‘गुगल’इतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले ‘वॉच’लेले काही कण अर्थात काही ‘मस्ट वॉच’ व्हिडीओ. बोलनेवाला तोतापासून ते टेड टॉकमध्ये भाषण ठोकणाऱ्या पोपटापर्यंत काही इंटरेस्टिंग व्हिडीओंची दखल आजच्या लेखात..

कायद्याने गुन्हा असला, तरी गेल्या काही वर्षांमध्ये पोपट घरात बाळगणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात देशी-विदेशी कुठलाही असला तरी त्या पोपटाच्या बोलघेवडेपणाचे कौतुक त्यांना पाळणाऱ्यांमध्ये असते. १९९८ साली अमेरिकेत बोलणारा पोपट मध्यवर्ती व्यक्तिरेखा करून ‘पॉली’ हा चित्रपट बनविण्यात आला होता. आपल्याकडे स्टार मूव्हीज ही चित्रवाहिनी सुरू झाल्यानंतरच्या काही वर्षांमध्ये हा चित्रपट तिथे अनेकदा दाखविला जायचा. एका लहान मुलीसोबत वाढणारा यातील ‘पॉली’ नावाचा पोपट चित्रपटाचा निवेदक आहे. तो त्या लहान मुलीसोबत नुसती भाषाच अवगत करीत नाही, तर साऱ्या मानवी भाव-भावनांना आणि जगण्याला जाणून घेतो. काही काळानंतर त्याची मुलीसोबत ताटातूट होते. त्याच्या विशेष बोलण्या आणि वागण्यामुळे त्याला ठिकठिकाणाहून पळविले जाते. कैक वर्षे पिंजऱ्यात राहूनही तो आपल्या मूळ मालकिणीकडे जाण्याच्या प्रयत्नात असतो. संधी मिळताच कैक संकटांना पार करत तो तिच्याकडे जाण्यास सज्ज होतो. अफाट मनोरंजनमूल्य असलेला हा चित्रपट आज डीव्हीडीवर मिळत नाही, पण अपलोडर्सच्या सौजन्यामुळे त्याची एक यथातथा असली तरी पूर्ण लांबीची प्रिंट यूटय़ूबवर उपलब्ध आहे. ज्यांना पक्ष्यांबद्दल कुतूहल असेल, त्यांना यातील पोपटाचा अभिनय आणि बडबड चकित करून सोडेल. चित्रपटात स्पेशल इफेक्ट असले तरी वास्तव जगातही आपल्याला थक्क करून सोडतील इतकी तंतोतंत मानवी भाषा बोलणारे पोपट अस्तित्वात आहेत.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Why Are performing satisfactorily mutual funds Rates So Low A Performance Analysis
समाधानकारक कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंडांची संख्या इतकी कमी कशी?

यूटय़ूबवर वैयक्तिक व्हिडीओजचे अपलोिडग २०१०पासून मोठय़ा प्रमाणावर झाले. तेव्हा प्राणी-पक्षी बाळगणाऱ्या मालकांना आपल्या पेट्सचे कौतुक जगजाहीर करायला आयते व्यासपीठ मिळाले. मांजरी आणि कुत्र्यांच्या करामतींना तोड नाही, इतके व्हिडीओज यूटय़ूबवर उपलब्ध आहेत. त्यात मांजरींचा बेरकीपणा दर्शविणाऱ्या व्हिडीओजची संख्या अधिक आहे. पण पोपटाचे मानवी भाषांचे अनुकरण करणारे व्हिडीओजही बऱ्यापैकी लोकप्रिय आहेत. हाताचा माईक आकार करून भाषण देणाऱ्या पोपटापासून ते ‘आय लव्ह यू’ म्हणत हसण्याचा आदेश देणारा पोपट पाहायला मिळतो. तसेच ‘क्या कर रहे हो’, ‘क्या बात है’, ‘हाऊ आर यू’ म्हणून कॅमेऱ्यासमोर मिरवणारे धाडसी पोपटही आढळतात. पाकिस्तानचा ‘आयेशा का बोलनेवाला तोता’ हा दहाएक मिनिटे कॅमेऱ्यासमोर बेधडक मानवी संवाद साधत लक्ष वेधून घेतो. हे गमतीशीर व्हिडीओ नाहीत. पोपट भाषा शिकत नाहीत, केवळ मानवी भाषेचे अनुकरण करतात, असा समज अनेकांना असतो. डिस्को नावाच्या पोपटाची १३०हून अधिक वाक्ये योग्य वेळी आपल्या मुखपोतडीतून काढताना पाहिले, की आपल्या पोपटांविषयीच्या अनेक अपसमजांना टाळे लागते.

‘पेट्स वाईल्ड अ‍ॅट हार्ट’ या बीबीसी मालिकेमध्ये डिस्को या पोपटाच्या पराक्रमांची माहिती चित्रबद्ध झाली आहे. या मालिकेतले काही तुकडे यूटय़ूबवर थेट पाहायला मिळतात. केवळ संभाषण किंवा संवादासाठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टेड टॉक’ या कार्यक्रमामध्येही उत्कृष्ट पोपटपंची चित्रबद्ध झाली आहे. आइनस्टाइन नावाच्या पोपटाची टा टेड टॉकमध्ये सर्व श्रोत्यांना चकित मोडमध्ये घेऊन जाणारे संभाषण प्रत्येकाने पाहायलाच हवे. आपल्या मालकिणीच्या हातातील खाऊच्या आमिषाने तो या टॉक शोमध्ये अचूक आणि बेतीव उत्तर देताना दिसतो. या पोपटाची भाषिक संवेदनक्षमता माणसांइतकीच असल्याचे लख्ख दिसून येते. कारण एकाच वेळी तो मालकिणीच्या प्रश्नाला मानवी भाषेत उत्तर देतो. त्याचसोबत प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडेही नीट लक्ष  देतो. एखाद्या निष्णात परफॉर्मरसारखा तो आपल्याला भेटतो. बीबीसीच्याच डॉक्युमेण्ट्रीमध्ये प्राध्यापक आयरिन पेपरबर्ग आइन्स्टाइन आणि इतर पोपटांच्या भाषिक कौशल्यावर अभ्यास करताना भेटतात. तब्बल १२ वर्षे निव्वळ पोपटांची भाषिक ज्ञानक्षमता पडताळण्यासाठी त्यांनी वेचली असल्याचे या व्हिडीओजवरून कळते. त्यांच्या मते भाषिक ज्ञान आणि मानवी संवेदना यांचे अस्तित्व पोपटामध्ये आहे. परिणामी त्यांच्याकडून मानवी उच्चारांचे अचूक ज्ञान होते. जगातील सगळ्याच पक्ष्यांना मानवाची शत्रू किंवा मित्र असल्याचे पारखज्ञान असते. या सर्व व्हिडीओजमध्ये मालकांची आपल्या पोपटाविषयी असलेले अपार कौतुक नजरेस पडते. पण त्याहून अधिक लक्षात येते, ते कॅमेऱ्यासमोर भीतीप्रूफ असणारी त्यांची अखंड मानवी बडबड आणि मानवप्रेम. त्यासाठीच या क्लिप्स डोळे, कान आणि विश्वास जागीच ठेवून अनुभवणे गरजेचे आहे.

 

मस्ट वॉच लिंक्स

पंकज भोसले  viva@expressindia.com