|| शेफ मधुरा बाचल

आजची तरुण पिढी सोशल मीडियाचा अर्थार्जनाचं साधन म्हणून बऱ्यापैकी वापर करताना दिसतेय. आज आपण याच विषयावर ‘शेफखाना’ सदरात गपशप करणार आहोत.

तुम्हाला माहिती आहे का? एका सव्‍‌र्हेनुसार, प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर कमीतकमी सव्वादोन ते अडीच तास व्यतीत करते. पण मी जर असं सांगितलं की, काही चाणाक्ष मंडळी सोशल मीडियावरच्या याच वेळेचा वापर अर्थार्जनासाठी करतात तर .. काय? तुमचा चटकन विश्वास नाही ना बसत? नवल वाटलं ना या गोष्टीचं?

आजची तरुण मुलं आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याच्या धडपडीत आहेत. त्यांना ‘इन्फ्लुएन्सर’ म्हटलं जातं. त्यापैकीच एक म्हणजे ‘इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर’. ‘इन्स्टाग्राम’वर ‘#फूड’ या एका हॅशटॅगअंतर्गत ३६१ दशलक्षहून अधिक फोटोज आहेत. आणि का नसणार? आजची पिढी घर असो किंवा हॉटेल.. खाण्याचं ताट समोर आलं की आधी फोन बाहेर काढते आणि फोटो क्लिक करून आधी इन्स्टाग्रामवर आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर करते. बऱ्याचदा असाही एक समज आपल्या मनात घर करून असतो की, जे व्यावसायिक शेफ आहेत किंवा फूड समीक्षक आहेत तेच फूड क्षेत्रात नावलौकिक कमावू शकतात. पण सोशल मीडियाने या सगळ्या सीमारेषा पुसून टाकल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर खूप सारे फॉलोअर्स म्हणजेच तुम्ही यशस्वी अस मोजमाप नाही. तर त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं असतं ते तुम्ही तुमच्या फॉलोअर्सना किती खिळवून ठेवता आणि त्यांच्याबरोबर किती कनेक्टेड राहता. म्हणूनच आज आपण फूड क्षेत्रातील विविध पैलू, तुमची स्वयंपाकाची आवड, खाण्याची आवड या सगळ्याचा मेळ घालत हे सर्व इन्स्टाग्रामचा वापर करून सर्वांपर्यंत कसे पोहोचवू शकतो. नंतर त्याचं पूर्णवेळ व्यवसायात कसं रूपांतर करू शकतो याच्याविषयी थोडं जाणून घेऊ या. तर खाली काही मूलभूत गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे जे इन्स्टाग्रामवर यशस्वी होण्याकरता अत्यंत उपयुक्त आणि प्रभावी आहे.

* * कंटेंटचं नियोजन : इन्स्टाग्रामवर फक्त फूडचे फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणं पुरेसं नाही. तर तुम्हाला एक व्यवस्थित कंटेंट स्ट्रॅटेजी प्लॅन करावी लागते. इन्स्टाग्रामवर कोण सगळ्यात जास्त एन्गेजिंग आहे, ते काय, कधी आणि कसे पोस्ट करतात, कुठले हॅशटॅग वापरतात, फोटोजची स्टाईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. यात कोणाची कॉपी करणं हा उद्देश नाही तर या बाबींचा आपण एक मूलभूत केस स्टडी म्हणून उपयोग करू शकतो. आणि त्या आधारावर आपण आपली आवड, त्यातून लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल, याची सांगड घालून एक युनिक ब्रॅण्ड कसा निर्माण करता येईल. आपण कशा रीतीने लोकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचवू शकतो याचं मूल्यमापन करून एक बेसिक कन्टेन्ट  स्ट्रॅटेजी प्लॅन के ली पाहिजे. आणि ती योग्य त्या वेळेत अंमलात आणण्यावर भर दिला पाहिजे.

* * ट्रेण्डिंग हॅशटॅग : ट्रेण्डिंग हॅशटॅग वापरणं हे इन्स्टाग्रामवर व्हायरल होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे. ट्रेण्डिंग हॅशटॅग माहीत करण्यासाठी ऑनलाइन बरेच टूल्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कुठले हॅशटॅग वापरले पाहिजेत जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, इतकं च नाही तर त्याने एन्गेजमेंटही कशापदद्धतीने वाढेल याचा अभ्यास करायला हवा. सगळ्यात महत्त्वाचा हा ‘हॅशटॅग’ असतो. तो तुमचा ब्रॅण्ड आणि टॅगलाइन याचा सातत्याने वापर झालाच पाहिजे म्हणजे मग ती पोस्ट जेव्हा कोणाच्या नजरेखालून जाते तेव्हा त्या ब्रॅण्डचा तेवढाच इम्पॅक्ट पडतो. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवरील अ‍ॅनालिटिक्स टूल्सचा वापर करून कुठले कीवर्ड जास्त प्रचलित झाले त्याचाही मागोवा घेऊ न पुढच्या पोस्ट्समध्ये त्याचा वापर करू शकतो.

* * इन्स्टाग्राम कॅ प्शन्स : इन्स्टाग्राम कॅप्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. त्यातून त्या पोस्टबद्दलची माहिती किंवा एक छान स्टोरी निर्माण करून लोकांबरोबर शेअर करू शकता. जेणेकरून जास्तीत जास्त वेळ फॉलोअर्स त्या पोस्टवर घालवतील आणि पोस्टवर कमेंट करायला प्रवृत्त होतील. कॅप्शन जितकं प्रभावी तितक्या जास्त कमेंट आणि परिमाणी जास्त एन्गेजमेंट. त्याचबरोबर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी एक पर्सनल कनेक्ट निर्माण व्हायला हवा. त्यामुळे कमेंटला रिप्लाय करणंही अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर मी मिसळ पावचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शन लिहिली की मला कोल्हापुरी मिसळ जाम आवडते. तुम्हाला कुठली मिसळ जास्त आवडते ते शेअर करा आणि त्याचबरोबर तुमच्या मिसळ प्रिय मित्र किंवा मैत्रिणीला टॅग करायला विसरू नका. यामुळे काय होतं फॉलोअर्स त्या पोस्टवर जास्त खिळून राहतात आणि जास्त वेळ व्यतीत करतात.

* * इन्स्टाग्राम स्टोरीज आणि लाईव्ह : इन्स्टाग्रामवर स्टोरीज अपडेटेड ठेवणं हेही खूप महत्त्वाचं आहे. स्टोरीजमध्ये तुम्ही तुमच्या फॅन्सना खिळवून ठेवू शकता. त्यात तुमचे वैयक्तिक अपडेट्स पोस्ट करू शकता, कॅमेऱ्याच्या मागे काय काय गमती जमती होतात, तुम्ही कुठे प्रवासाला निघालात किंवा फॅन्सकडून पोल ही घेऊ  शकता. म्हणजे मी उद्या अमुक अमुक ठिकाणी जाणार आहे तर तिथे चांगलं काय मिळतं मिसळ की वडा पाव? फॅन्ससाठी आणि फॅन्सबरोबर केलेल्या या छोटय़ा छोटय़ा गोष्टी खूप उपयुक्त ठरतात. याशिवाय, फॅन्सबरोबर लाइव्ह जाणंही खूप फायद्याचं ठरतं.

* * इन्स्टाग्रामवर अर्थार्जन करण्याचे वेगवेगळे प्रकार –  इन्स्टाग्रामवर दर महा १०० मिलियन अ‍ॅक्टिव्ह युजर्स आहेत. जर तुमची फॉलोअरशिप चांगली आणि एन्गेजिंग असेल तर ब्रॅण्ड्स तुम्हाला स्वत:हून अप्रोच करतात. तर तुम्ही स्पॉन्सर्ड पोस्ट्समधून पैसे कमावू शकतात. जास्तीत जास्त इन्स्टाग्रामरचं हे इन्स्टाग्रामवर उत्पन्नाचं एक साधन आहे. त्याचबरोबर अफिलिएट मार्के टिंग करू शकता. अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाइलवर काही विशिष्ट ब्रॅण्डची उत्पादने सेलसाठी ठेवू शकता आणि दर सेलमागे तुम्हाला तुमचं कमिशन देण्यात येतं. त्याचबरोबर तुम्ही तुमचा व्यवसायही इन्स्टाग्रामवर थाटू शकता. यात स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करून त्या अंतर्गत वेगवेगळे स्नॅकचे प्रकार किंवा घरी बनवलेलं जेवण अशा काही तरी भन्नाट कल्पना घेऊ न स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करून एक यशस्वी उद्योजकही होऊ  शकता.

आता तुमच्याकडे इन्स्टाग्रामवर अर्थार्जन करण्यासाठी या मस्त टिप्स आहेत आणि त्याचा वापर करून नक्कीच तुम्ही तुमचं स्वत:चं वेगळं अस्तित्व आणि अस्तिवच काय तर साम्राज्यही उभं करू शकता!

एगलेस चॉकलेट मूस

साहित्य – पाव कप पाणी, पाव कप साखर, १ कप व्हिपिंग क्रीम, पाऊण कप डार्क चॉकलेट, १ चमचा इन्स्टंट कॉफी पावडर.

कृती – प्रथम साखर, कॉफी पावडर आणि पाणी चांगले उकळून घ्या. डार्क चॉकलेटचे छोटे तुकडे करून बाऊलमध्ये काढून घ्या. त्यावर साखरेचं गरम पाणी घालून चॉकलेट मेल्ट करून घ्या. व्हिपिंग क्रीम बिटरने घट्ट होईपर्यंत बिट करून घ्या. आता बिट केलेल्या क्रीममध्ये चॉकलेट हळूहळू फोल्ड करा. ४ ते ५ तास फ्रिजमध्ये सेट करून सव्‍‌र्ह करा.

मिक्सरमध्ये बनवा कॅपेचिनो

साहित्य : पाव कप इन्स्टंट कॉफी,

अर्धा कप साखर, पाव कप पाणी.

कृती : वरील सर्व साहित्य मिक्सरच्या भांडय़ात एकत्र करून घ्यावे. छान दाटसर होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. तयार झालेला फ्रॉथ एका डब्यात काढून फ्रिजमध्ये आठवडय़ाभरासाठी साठवून ठेवू शकता. आता कॉफी बनवण्यासाठी १ कप दूध आणि अर्धा चमचा साखर गरम करून घ्या. एका कपामध्ये तयार झालेला २ चमचे फ्रॉथ घाला. त्यावर गरम दूध घाला.

झटपट चॉकलेट केक

साहित्य – २ बॉरबॉन बिस्कीट पॅकेट, १ कप दूध, ४ चमचे साखर, १ इनो सॅशेट.

कृती – ३०० ग्रॅम बॉरबॉन बिस्कीट आणि ४ चमचे साखर घालून मिक्सरमध्ये एकत्र करा. आणि त्याची पावडर बनवून घ्या. एको बाउलमध्ये काढून, त्यात १ कप दूध मिक्स करून घ्यावे. इनो घालून मिक्स करावं.  बेकिंग ट्रेमध्ये हे बॅटर घालून १८० डिग्री सेल्सिअस वर २० मिनिटे बेक करून घ्यावे.

झटपट कोल्ड कॉफी

साहित्य – १ कप दूध, २ चमचे चॉकलेट सिरप, १ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, ४ चमचे कॅपेचिनो फ्रॉथ.

कृती – मिक्सरमध्ये १ कप दूध, २ चमचे चॉकलेट सिरप आणि १ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घाला आणि दाटसर शेक करून घ्या. त्यात ४ चमचे कॉफी फ्रॉथ घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवा. बर्फ  घालून कोल्ड कॉफी सव्‍‌र्ह करा.

संकलन : मितेश रतिश जोशी