणून उगाच वाईट वाटायला नको.
एरवी तमाम जनतेचा हॉट फेव्हरेट असणारा ‘इंडियन बर्गर’ अर्थातच वडा पाव खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ‘गोली नं-1’ मध्ये वडापावचे निरनिराळे प्रकार नक्की ट्राय करा. आपल्या साध्या म्हणजेच क्लासिक वडापाव सोबतच मसाला वडापाव हा वडापावचा तिखट प्रकार, आलू टिक्की फॅन्स साठी आलू टिक्की वडापाव, मिक्स व्हेज वडापाव, चीज लव्हर्ससाठी चीज वडापाव, चायनिज फूडी असणाऱ्यांठी शेजवान वडापाव असे भरपूर ऑप्शन्स इथे आहेत. कॉर्न्‍स आणि पालक पासून बनवल्या जाणाऱ्या मका-पालक वडापाव तरूणाईच्या विशेष पसंतीतला आहे. मुख्य म्हणजे एवढ्या सर्व व्हरायटीचज अवघ्या २५- ३० रुपयांमध्ये मिळतात. कॅड-बी, कॅड-एम, कोल्ड कॉफी सोबतच इथे ‘कॅफे क्रिम’ मध्ये पुणे स्पेशल ‘कुका’ अर्थातच मिळतो. तसंच ‘कॅफे चॉकोलाड’ने आपल्या चॉकलेट फॅन्ससाठी ‘फ्रोफी’ हा नवीन प्रकार नुकताच आणला आहे. फ्रोफी म्हणजे थिक आणि क्रिमी कोल्ड कॉफी..सध्या ‘कुका’सोबतच ‘फ्रोफी’लाही तरुणाईने उचलून धरलंय.
रोल डिलाईट म्हणजे  रोल्स आवडणाऱ्यांसाठी एक मोठी पर्वणीच आहे. व्हेज आणि नॉन-व्हेज या दोन्ही प्रकारात असंख्य पर्याय आपल्यासमोर आहेत. व्हेज मध्ये व्हेज मसाला रोल, व्हेज टिक्का रोल, व्हेज चीज रोल, व्हेज नूडल रोल, पनीर मसाला रोल, पनीर चिली रोल, पनीर चीज रोल, पनीर बटर रोल, पनीर टिक्का रोल, ग्रीन पीज मसाला रोल, व्हेज मंचुरीयल रोल, मशरूम रोल अशी मोठ्ठी रेंज तर नॉन व्हेज मध्ये एग डबल, एग रोल, पनीर एग रोल, चिकन रोल, चिकन एग रोल, चिकन चिली रोल, चिकन चीज रोल, चिकन टिक्का रोल, चिकन मंचुरीयन रोल, चिकन मसाला रोल, चिकन काठी रोल, फिश प्रॉन्स रोल असे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ इथे आहेत. ‘मॅगी ऑन टोस्ट’ असा हटके पदार्थ ही इथे मिळतो.
चायनिज लव्हर्ससाठी इथे चायनिज रूम आणि मोमो सेंटर इथे आहे.चायनिज पदार्थाची सर्व व्हरायटी तुम्ही इथे चाखू शकता तसंच व्हेज आणि नॉन व्हेज मोमो देखील इथे मिळतात. ही गल्ली खूप मोठी असल्यामुळे एरव्ही सगळीकडे मिळणारे स्नॅक्स चे पदार्थ इथे मिळतातच. पाणीपुरी-शेवपुरी-भेळपुरी वगरे पदार्थ इथल्या चाट सेंटर मध्ये मिळतात तर सॅन्डविच-टोस्ट-पिझ्झा-बर्गर यांचे वेगवेगळे प्रकार इथल्या स्नॅक्स सेंटरवर उपलब्ध आहेत. जस्ट इन साइड फूड सेंटर किंवा मग स्काय टच रोल्स अ‍ॅन्ड चायनिज सारख्या फूड स्टॉप्सवर तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता.
तुम्हाला जर कडकडूम भूक लागली असेल आणि स्नॅक्स किंवा नाश्ता असं टाइमपास खाणं तुम्हाला नको असेल तर ‘राजू अंकल के छोले भटूरे’ किंवा ‘बेडीज् नान हाऊस’ सारख्या छोट्याशा रेस्टॉरंट्स मध्ये तुम्ही पोटभर स्वस्त आणि मस्त छोले भटूरे व इतर पंजाबी डिशेसवर ताव मारू शकता. मेसच्या जेवणाला वैतागलेले कित्येक हॉस्टेलाइट्स इथेच आपलं पोट भरतात. तुम्ही खूप डाएट कॉन्शियस वगरे असाल किंवा मग हे वरचं खाणं जर तुम्हाला चमचमीत वगरे वाटत असेल तर ‘गीतांजली फ्रुट सेंटर’ हा तुमच्यासाठी मस्त पर्याय आहे. इथे मिक्स फ्रुट डिश किंवा मग तुमच्या आवडीच्या २-३ फळांच्या डिश मिळतात आणि खरोखरच एक फ्रुट डिश खाल्यावर पोटही भरत आणि छान हेल्दी-फ्रेश खाल्याचा आनंदही मिळतो. त्याचबरोबर इथे सर्व फ्रुट्स चे मिल्क शेक किंवा फ्रुट ज्यूसदेखील मिळतात. कॉलेजियन्सना परवडणाऱ्या किंमतीत हे पदार्थ असल्यामुळे ही जागा कायम मुला-मुलींनी(खास करून मुलींनी) गजबजलेली असते.
मस्तपकी स्नॅक्स किंवा मग लंच झाल्यावर तुम्हाला डेझर्ट खायची इच्छा झाली तर रिची रिच आइस्क्रिम सेंटर ला नक्की भेट द्या. इथे वर्षभर सगळ्या फ्लेवर्सची आणि सर्व प्रकारातली आइस्क्रिम खायला मिळतात. केक्स आणि पेस्ट्रीज साठी माँजिनिस तसंच अनेक बेकरीज इथे आहेत. एकंदरीतच विद्यापीठची ही खाऊगल्ली खाद्यसंस्कृतीने बहरलेली आहे. त्यामुळेच जर तुम्हाला अफलातून व्हरायटीज अनुभवायच्या असतील तर पोटात जागा आणि भरपूर वेळ घेऊन इथे या..इथून जाताना तुमचं पोट आणि मन तृप्त असेल एवढ मात्र नक्की.!!!!