27 February 2021

News Flash

दोस्तीवाला डे

ऑगस्टचा पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा करतात. शाळेत असताना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून, एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करणारे दोस्त होते.

| July 31, 2015 01:30 am

ऑगस्टचा पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा करतात. शाळेत असताना फ्रेंडशिप बॅण्ड बांधून, एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करणारे दोस्त होते. थोडं मोठं झाल्यावर आयुष्यात सोशल नेटवर्किंग आलं आणि तेच आयुष्य बनून गेलं. अनेक नवे मित्र या व्हच्र्युअल जगात मिळाले. पण या आभासी जगात मैत्रीची व्याख्याच तर बदलली नाहीय ना? फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने या नव्या जगातल्या मैत्रीबद्दल बोलू काही..
सोशल नेटवर्किंग साइट्सवरून मित्रजोडणी सुरू झाल्यानंतर फ्रेंडशिप डेच्या सेलिब्रेशनला खरा जोर चढला. पण या व्हच्र्युअल फ्रेंडशिपच्या जमान्यात मैत्रीची व्याख्या बदलली आहे का, खरा दोस्त कुणाला मानते आजची पिढी आणि या दोस्तीचं सेलिब्रेशन कसं करते, हे शोधण्यासाठी साडेतीनशे तरुणांशी ‘व्हिवा’ने संवाद साधला. त्यातून उलगडलेलं हे मैत्र.

मैत्री म्हणजे काय? कुणासाठी कट्टय़ावरची मज्जामस्ती तर कुणासाठी प्रेम, कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी केवळ दुनियादारी, तर काहींसाठी शब्दांत सांगता न येणारं बरंच काही..! काही नाती एका व्याखेत बसवणं अगदी अवघड होऊन जातं. कारण प्रत्येकाने त्याकडे ज्या वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं असतं, त्यामुळे त्या नात्यातील अनेक पैलू समोर येत असतात. मैत्री हे नातंच असं आहे, जे प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. या मैत्रीला साजरं करण्याचा दिवस म्हणजे मैत्री दिवस, अर्थात फ्रेंडशिप डे. तसं मित्रमैत्रिणी एकत्र भेटले की तो दिवस उत्साहाचा नि उत्सवाचाच असतो. पण आवर्जून भेटीचं एक कारण म्हणजे हा फ्रेंडशिप डे..! आता हा फ्रेंडशिप डे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही मुंबई आणि पुण्याच्या १६ ते २४ वयोगटातील ३५० मुलामुलींशी संवाद साधून एक छोटं सर्वेक्षण केलं. आजच्या पिढीचं मैत्रीपूर्ण नातं नेमकं आहे तरी कसं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला.
फेसबुकवर जुळलेलं आणि त्याच भिंतीवर फुललेलं मैत्र आजच्या पिढीला महत्त्वाचं वाटतं की प्रत्यक्ष भेटीनंतर जुळलेल्या तारा महत्त्वाच्या वाटतात? यातून बी.एफ.एफ., शेजारी राहणारा दोस्त, शाळेतला बेंचपार्टनर, वर्गातल्या ग्रुपमधले, कॉलेजमधले मित्र, कट्टय़ावरचे यार, कॉलेजची गँग, स्टडी बडीज, या क्लासला भेटलेली किंवा त्या कार्यक्रमात ओळख झालेली एक ना अनेक, पण अशा प्रत्यक्षात भेटलेल्या, ओळख असणाऱ्यांनाच आम्ही आमचे मित्रमैत्रिणी मानतो, असं प्रामुख्याने या तरुणांनी सांगितलं. फेसबुकवर किंवा अन्य सोशल मीडिया साइट्सवर फ्रेंडलिस्टमध्ये असणारे आमचे खरंच मित्र आहेत असं सांगणारे अगदी तुरळक आढळले. फेसबुकवर अनोळखी व्यक्तींशी होणाऱ्या मैत्रीला आम्ही मैत्री म्हणत नाही हेच बहुसंख्यांनी प्रकर्षांनं सांगितलं. अर्थात सोशल साइट्सवर होणारी मैत्री ही तितकीच घट्ट असू शकते. पण त्यासाठी मैत्रीत पारदर्शकता महत्त्वाची आहे, असं तरुणाईचं म्हणणं आहे.
आता फ्रेंडशिप डे म्हटला की कट्टय़ावर मित्रमैत्रिणींची गर्दी तर होणारच. या ‘डे’च्या सेलिब्रेशन प्लॅन्सबद्दल विचारलं असता प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियावर आणि मेसेजिंग अ‍ॅपच्या साहाय्याने पोस्ट, मेसेज करून मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देणार आहेत. पण काही जणांनी आम्ही फ्रेंडशिप डे अजिबात साजरा करणार नाही असंही सांगितलं.

फ्रेंडशिप डेनिमित्ताने मुंबई पुण्याच्या १६ ते २४ वयोगटातील  ३५० मुलामुलींशी संवाद साधण्यात आता. किती जणांना फ्रेंडशिप डे साजरा करावासा वाटतो आणि कसा, किती जणांना मैत्रीत प्रत्यक्ष भेटीची गरज वाटते हे शोधण्याचा हा प्रयत्न..
१) तुमच्या मते मित्रमैत्रिणी कोण?
अ) सोशल मीडिया साइट्सवर तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये असणारे :  १२ %
ब) प्रत्यक्षात भेटून ओळख झालेले : ८८%
२) फ्रेंडशिप डेच सेलिब्रेशन तुम्ही कसं करणार?
अ) प्रत्यक्ष भेटून : ३८%
ब) सोशल मीडियावर पोस्ट करून किंवा मॅसेज करून : ५%
क) वरील दोन्ही प्रकारे : ४३ %
ड) अजिबात सेलिब्रेट करणार नाही : १४%
३) तुम्ही मैत्री जपण्यासाठी कशास प्राधान्य देता?
अ) संवाद साधण्यास : ७१ %
ब) गिफ्ट देण्यास : २ %
क) फ्रेण्डशिप बॅण्ड बांधण्यास : ३ %
ड) वरील सर्व प्रकारे : २४ %

vv05एखाद्या दिवशी भेटून, ‘सेलिब्रेशन’ करून आणि नंतर फोटो अपलोड करून मैत्रीचं प्रदर्शन करण्यापेक्षा मित्राच्या अडचणीत केलेली मदत, दिलेला योग्य सल्ला आणि कोणतीही ईष्र्या न बाळगता एकमेकांच्या यशाचं केलेलं कौतुक हाच माझ्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’ असतो. त्यामुळे वेगळा ‘डे’ साजरा करायची गरज पडत नाही.
ओवती नाईक

काही प्रातिनिधिक मतं:
vv14आजकाल मैत्री कोणत्याही बंधनात अडकलेली नाही. सोशल नेटवर्किंग साइट्सवर फ्रेंड्स लिस्ट पाहताच लांबलचक यादी समोर येते, पण त्यातल्या कित्येक जणांना आपण ओळखतही नसतो. लाइक्स वाढवण्यासाठी भरमसाट वाढवलेली हीच फ्रेंडलिस्ट मग निर्थक मैत्रीचा प्रत्यय देते. त्यामुळे यंदाही मी मित्रांना भेटूनच फ्रेंडशिप डे साजरा करणार आहे.
* संदेश कदम

vv15सतत फेसबुकवर बोलत असणारे पण प्रत्यक्ष न भेटलेले असे अनेक मित्र-मैत्रिणी असतात. ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने त्यांना भेटणं, समजून घेणं, मैत्री करणं हे नेहमीच्या सेलिब्रेशनपेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे.
* मोहित निजाई
‘फ्रेंडशिप डे हा वर्षांतला एक खास दिवस, जो मित्रमैत्रिणींसाठी असतो. तो साजरा करण्यास काय हरकत आहे? त्यानिमित्ताने जुने मित्र भेटतात, जुन्या आठवणींना उजाळा तर मिळतोच, पण त्या वेळी केलेली मज्जा भविष्यात रमायला सुंदर आठवणींचे क्षण देत असते.
* चिन्मय नाईक

(संकलन साहाय्य : राधिका कुंटे, भक्ती तांबे, लीना दातार, प्राची परांजपे, निहारिका पोळ, सायली पाटील, अमृता अरुण,  वेदवती चिपळूणकर,  सम्जुक्ता मोकाशी, मुक्ता आठवले, राजश्री जाखलेकर, शांभवी मोरे, प्रियांका खानविलकर, तेजल सप्रे.)
कोमल आचरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 1:30 am

Web Title: friendship day celebrations
टॅग : Friendship Day
Next Stories
1 अदृश्य मित्राशी चॅटिंग
2 तुम मुझे यूं भूला ना पाओगे
3 आपण यांना पाहिलंत का?
Just Now!
X