|| गायत्री हसबनीस

कॉलेज कट्टय़ावर सध्या एक वेगळी ‘फॅनगिरी’ पाहायला मिळते आहे. फक्त सिनेमेच नाही तर वेगळ्या प्रयोगातून साकारलेल्या मालिकांचीही लोकप्रियता आणि त्यातूनही साकार झालेल्या फॅशनची चर्चा सगळीकडे वाढली आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘मार्वल्स मिस मेझल’, ‘फ्रेण्ड्स’, ‘बिग बॅन्ग थिअरी’, ‘रिव्हरडेल’, ‘शेरलॉक होम्स’ या ओटीटी प्लॅटफॉम्र्सवरच्या मालिकांची क्रेझ इतकी आहे की, त्याचेच चित्रण असलेले कपडे, वस्तू घेऊन मिरवण्यात तरुणाई रमलेली दिसते..

हॉलीवूडच्या कलाकृतींचा पसारा सध्या एवढा वाढला आहे की, तत्सम वापरातील वस्तू आणि कपडय़ांमधून विविध चित्रपट आणि मालिकांच्या कलाकारांचे चेहरे, त्यांचे डायलॉग्ज पाहायला मिळतात. महाविद्यालयीन तरुणांच्या मनावर त्यांचे प्रतिबिंब सहज उमटते. ‘हॅरी पॉटर’ ही फिल्म सीरिज जशी लोकप्रिय होत गेली तसेच साध्या स्टेशनरीपासून कपडे आणि घरगुती वस्तूंवर हॅरी पॉटर दिसू लागला होता. बघता बघता तरुणाईच्या जीवनशैलीचा तो एक मोठा भाग बनून गेला. ‘हॅरी पॉटर’मधील आपल्या आवडत्या कॅरेक्टरचा एखादा टी-शर्ट विकत घेण्यापासून ते त्याचे कव्हर, पोस्टर बेडरूममध्ये लावण्यापर्यंतची क्रेझ निर्माण झाली. त्यानंतर मग ‘स्पायडरमॅन’, ‘बॅटमॅन’ वगैरे सुपरहिरोजची क्रेझ वाढतच गेली. नंतरच्या काळात चित्रपट बदलले तसे हे सुपरहिरोही बदलले. ‘माव्‍‌र्हल’ चित्रपट मालिका ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’, ‘अ‍ॅव्हेन्जर्स’, ‘कॅप्टन अमेरिका’ यांच्याबरोबरीने ‘स्टार वॉर’, ‘अवतार’ या चित्रपटांतील व्यक्तिरेखांचे चित्रण असलेले कपडे, शूज, वॉचेस, बॅग्ज, पाऊच, ट्रेकिंग किट अशा वस्तूंनी ई बाजार भरला. ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध झालेल्या या नव्या पर्यायांमुळे कॉलेज कट्टय़ावर एक वेगळीच ‘फॅनगिरी’ सुरू झाली. सध्या तर वेबसीरिजचा प्रभाव तरुणाईच्या फॅशनवर नव्हे एकूणच जीवनशैलीवर पाहायला मिळतो आहे.

यंदा एप्रिलची सुट्टी लागल्याबरोबरच तरुणाईच्या आवडत्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेची सुरुवात झाली आहे. २०११ साली सुरू झालेल्या या लोकप्रिय मालिकेचा या वर्षी हा शेवटचा सीझन आहे. त्यामुळे यंदा तरुणांसाठी हा सीझन आणि ही एप्रिलची सुट्टी विशेष महत्त्वाची आहे. समाजमाध्यमं, ऑनलाइन साइट्स, स्टेशनरीमध्ये ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्याच आकृत्या आणि प्रतिमा दिसत आहेत. मालिका जितकी लोकप्रिय ठरते आहे तितकेच त्या मालिकेवर मनापासून प्रेम करणारे तरुण फॅन्सही तितकेच सज्ज झाले आहेत. जीओटीवरचे प्रेम व्यक्त करताना ‘#विंटर इज कमिंग’, ‘#द फायनल सीझन’, ‘#ड्रॅगन्स अ‍ॅन्ड स्वॉर्ड्स’, ‘#रियुनियन’ असे हॅशटॅग सोशल मीडियावर शेअर होत आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘विंटर इज हिअर’, ‘इट्स नाऊ ऑर नेव्हर’ अशा वाक्यांचे टी-शर्ट्स घालून आपल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपसह फोटोज आणि सेल्फीज फेसबुक, इन्टाग्रामवर पोस्ट केले जात आहेत. ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे प्रत्येक हाऊस आणि त्या हाऊ सचे मोटो तसेच सिगिल्सच्या प्रिंटेड टी-शर्टची क्रेझ जास्त आहे आणि असे टी-शर्ट हे मिन्त्रा, अ‍ॅमेझोन, फ्लिपकार्ट या संकेतस्थळांवर ४०० ते १००० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वत्र सोशल मीडिया आणि कॉलेज कट्टय़ावर, फ्रेन्ड्स सर्कलमध्ये फक्त जीओटीची हवा आहे. कपडेच नाही तर बॅग्ज, स्टेशनरी, फर्निचर, कॅप्स, की-चेन, फ्रिज मॅग्नेट, वॉल पेंटिंग, पोस्टर्स, पेन ड्राइव्ह कव्हर, कुशन्स, अभ्रे, पिलोज अशा नाना तऱ्हेचे ‘जीओटी’ क लेक्शनची जमके खरेदी तरुणाईकडून सुरू आहे.

माव्‍‌र्हल कॉमिक्स, रेड वूल्फ, रेड बबल अशा ऑनलाइन स्टोअर्सवरती ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘अ‍ॅव्हेन्जर्स’, ‘कॅप्टन माव्‍‌र्हल’ अशा अनेक चित्रपटांच्या डिझाईन आणि चित्रांचे टी-शर्ट मिळतील. ‘अ‍ॅव्हेन्जर्स’मधील ब्लॅक पँथर, आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका अशा सुपरहिरोजचे टी-शर्ट यल्लो, चारकोल, ग्रे, ग्रीन, ब्लॅक या रंगांच्या शेड्समध्ये आहेत. ‘नाईव्ह मॅन’ या स्टोअरकडून स्पेशल मेन्सवेअर कलेक्शन आहे ज्यात ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या खाल्लेसी, आर्या स्टार्क, डिनेरियस टार्गार्येएन, किंग स्लॅयर अशा लोकप्रिय कॅरेक्टर्सचे टी-शर्ट्स उपलब्ध आहेत. या कलेक्शनमध्ये राऊंड नेक टी-शर्ट्स आहेत. ‘वालर मार्घुलिस’ या नाण्याच्या पिंट्रचे शर्ट्स, ‘अ‍ॅस्ट्रोलाब’, ‘टार्गार्येएन सर्कल’ या प्रतीकांचे चित्र असलेले विविध टी-शर्ट्सही उपलब्ध आहेत. ‘अ‍ॅव्हेन्जर्स’मध्ये ‘थॉर’ या कॅरेक्टरची क्रेझ जास्त आहे. त्यामुळे ‘थॉर हॅम्पर’ पिंट्रचे शर्ट्स जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची एकूणच मुलांसकट मुलींमध्येदेखील क्रेझ जास्त आहे. त्यामुळे ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे पिंट्र्स असलेले युनिसेक्स टी-शर्ट, स्वेटशर्ट, झिपर, हुडी असे अनेक पर्याय बाजारात पाहायला मिळत आहेत. ‘लाइफ इज नॉट सिंपल’, ‘नो वन इज परफेक्ट आय अ‍ॅम नो वन’, ‘द नॉर्थ रिमेम्बर्स’, ‘द मायटी वायकिंग स्लॅयर’ आणि ‘द नाइट किंग इज कमिंग’ असे ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या लोकप्रिय कॅरेक्टरच्या डायलॉग्जचे प्रिंटेड शर्ट्स, जॅकेट्स स्वस्त दरात उपलब्ध आहेत. जीओटीमधील ड्रॅगन्स, वूल्फ आणि लायन्सही तेवढेच प्रसिद्ध असून वूल्फ नायजेरिया, टार्गार्येएन ड्रॅगन यांचे चित्र असलेले प्रिंट शर्ट्स हे युनिसेक्समध्ये जोरदार ट्रेण्डमध्ये आहेत. जे खास करून नेव्ही ब्लू या रंगात पाहायला मिळतात. वंडर वूमन, इन्फिनिटी वॉर यांचेही शर्ट्स उपलब्ध आहेत.

इतरत्र सगळीकडे ऑनलाइन साइट्सवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘अ‍ॅव्हेन्जर्स’, ‘जस्टिस लीग’ या चित्रपटांच्या फॅशनची चर्चा असताना ‘माव्‍‌र्हलस मिस मेझल’सारख्या वेबसीरिजही फॅशनच्या कक्षेतून सुटलेल्या नाहीत. या मालिकेतील फॅशनप्रमाणे हातातील वेलवेट हातमोजे, मिनी डिझायनर हॅट्स, लॉन्ग फर जॅकेट इत्यादी गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मिस मेझलच्या हॅटप्रमाणे डर्बी हॅट्स, वूल बेरेट, फ्लावर बेरेट अशा हॅट्सही आहेत, तर वेलवेट ग्लोव्हजमध्ये सॅटिन ग्लोव्हजदेखील आले आहेत.

केवळ कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजपुरते हे वेड मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे या चित्रपट-मालिकांप्रति असलेले आपले प्रेम सिद्ध करण्याची धडपड सध्या तरुणाईत सुरू आहे. तरुण मुलांनी गिटारवर, पियानोवर जीओटीची टय़ून वाजवण्यापासून ते बॅण्ड ग्रुपमधील तरुणांना ती टय़ून शिकवण्यापर्यंत वेगवेगळे प्रयोग केले आहेत. अगदी या वर्षीच्या पाडव्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या एका शोभायात्रेतही नाशिक ढोलच्या सुरातून जीओटीची टय़ून व्यक्त झाली. मोबाइलच्या कॉलर टय़ूनपासून वॉलपेपरही जीओटीचेच ठेवले जात आहेत. जीओटीमधील पुरुष कलाकारांसारखी बीयर्डची स्टाईल वापरून हल्ली मुलांची स्टाईल स्टेटमेंट तयार होते आहे. जीओटीवर मिम्सची क्रेझही सुरू झाली असून त्यामुळे सोशल मीडियावर जीओटीचा वेगळाच धुमाकूळ पहायला मिळतो आहे. त्याचबरोबर ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या संगीताचा एक स्वतंत्र म्युझिकल बॉक्सही ऑनलाइन उपलब्ध आहे ज्यात फक्त एक चावी फिरवली की ‘जीओटी’चे संगीत ऐकायला मिळते. अगदी ग्रुपने जमून ही मालिका पाहण्याचा आणि छायाचित्रे शेअर करण्याचे वेड तरुणाईपासून सेलेब्रिटी कलाकारांपर्यंत सगळ्यांमध्ये पाहायला मिळते आहे.
सध्या चित्रपटांच्या लोकप्रिय कॅरेक्टर्सच्या प्रिंट्सचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज फॅशनच्या आणि एकूणच जीवनशैलीच्या चौकोनात तरुणांची ही ‘फॅनगिरी’ अगदी पुरेपूर फिट झाली आहे. साधी भेटवस्तू देतानाही अशा फॅशनचा विचार केला जातो. तरुणाईचे वेड ओळखून फॅ शन बाजारही सज्ज होत असल्याने आपल्याला आवडलेल्या चित्रपट-मालिकेतील आवडती गोष्ट घेऊन मिरवण्याचा हा जीओटी स्व्ॉग इतक्या लवकर संपणारा नाही हे खरे!