19 February 2020

News Flash

लखलख तेजाची..

बुद्धीची देवता असलेला गणपती कलेची देवता म्हणूनही ओळखला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

|| तेजश्री गायकवाड

बुद्धीची देवता असलेला गणपती कलेची देवता म्हणूनही ओळखला जातो. याच देवतेला नमन करून तरुण कलाकार गणेशाच्या सुंदर मूर्ती घडवत असतात. अगदी बारीक कलाकुसर करत मूर्ती घडवल्यानंतर त्याला दागिन्यांचा साज चढवण्याचा एक नवा ट्रेण्ड रुजला आहे. खास गणपतीच्या मूर्तीला हिरे-मोत्यांनी मढवत आपल्यासमोर आणणाऱ्या तरुण कलाकारांचे काम जितके सुंदर तितकेच नाजूक असते..

गेल्या काही वर्षांपासून गणपतीच्या मूर्तीवर केले जाणारे डायमंड वर्क ट्रेण्डमध्ये आहे. त्याला लोकांकडूनही वाहवा मिळत असल्याने या कामाची मागणीही वाढली आहे. साध्याशा गणेशमूर्तीवर केल्या जाणाऱ्या या नाजूक कामामुळे मूर्तीचा चेहरामोहराच संपूर्ण बदलून जातो. छोटय़ा छोटय़ा मूर्तीवर केली जाणारी ही कलाकुसर बघता बघता अनेक मोठमोठय़ा गणेशमूर्तीवरही दिसू लागली आहे. प्रसिद्ध मंडळांच्या मनमोहक मूर्तीरूपामागे अनेक तरुण काम करत आहेत. असाच एक तरुण प्रशांत सुखदेव ओगले. प्रशांत गेल्या १२ वर्षांपासून मूर्ती सजवण्याचं काम करतो आहे. ‘माझा मूळचा डाय मेकिंगचा व्यवसाय आहे. माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला अनेक चप्पल तयार करायचे कारखाने आहेत. त्या चपलांवरती लावले जाणारे खडे मला जातायेता खूप आकर्षित करायचे. खडय़ांची ही मनमोहक कलाकुसर मला भावली आणि अशीच कलाकुसर गणेशमूर्तीवर करावी, असा विचार मनात आला. मी त्या दृष्टीने थोडे संशोधन केले आणि माझ्या कामाला सुरुवात झाली,’ असे प्रशांत सांगतो. प्रशांत आजही वर्षभर नवनवीन डिझाइनसाठी रिसर्च करत असतो. आणि प्रत्येक वर्षी काही तरी नवीन डिझाइन साकारण्याच्या प्रयत्न करतो. ‘काही वर्षांपूर्वी एक  एक डायमंड मूर्तीवर लावला जायचा. आता त्यातही बदल होत गेलेत. सध्या डायमंडची चेन मिळते ती लावायला सोप्पी पडते. डायमंड चिकटवण्याच्या पद्धतीतही मी प्रयोग करून पाहिले, वेगवेगळ्या गमचा वापर करून काय फरक पडतो, त्याचाही अभ्यास केला,’ असं तो सांगतो. मूर्तीला रंग देऊन झाला की त्यांचं काम सुरू होतं. प्रत्येकाच्या डिमांडनुसार डायमंड, मेटल, लेस यांचा वापर करून हे डायमंड डिझाइनिंग केलं जातं. हल्ली लोकांना प्लेन डायमंडपेक्षा रंगीबेरंगी डायमंड वर्क हवं असतं. अनेक फुटांच्या मोठय़ा मूर्तीवरचे डायमंड वर्क पूर्ण करायला ५ ते ७ दिवस सहज जातात, अशी माहिती प्रशांतने दिली.

प्रशांतकडे अगदी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’च्या मुलांपासून अनेक तरुण ही कला शिकायला येतात. सोशल मीडियाच्या काळातही प्रशांत त्याच्या कामाचे फोटो टाकून कौतुकही मिळवत नाही किंवा कामही मिळवत नाही. उलट, माझ्या कामामुळेच लोक स्वत:हून माझा पत्ता शोधत येतात, असं तो म्हणतो. प्रशांतप्रमाणेच नोकरी करत स्वप्निल सराफदारसुद्धा अनेक वर्षांपासून मूर्ती सजवायचं काम करतो आहे. गणेशोत्सवाच्या आधी खास नोकरीतून सुट्टी घेऊन तो हे काम करतो. त्याबद्दल तो म्हणतो, आम्ही दिवसरात्र काम करतो. ऑर्डर पूर्ण करायच्या काही दिवस आधी मी ऑफिसमधून खास सुट्टी काढून हे काम करतो.  लहनपणापासूनच आमच्या इमारतीमध्ये मूर्तिकार कसं आणि काय काम करतात हे मी बघत आलो आहे. अगदी तेव्हापासूनच मला या गोष्टीची आवड जडली, असं त्याने सांगितलं. प्रशांतकडे सध्या मुंबईतल्या अनेक नामांकित गणेश मंडळांच्या मूर्ती सजवण्याचं काम आहे. ‘मी जेव्हा हे काम करायला सुरुवात केली तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं. हळूहळू बघून मग स्वत: प्रयत्न करायला लागलो. आता या कलेत माझा कोणी हात पकडू शकत नाही, असं मला वाटतं. सुरुवातीच्या काळत मी नवनवीन प्रयोग करण्यासाठी भुलेश्वर मार्केटमध्ये जाऊन स्वत: सामान आणायचो आणि त्याने वेगवेगळ्या डिझाइन्स ट्राय करायचो. कवडी, डायमंड, खडे असं सगळं एकत्र असलेलं काम सध्या जास्त ट्रेण्डमध्ये आहे. साधारण लहान मूर्तीचं काम करायला दोन ते अडीच दिवस जातात तर मोठय़ा मूर्तीचं काम करायला १० ते १५ दिवस सहज जातात, असं प्रशांतने सांगितलं.

पेशाने वकील असलेला समृद्ध लुडवेही गेल्या चार वर्षांपासून निव्वळ आवड म्हणून डायमंड डेकोरेशनचं काम त्याच्या तरुण मुलांच्या टीमसोबत करतो आहे. ‘मी असंच मित्रांसोबत मूर्ती घडवत असताना त्यावर रंग लागत असताना बघायला जायचो. पण मला सतत वाटायचं की यात काही तरी कमी आहे. ती कमी भरून काढय़ासाठी मी स्वत: डायमंडचं काम करायला सुरुवात केली. एकदा एका मंडळाला काम आवडलं आणि तिथून मग मी अनेक मंडळाची कामं घेऊ  लागलो,’ असं समृद्ध सांगतो. सुरुवातीला त्याने केवळ गणेशाचे दागिने बनवले. आणि मग पुढे डायमंडचं काम सुरू केलं. तेव्हा माझ्याकडे अनेक तरुण मुलं ते काम बघायला यायची. अनेकांना ते शिकायची इच्छा असते. मग मी त्या मुलांना शिकवतो, तर काहींना  वेगवेगळ्या मूर्ती कारखान्यांमध्ये पाठवतो, तिथे प्रत्यक्ष काम बघून त्यांना शिकता येतं. दिवसभर कॉलेज करून ती मुलं उत्साहाने रात्री काम करायला येतात, असं तो म्हणतो. समृद्ध मात्र सोशल मीडियाचा वापर करून काम मिळवण्यावर भर देतो. ‘आमचं फेसबुक पेज आहे. त्यावर आम्ही केलेल्या कामाचे फोटो टाकतो. ते फोटो बघून ज्यांना आमचं काम आवडतं ते विश्वासाने आम्हाला काम देतात, मात्र निव्वळ पैशासाठी आम्ही हे काम करत नाही, हेही तो स्पष्ट करतो.

लोकांना उत्तम दर्जाचं काम मिळावं यासाठी मर्यादित काम घेऊन ते पूर्ण करतो. त्यासाठी २० ते ३० दिवस आधी बुकिंग घेतो. मग त्यानंतर कोणी कितीही पैसे दिले तरी आम्ही ते काम घेत नाही, कारण शेवटच्या क्षणाला केलेलं काम योग्य नसतं आणि त्यामुळे पुढच्या वेळी ते मंडळ आम्हाला विश्वासाने काम देणार नाही याची जाणीव असल्यानेच जे आधी ठरलं आहे आणि जितकं झेपणार आहे तेवढंचा काम घेत असल्याचं समृद्धने स्पष्ट केलं.

अनेकांना असं वाटतं की खूप खडय़ांनी आपण मूर्ती मढवली तर ती छान दिसेल. मात्र तसं होत नाही. मूर्तीवर ते काम सुंदर दिसलं पाहिजे, त्यातील आखीवरेखीवपणा मूर्तीला मोहक दिसणारा असला पाहिजे, हे ध्यानात ठेवून काम करावे लागते. सध्या फायबर डायमंड, ग्लास रिफ्लेक्शन देणारे डायमंड ट्रेण्डमध्ये आहेत, अशी माहिती समृद्धने दिली. त्याच्या टीममध्ये सगळे तरुण कलाकार आहेत. ते वर्षभर आपण काय करायचं याचा अभ्यास करतात आणि टीमवर्कसह प्रत्येक मूर्तीचं काम पूर्ण करतात.

प्रशांत, समृद्धसारखे असे अनेक तरुण कलाकार गणेशमूर्तीवरचा हा चमचमता साजशृंगार आकर्षक करण्यासाठी झटत असतात. आपली कला आणि मेहनत यांच्या जोरावर ही मंडळी यातून आर्थिक मोबदलाही मिळवतात आणि समाधानही.. गणेशोत्सवातील हे मोजकेच दिवस त्यांना त्यांची कला दाखवण्यासाठी वाव मिळतो, ज्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न ही सर्जनशील तरुण मनं करताना दिसतात.

डायमंड वर्कप्रमाणे गणेशमूर्तीच्या अंगावर असलेले दागिनेही आपल्याला नेहमीच आकर्षित करत असतात. समृद्ध डायमंड वर्कसोबत हे दागिने बनवण्याचंही काम करतो. सोने, चांदी आणि कॉपर किंवा मिक्स धातू अशा अनेक धातूंपासून तो अशा दागिन्यांचे सेट गणरायासाठी बनवतो. अनेक मंडळांकडे सोन्याचे दागिने बनवून घेण्याइतपत आर्थिक सक्षमता नसते. मग त्यांच्यासाठी काही ग्रॅम सोनं आणि काही ग्रॅम दुसरा धातू मिक्स करूनही तो दागिने बनवून देतो. कर्णफुलं, अंगठी, बाजूबंद, दात आणि सोंडेवर लागणारी पट्टी, गळ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे हार असे अनेक दागिने या सेटमध्ये असतात.

First Published on August 23, 2019 12:10 am

Web Title: ganesh chaturthi 2019 mpg 94 2
Next Stories
1 मेट्रोच्या अडथळ्यांमधून गणेश मिरवणुकांना मार्ग
2 मुंबईतून काश्मीरमध्ये जाणाऱ्या गणेशमूर्तीसमोर विघ्न
3 मांडवांनी रस्ते व्यापले
Just Now!
X