19 September 2020

News Flash

प्रवासात साथ देणारे हमसफर 

पेट्रोकेमिकल क्षेत्रात एका तरुणीने सुरू केलेले हे स्टार्टअप ही एका नव्या बदलाची नांदी आहे.   

मानसी जोशी

लहानपणापासूनच स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या २७ वर्षांच्या सान्या गोयलने विकसित केलेल्या ‘फ्यूएल हमसफर’ अ‍ॅपद्वारे ग्राहकांना घरपोच इंधनपुरवठा केला जात आहे. इंग्लंड येथील ‘वॉरेक युनिव्हर्सिटी ऑफ आंत्रप्रिनरशिप’मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर तिने स्वबळावर हे स्टार्टअप सुरू केले आहे. पुरुषांची मक्तेदारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रात एका तरुणीने सुरू केलेले हे स्टार्टअप ही एका नव्या बदलाची नांदी आहे.   

पावसाळ्यात एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेल्यावर गाडीतील पेट्रोल संपल्यास आपली भलतीच पंचाईत होते. जवळ पेट्रोल पंप असल्यास ठीक नाही तर जुगाड करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एखाद्या मित्राला फोन केल्यावर तो बाटलीत पेट्रोल घेऊन येतो. पेट्रोल टाकूनही गाडी सुरू न झाल्यास गाडीला टेकू देतो. अशाच टाळेबंदीमुळे संकटकाळी सापडलेल्या शेतकरी तसेच बांधकाम व्यावसायिकांसाठी ‘हमसफर’  हे स्टार्टअप मदतीला धावून येत आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अगदी कपडय़ापासून ते फर्निचपर्यंत सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होत असताना इंधनही तसे मिळाल्यास नवल वाटायला नको. दिल्लीच्या २७ वर्षे सान्या गोयल या तरुणीने ‘फ्यूएल हमसफर’ या अ‍ॅपच्या माध्यमातून इंधन घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

परदेशातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर सान्याने कुटुंबाच्या व्यवसायात काही काळ काम केले. या कालावधीत तिने देशातील पेट्रोकेमिकल क्षेत्राचा  बारकाईने अभ्यास केला. मालवाहू ट्रक, बस, ट्रॅक्टर यांसारख्या अवजड आणि लांब पल्ल्याच्या वाहनांना मोठय़ा प्रमाणावर इंधनाची गरज भासते. देशात प्रत्येक मैलावर पेट्रोल पंप उपलब्ध असेल याची शाश्वती नाही. रात्री-अपरात्री इंधनाची गरज भासल्यास वाहन चालकाची मोठी पंचाईत होते. अशा वेळेस वाहन चालक, कंपन्या, बांधकाम व्यावसायिक इंधनाचा जास्तीचा साठा करून ठेवतात आणि गरजेनुसार वापरतात. ऑनलाइन शॉपिंगद्वारे खाद्यपदार्थ, कपडे घरपोच मिळत असताना ग्राहकांना एका क्लिकवर इंधनपुरवठा कसा करता येईल या संकल्पनेवर काम करण्यास तिने सुरुवात केली. यातूनच ‘हमसफर’ या स्टार्टअपचा जन्म झाल्याचे सान्या सांगते.

तिचे वडील आणि काका हे तीन दशकांपासून पेट्रोकेमिकल क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना या व्यवसायाची उत्तम जाण असल्याने हे स्टार्टअप सुरू करताना सरकारी परवानगी घेणे, पेट्रोल पंप व्यावसायिकांशी बोलणे या गोष्टी सहज सोप्या झाल्याचे ती स्पष्ट करते. मार्च महिन्यात दिल्लीत ‘हमसफर फ्यूएल’ या अ‍ॅपचा शुभारंभ झाला. ‘‘या अ‍ॅपमुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इच्छित स्थळी इंधन मिळते. तसेच इंधनाच्या अवैध आणि बेकायदेशीर वाहतुकीसही आळा बसतो’’, असे ती नमूद करते.  ही सुविधा सध्या दिल्ली एनसीआर, फरिदाबाद, गाझियाबाद, कुंडली, मानेसर आणि बहादूरगड या शहरांत उपलब्ध असून लवकरच महाराष्ट्रातही सुरू होईल.  या अ‍ॅपच्या कार्यप्रणालीविषयी सांगताना सान्या म्हणते, ‘‘गूगल प्लेस्टोअरवर ‘फ्यूएल हमसफर’ या अ‍ॅपवर जाऊन ग्राहकांनी नाव, ठिकाण, तुमची गरज ही माहिती भरायची. अ‍ॅपवर ऑर्डर केल्यावर काही वेळात हमसफरचा बाऊझर (ट्रक) तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी डिझेल आणून देतो. यात मोबाइल डिस्पेन्सरी यंत्रणेचा वापर केला जातो. हे अ‍ॅप चार राज्यांतील आघाडीच्या पेट्रोल पंपांशी जोडले गेले असून, त्याद्वारे ग्राहकांना इच्छित स्थळी इंधनपुरवठा केला जातो. सध्या या अ‍ॅपद्वारे फक्त डिझेलचा पुरवठा केला जातो आहे. अत्यंत कमी कालावधीत ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत पाच हजार ग्राहकांना इंधनपुरवठा के ला आहे’’,असेही सान्याने सांगितले.

खाद्यपदार्थ, कपडे, वस्तू, पालेभाज्या ऑनलाइन मागवण्याची सवय असलेल्या भारतीयांना अ‍ॅपद्वारे इंधनपुरवठा ही संकल्पना नवीन आहे, असे सान्या सांगते. परदेशात इंधनपुरवठा करण्याची संकल्पना तशी जुनी आहे. दुबई, अमेरिका, इंग्लड या देशांत ऑनलाइन इंधनपुरवठा करण्यास तेथील सरकारने कायदेशीर मान्यता दिली आहे. गेल्या दोन वर्षांत आपल्या देशातही हळुहळू ऑनलाइन इंधनपुरवठय़ाची संकल्पना रुजू होत आहे. यासाठी केंद्र सरकारनेही पुढाकार घेतला असून ग्राहकांना लवकरच सीएनजी, पेट्रोल, आणि डिझेल घरपोच मिळेल.  इंधन ज्वलनशील असल्याने त्याची वाहतूक करताना अधिक काळजी घ्यावी लागते. सरकारच्या नियमावलीनुसार सुरक्षित उपाययोजनांसह आम्ही ग्राहकांना डिझेलचा पुरवठा करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.

मार्च महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी टाळेबंदीत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त प्रवासाला मनाई होती. या काळात ‘फ्यूएल हमसफर’ हे अ‍ॅप शेतक री आणि व्यावसायिकांसाठी वरदान ठरले. मार्च ते मे या काळात पिकांची कापणी केली जाते. कापणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक मिलमध्ये अथवा झोडपणीसाठी द्यावे लागते. या काळात त्यांना पेट्रोल पंपापर्यंत जाणे शक्य नसल्याने हमसफरने वीस शेतक ऱ्यांना डिझेलचा पुरवठा केला. या शेतक ऱ्यांकडून आम्ही डिलीव्हरी शुल्क आकारले नाही. टाळेबंदीत अनेक ग्राहकांना आम्ही घरपोच डिझेलचा पुरवठा करत आहोत, असेही सान्या सांगते.  अनेक वर्षांपासून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पेट्रोके मिकल क्षेत्रात स्त्रियांना पुष्कळ संधी आहेत. स्वबळावर स्टार्टअप सुरू करणे हे सान्यासाठी आव्हानात्मक होते. तरुणांनी दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा व्यवसाय सुरू करावा हे तिचे स्पष्ट मत आहे. देशात स्टार्टअप सुरू करण्यास अनुकूल वातावरण आहे. केंद्र सरकारने स्टार्टअपसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. याचा फायदा तरुण पिढीने घेतला पाहिजे.   समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग व्यवसायवाढीसाठी करू शकतो, असे ती सांगते. मेहनत आणि संयम या दोन्ही गोष्टी आणि बऱ्यावाईट अनुभवातून शिकण्याची जिद्द व्यवसाय पुढे नेण्यास महत्त्वाची ठरते, असेही ती सांगते.

ऑनलाइन इंधनपुरवठा

दोन वर्षांपूर्वी ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’ने काही निवडक ठिकाणी डिझेल सुविधा देता येईल का याची तपासणी केली होती. २०१९ मध्ये आयओसीतर्फे दिल्ली एनसीआर क्षेत्रातील ‘प्रेपफ्यूएल्स’ आणि पुण्यातील ‘रेपोस एनर्जी’  या दोन स्टार्टअपशी करार केला. त्यापैकी रेपोस एनर्जी पुणे, रायगड, वाराणासी, चेन्नई, बेंगळूरु या शहरांत डिझेलपुरवठा करतात. भविष्यात केंद्र सरकार ग्राहकांना सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल ही इंधने घरपोच देण्याची योजना आखत आहे. यासाठी इंधन वितरणाचे दर, त्याची सुरक्षितता आणि सहज उपलब्धता या गोष्टींबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहितीही तिने दिली.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 1:48 am

Web Title: fuel humsafar app by sanya goel zws 70
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : गुंतवणुकीच्या तऱ्हा
2 नवे कार्यधागे
3 हातमागाशी जुळले डिजिटल धागे
Just Now!
X