५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणातील समस्या नि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणं, पर्यावरणविषयक निर्णय घ्यायची क्षमता निर्माण होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणं हा पर्यावरण दिन साजरा करण्याचा हेतू असतो. यंदाच्या पर्यावरण दिवसाचं घोषवाक्य आहे – Seven Billion Dreams. One Planet. Consume with Care.

आजच्या फास्ट फॉरवर्ड जगात जिथे माणसांना माणसांसाठी वेळ काढणं कठीण होतंय, तिथे काही तरुणमंडळी मात्र पर्यावरणासाठी आपला सगळा वेळ देत आहेत. अनेकांनी तर पर्यावरणाचं क्षेत्र करिअर म्हणून निवडलंय. अशाच काही पर्यावरण मित्रांच्या कामाविषयी..

आपल्या आजूबाजूचे वातावरण, पर्यावरण आपल्या आयुष्यावर, जडणघडणीवर प्रभाव टाकत असते. त्यामुळे कळत नकळत त्याचा आपल्यावर परिणाम होत असतो. साहस बर्वे याने आपल्या पक्षिनिरीक्षणाच्या आवडीला संशोधनाचा विषय बनवलंय. नववी-दहावीपासून त्याला पक्षिनिरीक्षण करण्याची आवड आहे आणि पी.एच.डी.सुद्धा तो हिमालयीन पक्ष्याचं निरीक्षण यावर करतोय. समुद्रसपाटीपासूनच्या उंचीनुसार बदलणार पक्ष्यांचं राहणीमान हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. ‘पक्ष्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या शरीर शास्त्राविषयी, त्यांच्या वागण्याविषयी, राहणीमानाविषयी मला पहिल्यापासून उत्सुकता आहे. माझ्या संशोधनामुळे ग्लोबल वॉर्मिगचा हिमालयीन पक्ष्यांवर काय परिणाम होतोय हे स्पष्ट होईल. त्यासोबत प्युअर सायन्स पण पुढे जावं असं मला वाटत. पक्ष्यांचं हिमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन कसं बदलत आणि वातावरणाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम याविषयी अधिक माहिती माझ्या संशोधनामुळे उपलब्ध होईल.’ असं साहस सांगतो.
प्राची गळंगे हिलासुद्धा लहानपणापासूनच प्राणी -पक्ष्यांमध्ये, फुलपाखरांमध्ये रस होता. बी.एस्सी. करताना नेचर ट्रेलच्या माध्यमातून तिला निसर्गाविषयी खूप माहिती मिळाली आणि त्यात तिला रस वाटू लागला. तिने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात चार र्वष नेचर इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये नेचर इंटरप्रीटर म्हणून ट्रेलला आलेल्यांना पक्षी, कीटक, झाड यांविषयी माहिती देण्याच काम केलं. आता ती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये कार्यरत आहे. याविषयी सांगताना प्राची म्हणाली, ‘माझ्या मित्रमैत्रिणींना देखील पक्षी, कीटक निरीक्षणाची आवड होती. त्यामुळे आम्ही शिलोंढा, तुंगारेश्वर, नॅशनल पार्कला जायचो. त्यामुळे मग माझा अजून इंटरेस्ट वाढत गेला. त्यातून मी एक वर्ष चतुर कीटक आणि त्याच्या प्रजाती यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नीता जाधव आणि सौरभ सावंत यांच्यासोबत एक र्वष संशोधन केलंय. त्यात आम्हाला ६१ प्रकारच्या चतुरांच्या प्रजाती सापडल्या होत्या. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये आम्ही आता नेचर ट्रेल, वाइल्डलाइफ कॅम्प आयोजित करतो. पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय.’
पर्यावरणाचा अभ्यास हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनत चाललाय आणि पर्यावरण संवर्धनाचं भान तरुणाईला आहे हे या संशोधकांकडे बघून पटतं. अनेकांना यांच्याकडून आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणादेखील मिळू शकेल.
कोमल आचरेकर – viva.loksatta@gmail.com