|| आसिफ बागवान

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच इंटरनेट हीदेखील मूलभूत गरज बनली आहे. सध्या डिजिटल युगात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, संगणक या उपकरणांपासून अगदी आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक बाबतीत इंटरनेट हे अनिवार्य बनले आहे. एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की तिचे मूल्य वाढते. मात्र, इंटरनेटला ही संज्ञा लागू होत नाही. दोन वर्षांपूर्वी ‘जिओ’चा उगम झाल्यापासून देशातील  इंटरनेटचे विशेषत: मोबाइल इंटरनेटचे दर कमालीचे घसरले. यामुळे एकीकडे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढत गेली तर दुसरीकडे, इंटरनेटची गरजही वाढत गेली. पूर्वी, महिन्याला तीन जीबी डेटाही पुरवून पुरवून वापरणाऱ्या स्मार्टफोनधारकाला आता दिवसाला दोन जीबी डेटा कसा संपतो, हेदेखील कळत नाही. अशी अवस्था निर्माण झाल्यामुळे देशात मोफत वायफायचेही मोठे ‘फॅड’ जन्माला आले. अगदी गल्लीबोळांतल्या राजकीय नेत्यापासून केंद्र सरकापर्यंत साऱ्यांनीच मोफत वायफाय पुरवण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आज महानगरांत जेथे जावं तेथे मोफत वायफायची सुविधा उपलब्ध झाली आहे. विमानतळांवर ही सुविधा फार पूर्वीपासून उपलब्ध होतीच; परंतु, आता भारतातील रेल्वेस्थानकेही वायफाययुक्त होऊ लागली आहेत. भारतीय रेल्वेने नुकतेच एक हजाराव्या रेल्वे स्थानकात मोफत वायफायची सुविधा कार्यान्वित केली. यावरूनच मोफत वायफायला सध्या किती मागणी आहे, हे लक्षात येते.

मोफत वायफाय ही काळाची गरज आहे, हे अमान्य करता येणार नाही. पाश्चात्त्य देशांतील सर्वच शहरांत सार्वजनिक वायफायची सुविधा पुरवण्यात येते. अमेरिका, ब्रिटनसारख्या प्रगत राष्ट्रांत ही सुविधा आहेच; पण पोर्तुगाल या देशात सर्वत्र मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत हे प्रमाण वाढू लागले आहे. याचे प्रमुख कारण स्मार्टफोनचा वाढता वापर हे आहे. देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींच्या घरात पोहोचली आहे. यापैकी बहुतांश वापरकर्ते मोबाइल इंटरनेटचा पुरेपूर वापर करत असले तरी, मोफत वायफाय ही या वापरकर्त्यांसाठी पर्वणीच असते. त्यामुळेच छोटय़ा शहरांतही मोफत वायफायची सुविधा पुरवण्याकडे तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कल वाढत चालला आहे. एवढेच नव्हे तर, प्ले स्टोअरवर आपल्या आसपास उपलब्ध असलेले मोफत वायफाय पुरवणारे ‘हॉटस्पॉट’ शोधून देणारे अ‍ॅपही लोकप्रिय ठरू लागले आहेत. अशा अ‍ॅपच्या माध्यमातून सार्वजनिक नसलेल्या वायफायशी संलग्न होऊन इंटरनेट वापरण्याकडे ओढा वाढतो आहे. परंतु, ही मोफत सुविधा किती धोकादायक ठरू शकते, याचे ताजे उदाहरण नुकतेच समोर आले आहे.

गुगलच्या ‘प्ले स्टोअर’वर असलेल्या ‘वायफाय फाइंडर’ नावाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरातील २० लाख वायफायचे पासवर्ड आणि नेटवर्कची माहिती हॅक करण्यात आल्याचे नुकतेच उघड झाले. या अ‍ॅपद्वारे मोफत वायफायचा वापर करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये साठवलेल्या वायफायची माहिती शेअर करणे बंधनकारक करण्यात येते. बहुतांश वापरकर्त्यांना या माहितीचे महत्त्व माहिती नसल्याने ते अशी माहिती ‘वायफाय फाइंडर’शी शेअरही करतात. परंतु, असे होत असताना त्यांच्या घरच्या किंवा कार्यालयातील खासगी वायफायची माहितीही या अ‍ॅपपर्यंत पोहोचते. ही माहिती म्हणजे केवळ वायफायचे नाव आणि पासवर्डच नव्हे तर, नेटवर्क आयडी, वायफायचे ठिकाण यांसह अन्य माहितीही या अ‍ॅपकडे जमा होते. अशाच प्रकारे या अ‍ॅपने जवळपास २० लाख वायफायची माहिती जमा केली आणि ती नंतर इंटरनेटवरून प्रसारित करण्यात आली. या माहितीचा हॅकरकडून गैरवापर होण्याची भीती व्यक्त होते आहे. या माहितीच्या आधारे हॅकर वापरकर्त्यांचे वायफायच हॅक करू शकतात, असे नाही तर, वायफायच्या माध्यमातून वायफायच्या स्मार्टफोन वा संगणकात शिरून तेथील माहितीची चोरी किंवा छेडछाडही करू शकतात.

‘वायफाय फाइंडर’सारखे असंख्य अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. मोफत वायफायच्या मोहाने अशा अ‍ॅप्सचा वापर करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे किती वापरकर्त्यांची माहिती व सुरक्षितता धोक्यात आली असेल, याची कल्पनाच केलेली बरी!

मोफत वायफायचा धोका केवळ अशा अ‍ॅपच्या माध्यमातूनच आहे, असे नाही. अनेकदा मोफत वायफायच वापरकर्त्यांच्या उपकरणांत हॅकरना प्रवेश मोकळा करून देतात. मोफत वायफायबाबतची ही ओरड सुरुवातीला होऊ लागली तेव्हा अशा वायफायमध्ये वापरकर्त्यांचा डेटा ‘एन्क्रिप्टेड’ असतो, असा दावा करण्यात आला. ‘एन्क्रिप्टेड’ अर्थात ‘सांकेतिक लिपीत रूपांतरित’ झालेला हा डेटा सहजासहजी कोणालाही मिळवता येत नाही, असा दावाही करण्यात आला. परंतु, जसे तंत्रज्ञान अधिक सुरक्षित होते, त्याप्रमाणे ती सुरक्षा भेदण्यासाठी हॅकरही अधिक सक्षम होतात. आता हॅकर्सनी ‘एन्क्रिप्टेड डेटा’ चोरी करण्याची शक्कल शोधून काढली आहे. परिणामी सार्वजनिक ठिकाणचे मोफत वायफाय सुरक्षित असतील, याची खात्री देता येत नाही.

आता म्हणून मोफत वायफाय वापरायचेच नाहीत, असे नाही. परंतु, त्याचा वापर करताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण जो मोफत हॉटस्पॉट निवडला आहे, तो पुरवणारी यंत्रणा कोण आहे, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. कोणतेही सार्वजनिक वायफाय १०० टक्के सुरक्षित नसले तरी, आपण आधी वापरलेल्या किंवा विश्वासार्ह वाटणाऱ्या वायफाय यंत्रणेशी संलग्न व्हायला हरकत नाही. दुसरं म्हणजे, अशा वायफायच्या माध्यमातून इंटरनेट ब्राऊजिंग करत असताना ‘एचटीटीपीएस’ प्रोटोकॉलचा वापर कराच. ‘एचटीटीपीएस’ प्रोटोकॉलच्या माध्यमातून इंटरनेट वापरताना आपली सर्व माहिती ‘एन्क्रिप्टेड’ स्वरूपात सव्‍‌र्हरवर पाठवली जाते. त्यामुळे ती चोरली जाण्याचा धोका कमी होतो. अशा वायफायच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करताना खासगी चॅटिंग किंवा आर्थिक व्यवहार करणे टाळलेच पाहिजे. अशा काही गोष्टींची काळजी घेतली तर मोफत वायफायचा सुरक्षित वापर करता येईल. अन्यथा मोफत वायफायच्या फंदात पडून तुम्हाला वेगळय़ाच माध्यमातून जास्त किंमत मोजावी लागेल.

viva@expressindia.com