मुलींची ढोल पथकं ही आता पुण्या-मुंबईची खास गोष्ट राहिलेली नाही. हे लोण औरंगाबादपर्यंत पोहोचलं आहे.
मुलींचं ढोल पथक ही आता नवलाईची बाब अजिबात राहिलेली नाही. पुणे- मुंबई- नाशिकमध्ये गणेशोत्सवात अशी अनेक मुलींची ढोल पथकं कार्यरत आहेत. आता हे लोण मराठवाडय़ापर्यंत पोहोचलं आहेत. गेल्या चार वर्षांपासून औरंगाबादमध्येही अशी पथकं दिसू लागली आहेत. ढोल आणि ताशा वाजविणं ही एके काळी फक्त पुरुषांची मक्तेदारी होती. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही.
औरंगाबाद येथील संगीता दौंड यांनी ढोलवादनाचं प्रशिक्षण घेतलं आणि आता इथल्या मुलींना त्या ढोलवादनाचे धडे देत आहेत. काडा ऑफिस मदानावर गणपतीच्या आधी महिनाभर या मुलींचा सराव सुरू आहे. औरंगाबादमधल्या २५ युवती आणि महिला यात सहभागी झाल्या आहेत. छत्रपती क्रीडा मंडळाअंतर्गत हे पथक ढोल वाजवणार आहे.
ढोल आणि ताशा वाजविणं हे इथे काहीसं गौण समजलं जायचं. कुठली तरी नशा करून तारवटलेल्या डोळ्यांनी, अंगविक्षेप करीत ढोल वाजविणारे तरुण असंच चित्र मराठवाडय़ातल्या ढोल-ताशा पथकांचं होतं. तसा समज सगळीकडे रूढ होता. हळूहळू जिथे लेझीम पथकं होती त्या ठिकाणी लेझीम पथकातल्या मुली आणि युवतींमध्येच ढोल-ताशे वाजविण्याची आवड निर्माण झाली. केवळ हौस आणि नवीन काही तरी करण्याची आवड यातून या क्षेत्रात मुलींचा शिरकाव झाला. यापकी कित्येक मुली आता ढोलवादनामध्ये एक्स्पर्ट झाल्या आहेत.
ढोल वाजविण्यापेक्षा तो कमरेला व्यवस्थित बांधणं आणि सांभाळणं हे एक दिव्य असतं. कारण तो जास्त घट्ट बांधला गेला तर वादकाला त्रास होतो. सल बांधला गेला तर घसरून जातो. त्याच्यावर सतत आघात होत असतात. त्यामुळे त्याची पोझिशन सतत स्थिर आणि वादकाला सुखावह अशी राहणं महत्त्वाचं असतं. अशी पोझिशन राखता येईल अशा रीतीने ढोल किंवा ताशा कसा बांधायचा हे शिकण्यापासून सुरुवात होती. ढोल आणि ताशा वाजविण्यापूर्वी टय़ून करावा लागतो. म्हणजेच त्याचे स्क्रू अथवा नटबोल्ट पिळून त्याच्या दोनही पृष्ठभागांना आवश्यक तो ताण निर्माण करावा लागतो. हे असे बारकावे शिकण्यापासून मुलींची सुरुवात झाली.
औरंगाबादच्या छत्रपती क्रीडा मंडळाच्या प्रशिक्षक संगीता दौंड म्हणाल्या, ‘ढोलवादन हे दिसायला सोपं असलं तरी प्रत्यक्षात करण्यासाठी बरंच कष्टाचं आहे. जोपर्यंत त्याची सवय होत नाही, तोपर्यंत ते त्रासदायकही वाटतं. कमरेला ढोल बांधणं आणि त्यावर हातातील छडय़ांचा आघात करून तो पाच ते सात तास सतत वाजविणं यासाठी स्टॅमिना लागतो. तो सरावानेच येतो.’
बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षांला शिकणारी मीनाक्षी टाक आता ढोल वाजवण्यात तरबेज झाली आहे. ती म्हणाली, ‘लहानपणी मिरवणुकीत ढोल वाजवताना पाहत होते. त्यातूनच आवड निर्माण झाली. सुरुवातीला जरा भीती वाटली; परंतु आता सरावाने ढोल छान वाजविता येतो. त्यामुळे आता मिरवणुका पाहणाऱ्यांची गर्दी मला ढोल वाजविताना पाहणार आहे. हे थ्रिलिंग वाटतं.’ इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांला असणारी अपूर्वा बेडेकर म्हणाली, ‘ढोल वाजविण्याची खूप इच्छा होती. गेल्या दोन वर्षांपासून मी या मंडळात सहभागी झाले आहे. त्यामुळे खूप भारी वाटत आहे. ढोलाचा आवाज काही वेगळाच आनंद देऊन जातो.’ ढोल वाजविणं हे अत्यंत ताकदीचं काम आहे. ते मुलींना जमणार नाही असा सगळ्यांचा समज होता. तोही या मुलींनी असत्य ठरविला आहे.