गायत्री हसबनीस viva@expressindia.com
गेल्या वर्षी करोनाच्या सावटाखाली उत्सव साजरा करायचा की नाही या गोंधळातच गणरायाचे आगमन झाले होते. हरतऱ्हेचे निर्बंध पाळून गेल्या वर्षीचा गणेशोत्सव साजरा केल्यानंतर यंदा मात्र तरुणाई मनापासून गणेशाच्या स्वागतात रमलेली दिसते. गेल्या काही वर्षांत इको फ्रे ंडली गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह करोना कोळापासून अधिकच दृढ होत चालल्याचे दिसते आहे. घरच्या घरी के लेली आरास, नैवेद्य आणि एकत्रित कु टुंबाबरोबर गणेशोत्सवात रमलेली तरुणाई हे चित्र अधिक सुखावणारं आहे..

गणरायाच्या स्वागतासाठी महिनाभर आधीपासूनच तरुणाईची लगबग सुरू होते. गणपती येण्यापूर्वीच घरात सुरू असलेली लगबग ही जास्त करून सजावटीसाठी होत असते. घराच्या दरवाजाला तोरण, रांगोळी, भिंतीवर फुलांची सजावट, चहूकडे अत्तराचा सुगंध, दिव्यांची आरास, रोषणाई, गणपतीच्या बैठकीजवळची वेगळी आरास, सजवलेलं मखर, फुलांच्या माळा, प्रसाद आणि बरंच काही आपण आपापल्या परीने गणेशाच्या स्वागतासाठी कौतुकाने करत असतो. एरवी महिनाभर आधीच सुरू होणारी तयारी सद्य:परिस्थिती लक्षात घेत आठवडा – दोन आठवडय़ापूर्वी सुरू झाली होती. गणेशोत्सवाचे वेध पहिल्यांदा तरुणाईला लागतात. गणपती मग तो घरचा असो, चाळीचा असो वा गल्लीतील मंडळाचा.. सगळीकडे तल्लीनतेने गणरायाच्या आगमनाची तयारी करणारे तरुण दिसतात. गणपतीची मूर्ती कशी हवी इथपासून ते यावर्षीची आरास कशी असेल? मखर कोणत्या पद्धतीचं हवं? इकोफ्रे ंडली हवं असलं तरी त्याची सजावट करताना सामाजिक संदेश द्यायचा की एखादी भन्नाट कलाकृती घडवायची? असे एक ना अनेक प्रश्न आणि कल्पनांमधून गणपतीच्या सजावटीची तयारी सुरू होते. करोना पूर्णपणे गेलेला नाही, मात्र यंदा निर्बंधातून काहीशी सूट मिळालेली असल्याने तरुणाईच्या उत्साहाला जोर चढला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर देखील तरुण मंडळी आपल्या स्वत:च्या कौशल्याने आणि आपापल्या परीने गणरायाची सजावट करण्यात गुंतली आहे.

बऱ्याच वर्षांपासून इकोफ्रेंडली गणपती सजावटीवर भर दिला जातो आहे, तसा यंदाही पहायला मिळणार आहे हे नक्की. इकोफ्रेंडली आणि तंत्रज्ञानाच्या सोबतीने के लेले प्रयोग या दोन्ही गोष्टी सजावटीत प्रामुख्याने दिसतात. घरच्या घरी पण कौशल्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण सजावट करण्याकडे त्यांचा कल आहे. एकीकडे करोनाचे निर्बंधही पाळायचे आणि दुसरीकडे आपला उत्सव निगुतीने साजरा करायचा या दोहोंचा समतोल साधण्याचा प्रयत्नही अनेकांकडून के ला जातो आहे. विशाल शेट्टे याने आपण के लेल्या सजावटीच्या अनुभवाबद्दल विस्ताराने सांगितले.  ‘मी असं ठरवलं होतं की कमीत कमी खर्चात चांगल्यात चांगली सजावट करायची. मी सुरुवातीपासून  जास्तीतजास्त पर्यावरणस्नेही सजावट करण्यावर भर देत आलो आहे. माझ्या घरी सगळे इतर कामात व्यग्र असले तरी एकटय़ाने शेवटच्या चार – पाच दिवसांत चांगली सजावट कशी करता येईल याचा मी विचार के ला. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर टाळण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळे गेल्यावर्षी मी पत्रावळी, द्रोण यांच्यापासून गणपतीची सजावट केली होती. ही सर्व सजावट दीड हजार रुपयांत मी केली होती’. करोनाकाळात गणपतीच्या सजावटीवर होणारा खर्च बराच कमी झाला असल्याचा अनेक मुलांचा अनुभव आहे. विशालही याला अपवाद नाही. करोनापूर्व काळात पाच हजारच्या घरात एकूण सजावटीचा खर्च होत असे आणि आता करोनाकाळात कमी खर्चावर भर असल्याने तो दोन हजारच्या आत होतो, असं त्याने सांगितलं. ‘यंदा गणपतीच्या बाजूला मी मोराचा पिसारा करतोय. बरेच जण मला सांगत होते की खरी मोराची पिसं लावून तू कर. मी त्याला नकार दिला, कारण प्राण्यांची हानी करून मला सजावट नको होती म्हणून मी कागदापासून हा पिसारा तयार केला. कापडाचा मोर मी स्वत: घरी बनवला. त्याला थ्रीडी लूक मिळावा यासाठी त्यात कापूस भरला. मोराची पिसंही मी क्विलिंग पद्धतीने केली आहेत. त्यामुळे प्लास्टिक सोडून पूर्णत: कागद आणि कापडावर भर दिला असून घरगुती सजावटीसाठी रोषणाई जास्त के ली आहे’, अशी माहिती त्याने दिली.

तर यंदा विठ्ठलाच्या वारीच्या थीमसह गणपतीची सजावट करणारा मुकुंद पाबळे म्हणतो, गणपतीच्या मूर्तीखाली विठ्ठलाच्या वारीचे पेंटिंग मी केले आहे. ज्यात आम्ही विविध रंग वापरले आहेत, तर गणपतीच्या पाठीमागे विठ्ठलनामाचा आकार दिला असून त्यात निळा रंग वापरला आहे. त्यावर आम्ही यूव्ही लाइटने रोषणाई के ली आहे, जेणेकरून तो आकार थ्रीडीसारखा दिसेल. गणपतीच्या बाजूला आम्ही इलेक्ट्रिक पणत्या ठेवल्या आहेत त्याही घरच्या घरीच बनवल्या आहेत. यासोबतच यूव्ही लाइटही आम्ही घरीच बनवला आहेत. व्हाइट रंगाच्या बल्बवर चिकटपट्टी लावून त्यावर निळा रंग मारला आणि परत चिकटपट्टी लावून त्यावर जांभळा रंग मारला ज्यात जांभळ्या रंगाचे दोन लेअर लावण्यात आले आहेत. यापूर्वीही आम्ही कागदाच्या पट्टय़ा घेऊन सजावट केली होती. उदाहरणार्थ, कागदाच्या पट्टय़ांचा महाल. आम्हीही पूर्णत: पर्यावरणस्नेही सजावट करतो. आमची मूर्तीही शाडूची असते, अशी माहिती त्यांनी दिली.  संदेश गावकर हे खास गणेशोत्सवासाठी इरकलचे डेकोरेशन करतात. ‘यंदा आम्ही इरकल सर्कलचे डेकोरेशन केले आहे. हे वजनानेही खूप हलके आहे. गणपतीच्या पाठीमागे हे विविधरंगी इरकलचे डेकोरेशन फार खुलून दिसते. इरकल सर्कल आपण कसंही फोल्ड करू शकतो. यामध्ये केशरी, हिरवा आणि जांभळा रंग खास आहे. करोनामुळे इरकल साडय़ांचे भाव वाढल्याचे लक्षात आले, पण त्यामुळे खरेदीवर काही परिणाम झाला नाही’, अशी माहिती संदेशने दिली. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर करून के लेले विविध पद्धतीचे मखर, आरास आजही बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपल्या संकल्पना, हातात असलेलं मोबाइलचं तंत्रज्ञान यांचा योग्य वापर करून घरच्या घरी इको फ्रे ंडली डेकोरेशन करण्यावर तरुणाईचा भर आहे. तरुणाईच्या सर्जनशीलतेने गणेशोत्सवाला एक वेगळाच आयाम मिळतो. या उत्सवाला त्यांच्याकडून मिळालेली पर्यावरणस्नेही विचारांची जोड गणरायाचे आगमन अधिकच अर्थपूर्ण करणारी ठरली आहे.