सौरभ करंदीकर viva@expressindia.com

सुमारे दहा वर्षांपूर्वी मी जाहिरात क्षेत्रातील एका नामवंत एजन्सीमधून बाहेर पडलो. काहीतरी नवीन करावं या उद्देशाने नव्या वाटा शोधतोय, असं मी माझ्या मित्रांना आणि आप्तेष्टांना सांगितलं, पण ते अर्धसत्य होतं. खरं सांगायचं तर मी जे काम करतोय त्याचा १६ वर्षांनंतर कंटाळा आला होता. या शेवटच्या एजन्सीमध्ये मी जवळपास एक दशक काढलं होतं, आणि जाहिरात क्षेत्राच्या रीतीप्रमाणे माझी एका नोकरीतील ‘एक्स्पायरी डेट’ कधीच उलटून गेली होती. काम बरं चाललं होतं, पण तोचतोपणा येऊ लागला होता.

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?

मला काम करायचं होतं परंतु नोकरी करायची नव्हती. स्वत:ची कन्सल्टन्सी काढायची, तर धंद्याच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी शिकणं भाग होतं. ते कालांतराने जमलं. त्या काळात मी एक मोठाली बॅकपॅक विकत घेतली होती. त्या बॅकपॅकमध्ये माझा लॅपटॉप, चार्जर वगैरे गोष्टी ठेवता येतच होत्या, पण त्याशिवाय अनेक बारीक बारीक वस्तू ठेवायला छोटे छोटे खण होते. कामं मिळत गेली तसा या बॅकपॅकवरचा भार वाढत गेला. नोटपॅड, पेन, मार्कर, टूथब्रश, टूथपेस्ट, झालंच तर फर्स्ट एडच्या गोष्टी, औषधं, प्रवासात भूक लागली तर ड्रायफ्रूट्स, पाण्याची बाटली, रात्री अपरात्री प्रवास करावा लागला तर टॉर्च, पावसाळ्यात छोटीशी फोल्डिंगची छत्री, डिस्पोजेबल काटे – चमचे, नॅपकिन अशी मालमत्ता वाढत गेली. डेटा ट्रान्सफर करायला पेन ड्राइव्ह, प्रेझेंटेशन करायला लागल्या तर विविध वायरी, इतकंच नाही तर छोटासा प्रोजेक्टर देखील घेतला (जो फारसा चालला नाही). शेवटी बिलावर मारायला शिक्का, इंक पॅड इत्यादी घेतले तेव्हा मात्र मी या बॅकपॅकचं नामकरण केलं — ‘बॅकपॅक हेडक्वॉर्टर्स’ ! हे माझं ऑफिस होतं आणि जेथे जातो तेथे माझ्या सांगाती होतं.

जवळपास पाच र्वष गोगलगायीसारखं पाठीवर घर घेऊन जगताना असं वाटायचं की हेच काय वाईट आहे? फिरतं ऑफिस माझ्या क्लाएंट्ससाठी देखील सोयीचं झालं होतं, मीटिंग्स असल्या तरच त्यांच्याकडे जावं लागे. बाकी सारं काम ईमेल, नाहीतर ट्रेलो, स्लॅक सारख्या सॉफ्टवेअर्समधून चालत. माझ्या सहकाऱ्यांना भेटायचं झालं तर बरिस्ता, स्टारबक्स वगैरे  (म्हणजे जिथे बिल देऊन फुटवत नाहीत असं कोणतंही ठिकाण) होतंच. कामाचा पसारा आणि सहकाऱ्यांची संख्या वाढली तेव्हा स्टारबक्सपेक्षा कोवर्किंग स्पेसेस बरे पडू लागले (मर्यादित काळासाठी भाडेतत्त्वावर घेता येणारं रेडिमेड ऑफिस).

अशाच एका कोवर्किंग स्पेसमध्ये गेलो असताना त्यांनी एक आगळी ऑफर दिली. त्यांची मेम्बरशिप घेतली तर जगभरातील त्यांच्या ऑफिसेसमध्ये मला गेल्या गेल्या जागा मिळेल, आणि ती हवा तेवढा वेळ — तास, दिवस, आठवडा, मला ते ऑफिस  वापरता येईल. तिथल्या इंटरनेटला फुकट जोडून घेऊन पाहिजे ती कामं करता येतील! पण माझं काम तेव्हातरी मुंबईपुरतंच मर्यादित असल्याने ही ऑफर मी घेतली नाही. परंतु त्या दिवशी त्यांच्या ऑफिसमध्ये – केबिनमध्ये, कॉफीशॉपमध्ये, सोफ्यावर बसलेला प्रत्येक माणूस ही एक कंपनी आहे, इतकंच नाही तर हे ऑफिस मुंबईत असलं तरी त्या प्रत्येकाचा मूळ देश किंवा मूळ शहर वेगळंच आहे ही जाणीव झाली.

२००५ साली थॉमस फ्रीडमन या अमेरिकन राजकीय आणि सामाजिक विश्लेषकाने ‘द वर्ल्ड इज फ्लॅट’ (जग सपाट आहे) अशा मजेशीर नावाचं पुस्तक लिहिलं. फ्रीडमनच्या मते आज आपण जागतिकीकरणाच्या (ग्लोबलायझेशन) तिसऱ्या लाटेकडे पहात आहोत. पहिलं जागतिकीकरण हे प्रथमत: विविध देशांच्या देवाणघेवाणीमधून आकाराला आलं. दुसरं जागतिकीकरण होतं, ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचं. तिसरं जागतिकीकरण आहे ते प्रत्येक व्यक्तीचं. एका माणसाची ‘कंपनी’ जगभरातील अशाच प्रत्येक कंपन्यांबरोबर स्पर्धा करू शकेल, असं फ्रीडमन म्हणतो. मग तुम्ही शहरात असा किंवा गावात. उपनगरात असा किंवा शहराच्या मध्यात, तुमची पातळी ही एकसमान आहे. सारे एकाच प्रतलावर उभे आहेत आणि प्रगतीच्या दिशेने एकाच वेगात धावत आहेत हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिलं आहे.

या साऱ्याच्या मुळाशी अर्थातच तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या शक्यता आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे जगाच्या एका कोपऱ्यामधून दिलेलं भाषण दुसऱ्या कोपऱ्यातील प्रेक्षकांना पाहता येऊ लागलं, एका ठिकाणी चाललेली शस्त्रक्रिया दुसऱ्या ठिकाणी बसलेला शल्यविशारद करू लागला. घरातला स्वयंपाक झाला की एखादी गृहिणी दुपारी रिकाम्या वेळेत कुठल्याशा देशातल्या विमान सेवेचं बुकिंग सांभाळू लागली. एखादा रिटायर्ड इंजिनीयर आपल्या निवांत संध्याकाळी कुठल्या तरी इलेक्ट्रॉनिक उत्पादकाच्या हेल्पडेस्क वरून ग्राहकांना मार्गदर्शन करू लागला. (या साऱ्या सत्यकथा आहेत).

हे तिसरं जागतिकीकरण देश, धर्म, वय, शिक्षण, क्षमता या साऱ्यांनाच झुगारून देऊ पाहात आहे. या जागतिकीकरणात सहभाग घ्यायचा तर फक्त इंटरनेट कनेक्शन आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हवी. अंगमेहनतीची कामं सोडली तर इतर अनेक कामं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने (रिमोटली) शक्य होऊ शकतात, हे आपल्याला करोनाकाळाने दाखवून दिलेलं आहे. भविष्यात हे रिमोट वर्किंग आपल्या जगापुरतं मर्यादित राहणार नाही. इंटरनॅशनल स्पेस स्टेशननंतर, चंद्रावर, मंगळावर देखील मानव दीर्घकाळ वास्तव्य करेल. तिथूनही आपल्याला ‘एका माणसाची कंपनी’ चालवता येईलच की! तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वैश्विकीकरणाच्या चौथ्या लाटेवर आपण सहज स्वार होऊ हे नक्की.