टीना बासू

खास बंगाली पद्धतीने बनवलेली नारळाच्या दुधातली चिंगरी (कोळंबी) मलाई करी, चिकन रेशमी कबाब, चंकी फिश फ्राय, डिप फ्राइड फिश, शोर्शे पोस्तो चिंगरी रेसिपी अशा अनेक पाककृती सध्या वेगवेगळे फ्यूजन करून मी लीलया बनवते. त्याचबरोबर झटपट पाककृती बनवण्यातही मी मास्टरी मिळवली. पण एक वेळ अशीही होती की मला जेवणातलं काहीच येत नव्हतं. आणि तरीही बंगाली खाद्यपदार्थाची चव माझ्या जिभेवर कायम रेंगाळत असायची.

२०१२ पासून मी खाद्यसंस्कृतीविषयी लिहायला सुरुवात केली. मी आधी कोलकात्याला राहत होते. त्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी बंगळूरुला आले. घरापासून दूर शिक्षणासाठी आल्यावर पेइंग गेस्ट म्हणून एकटं राहताना स्वतसाठीच रोज काही तरी वेगळं करण्याच्या प्रयत्नातून माझा जेवण बनवण्यात रस वाढू लागला. त्यानंतर नोकरीमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर स्वतच्या नव्या घरात वेगवेगळ्या पाककृतींचे प्रयोग करायला सुरुवात केली. तेव्हाच ब्लॉग लेखनाला सुरुवात केली. बंगाली असल्यामुळे घरात प्रामुख्याने बंगाली खाद्यपदार्थ बनायचे. मग त्यांचं फ्यूजन करायला मी सुरुवात केली.

बंगाली खाद्यसंस्कृती माशांच्या पाककृती आणि गोड पदार्थामुळे खवय्यांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. रसगुल्ला, साँदेश, मोहन भोग, लोबोंगो लतिका, मलाई चम चम, पंतुवा, पायेश यासारखे गोड पदार्थ तर माचार झोल, फिश पुलाव, फिश बिर्याणी, दाब चिंगरी आणि बंगाली लग्नांमध्ये बनणारी फिश कलिआ ही करीची पाककृती रुई आणि रोहू या श्रीमंत माशाच्या प्रकारांमुळे प्रसिद्ध आहे.

पण या व्यतिरिक्त चिकन, मटण आणि शाकाहारी पाककृतीही तितक्याच चांगल्या चवीच्या आहेत. रोजच्या जेवणात त्या आपण करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचा रस्सा असलेल्या पाककृतीही यात आहेत. मी शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीच्या पाककृतींना समान महत्त्व देते. त्यात खासकरून पारंपरिक बंगाली पदार्थ जे सहसा कुणाला माहिती नसतात, अशा पदार्थाची मी माहिती देते. त्यांच्या पाककृती ब्लॉगवर पोस्ट करते.

बंगालमधील माशांच्या पाककृतींसाठी गोडय़ा पाण्यातील मासे वापरले जातात. या माशांमध्ये वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत. त्यानुसार त्यांच्या करी बनतात. त्याचबरोबर ताज्या कोळंबीच्या पाककृतीही बंगाली घरांमध्ये आवडीने बनवल्या जातात. काही बंगाली पाककृती अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवाव्यात याविषयीसुद्धा मी लिहिते. रसगुल्ला खूपच प्रसिद्ध पाककृती आहे. त्यामध्ये मी विविध सीझनल फळांचा वापर करून कमीत कमी वेळात ती कशी बनवता येईल, त्याविषयी लिहिलं, ते ब्लॉग वाचकांना खूप आवडलं.

बंगाली खाद्यपदार्थामध्ये खडय़ा मसाल्याचा वापर अधिक होतो. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह मसाल्याचा फ्लेवर त्या त्या पाककृतीत उतरतो. आम्ही बारीक रव्यापासून हलवा बनवतो. त्याला सुजीचा हलवा म्हणतात. त्यातही तेजपत्ता आणि थोडंसं लवंग टाकतो. मोहरीसारखे काही मसाल्याचे पदार्थ शाकाहारी पाककृतींसाठी वापरले जातात.

माझ्या ब्लॉगवर मेन कोर्स, डेझर्ट, ब्रेकफास्ट, सॅलड, सूप आणि मी तयार केलेल्या फ्यूजन रेसिपीज तुम्हाला दिसतील. त्याचबरोबर खाद्यसंस्कृतीचा विचार करून तो एक वेगळा विभाग केला आहे. त्यात आशियाई, भारतीय, बंगाली, ब्रिटिश, इटालियन, मेक्सिकन, आंतरराष्ट्रीय असे उपविभाग आहेत. त्यानुसार पाककृती दिल्या आहेत.

डिझायनिंग मार्केटिंग क्षेत्रातील कामामुळे मी भारतभर फिरते. परदेशातही जाते. त्यामुळे आपले स्थानिक पदार्थ आणि आंतरराष्ट्रीय पदार्थातलं वेगळेपण काय, हे ओळखू शकले. कारण मी माझ्या बंगाली संस्कृतीची नाळ अजिबात तोडलेली नाही. उलट ती अधिकाधिक दृढ कशी होत जाईल यावरच माझा भर होता. मार्केटिंग गर्ल असल्यामुळे आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थाचं महत्त्व मी वेळोवेळी लोकांना विविध दाखले देऊन पटवून देते.

काही काही बंगाली पाककृती अशा आहेत, ज्या मुळात चवीला कशा लागतात, हे इतर प्रांतीयांना माहिती नाही. त्यांना फक्त हॉटेल रेस्टारंटमधील बंगाली पदार्थ खाल्ल्यावर वाटतं, तेच ऑथेंटिक आहे. पण तसं नसतं. याविषयी मी ब्लॉगवर लिहिताना काटेकोरपणे लिहिते. आपण अलीकडे जागतिक स्तरावरील इटालियन, जॅपनीज, चायनीज अशा खाद्यसंस्कृतीतील पाककृती वेगळं काही तरी चाखून पाहण्यासाठी त्यांचा आस्वाद घेतो. कधी कधी या खाद्यसंस्कृतीच्याच प्रेमात पडतो. परंतु भारतीय खाद्यसंकृतीमध्ये जितकी विविधता आहे, तेवढी जगात कुठेही नाही. आपल्या पारंपरिक पाककृती आपण विसरता कामा नये. आपल्या प्रातंवार, राज्यवार खाद्यसंस्कृतीमध्ये इतकं वेगळेपण आहे की त्यातल्या चवी, पाककृती करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी आपण टिकवल्या पाहिजेत, असं मला वाटतं.

संयोजन साहाय्य : भक्ती परब

viva@expressindia.com