जितक्या दूरवरचं दिसेल तितकं दूर पाहून थांबणारी नजर डोळ्यांची. पण ‘दृष्टी’ला कशाच्याही सीमा नाहीत. एखाद्याला किंवा एखादीला दिसत नाही म्हणजे ती व्यक्ती अंध अशी आपल्या समाजाने केलेली व्याख्या. अशा व्यक्तीला आपण ‘दृष्टिहीन’ असं म्हणतो. पण हाही शब्द खटकावाच असा! कारण, डोळे अधू असले तरी दृष्टी नाही. ‘न दिसण्यावर’ मात करणाऱ्या मनश्री सोमण, योगिता तांबे, आणि प्रशांत बानिया या तीन ‘दृष्टिवंतां’च्या प्रवासाची यशस्वी वाटचाल याचीच साक्ष पटवून देते. कलेची दृष्टी गवसलेल्या या दृष्टिवंतांनी दिसत नसूनही गणपती ‘पाहिला’.. खरं तर अनुभवला. या ‘दृष्टिवंतां’ना ‘जाणवलेला’ गणपती त्यांनी यंदा मुंबईच्या एका सार्वजनिक गणपती मंडळासाठी साकारायचा ठरवला. या तिघांनी साकारलेल्या आठ वेगवेगळ्या रूपांतील गणपतींचं दर्शन यंदा मुंबईच्या एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत होणार आहे.
लोअर परळचं ‘पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ’ या अंध त्रयीने साकारलेल्या आठ गणपतींचा देखावा यंदाच्या गणेशोत्सवात उभारत आहे. हे तिघेही उच्चशिक्षित आणि आपापल्या नोकरी-व्यवसायात व्यग्र असणारे. यांना त्यांच्या गणपतीपर्यंत पोहोचवणारा दुवा आहे त्यांचा डोळस मित्र सुमित पाटील. ‘सुमित दादा आमच्या ग्रूपचा कॅप्टन आहे’, असं ही मंडळी आनंदाने सांगतात. सुमित पेशाने आर्ट डायरेक्टर. तो चित्रपटांसाठी कामं करतो. पण पंचगंगा सार्वजनिक मंडळाच्या सामाजिक बांधीलकी असलेल्या उपक्रमांसाठी दर वर्षी वेळ देतो. या वर्षी आम्ही ‘डोनेट आइज’ अशी थीम निवडली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला डोळ्यांचं महत्त्व कळावं हा त्यामागचा हेतू आहे. गणपती साकारण्याबरोबरच या तिघांनी केलेली बाकीची सजावटही इथे आलेल्यांशी संवाद साधेल आणि इथून जाण्यापूर्वी लोकांना डोळ्यांचं महत्त्व नव्याने कळेल अशी आशा आहे, असं सुमित पाटील म्हणतो.
viv04या आपल्या तीन रूढार्थानं दृष्टिवंत मित्रांशीही यानिमित्ताने मनमोकळ्या गप्पा झाल्या. मनश्री सोमण हिने आर्किऑलॉजी या विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिने संगीतविशारदाच्या दोन परीक्षा दिलेल्या आहेत. २००५ सालच्या बालश्री पुरस्काराची ती मानकरी होती. तिच्याचसारख्या रूढार्थाने दृष्टिहीन असलेल्या व्यक्तींपैकी ती पहिली ‘एल. आय. सी एजंट’ आहे. ६ -७ महिन्यांपासून ती जर्मन भाषा शिकत आहे. ‘लहानपणापासून गणपतीची आरास, सजावट कशी केली जाते याविषयी आईबाबांकडून ऐकलं होतं. एका कार्यक्रमात मला बोलावलं तेव्हा पेंटिंगच्या निमित्ताने सुमितदादाशी ओळख झाली. त्याने माझी पेंटिंगची आवड लक्षात घेऊन माझ्याकडून कॅनव्हासवर गणपती काढून घेतला आणि पेंट करून घेतला. अशा प्रकारे या वर्षी गणपतीची डेकोरेशन्स आणि गणपती बनवायला सुरुवात झाली’, मनश्री म्हणते. मनश्रीला भविष्यात गाण्यात करिअर करायचं असून परिस्थितीमुळे ज्यांना गाणं शिकता येत नाही अशा अपंग आणि गरीब मुलांना गाणं शिकवण्याची तिची इच्छा आहे.
मनश्रीने तयार केलेल्या गणपतींपैकी पहिला गणपती आहे स्क्रॅपपासून बनवलेला गणपती. हा गणपती तयार करण्यासाठी ती घाटकोपरच्या इंडस्ट्रियल एरियात जाऊन घमेलं आणि तत्सम उपकरणांचं वेल्डिंग कसं करायचं हे शिकली. वेल्डिंग करताना उडणाऱ्या ठिणग्यांमुळे सुरुवातीला तिला भीती वाटली. पण नंतर भीती हळूहळू कमी होत गेली आणि आत्मविश्वासाने तिने हा गणपती साकारला. तिने तयार केलेला दुसरा गणपती आहे भांडय़ांपासून तयार केलेला गणपती. हा गणपती तयार करताना मनश्रीने गणपतीची पावलं आणि मांडय़ा तयार करण्यासाठी वाटय़ा आणि ग्लास वापरले आहेत. निरांजनाचे डोळे, चमच्यांचे कान आणि भिकबाळी म्हणून छोटी बाटली वापरली आहे. मनश्रीने तयार केलेला तिसरा गणपती आहे ‘फ्री हॅण्ड गणपती’. ‘गणपतीचं हे अमूर्त, निराकार स्वरूप. हा गणपती तयार करताना कागद फोल्ड करायचा आणि उघडायचा. कागदाच्या एका बाजूला रंगांचे थेंब टाकायचे. कागद परत फोल्ड करायचा. उघडायचा. त्यातून जे तयार होईल तो गणपती’.. ती सांगते. नेहमीच्या विशिष्ट आकारापेक्षा वेगळा असलेला हा ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट’ गणपती.. निर्गुण निराकार.
योगिता तांबेशी गप्पा मारताना तिने २०११ साली इतिहासात एम. ए. केल्याचं सांगितलं. सध्या ती जोगेश्वरीच्या अस्मिता विद्यालयात संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. ती साधारण २५-३० वाद्यं वाजवते. शाळेत असताना तिला संगीत हा विषय कम्पल्सरी होता. शाळेने तबला, ढोलकी, हलगी, दिमडी, नगारा अशी खूप वाद्यं हाताळायची संधी दिली असं योगिता सांगते. ‘२००८ साली युथ फेस्टिव्हलला ज्या वेळी मी नॅशनल लेव्हलवर ‘फोक ऑर्केस्ट्रा’ रिप्रेझेंट करत होते, त्या वेळी सुमित दादा ‘फाइन आर्ट्स’ रिप्रेझेंट करत होता. तिथेच आमची ओळख झाली. आमच्यात खूप गप्पा रंगायला लागल्या आणि आमची छान मैत्री झाली.. ती सांगते. योगिताने तयार केलेल्या गणपतींमधला पहिला गणपती आहे पद्मासन मुद्रेतला वाद्यांचा गणपती. यात तिने डफापासून गणपतीचं उदर, ढोलकीच्या मांडय़ा, खंजिरीचं तोंड, खेळण्यातल्या मृदुंगाचे डोळे, विणेचं गंध, वाद्यांच्या पानांचं सूप आणि सोंड म्हणून बासरीचा वापर केला आहे. एकेक वाद्य वाजवत ते एकमेकांवर रचून तिने हा गणपती तयार केला आहे. तिने तयार केलेला दुसरा गणपती आहे पानाफुलांचा गणपती. ‘गणपती ही मूलाधार चक्रावर विराजमान असलेली देवता आहे. पृथ्वी विश्वाचा मूलाधार आहे. वृक्षतोड, पर्यावरणाच्या एकूण ऱ्हासामुळे आपणच या मूलाधारावर कुऱ्हाड मारतोय. माझ्या मते, गणपती हा निसर्गात, कलेत, संगीतात आणि आपल्या शरीरातच आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीऐवजी पाना-फुलांचा, मातीचा गणपती तयार केला तर त्याचं विसर्जनही सहज होतं. याच भावनेतून हा गणपती साकारला’, योगिता म्हणते. भविष्यात योगिताला निसर्गसंगीताला ओ देणारे कलाकार घडवायचे आहेत. ‘आमच्या पिढीला जे रीमिक्स, डीजे म्युझिक ऐकायला मिळतंय त्यापासून आमच्या पिढीला मला दूर न्यायचंय. डीजे संस्कृतीचा मेंदूच्या लीम्बिक एरियावर परिणाम होऊन कलेच्या बाबतीतली रसग्रहणता हळूहळू कमी होत जाते हे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे संगीताचं पर्यावरणही बिघडतं. रसिकता टिकवून ठेवण्याकडे आणि आपलं संगीत निसर्गाशी कसं एकरूप आहे हे पटवून देऊन तसे कलाकार मला घडवायचेत,’ योगिता म्हणते.
प्रशांत बानिया या तिसऱ्या दृष्टिवंत मित्राने मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदवीशिक्षण पूर्ण केलं आहे. याशिवाय तो बासरीवादक आहे. चार र्वष युथ फेस्टिव्हलला बासरीवादन करून त्याने सुवर्णपदक मिळवलं आहे. युथ फेस्टिव्हलनंतर काही तरी वेगळं करायची इच्छा होती तेव्हा तो ओरिगामी शिकला. युथ फेस्टिव्हलदरम्यान त्याची सुमित पाटीलशी ओळख झाली. गेल्या वर्षीही पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळात या तिघांनी एक सांगीतिक कार्यक्रम केला होता. प्रशांतने या वर्षी तयार केलेल्या गणपतींपैकी पहिला गणपती आहे बास्केट गणपती. वेगवेगळ्या आकारांच्या बास्केट्स आणि सुपडी, खेळण्यातले बदक, मोर, गोल टोपली वापरून त्याने हा गणपती साकारला आहे. त्याने तयार केलेला दुसरा गणपती आहे ‘ट्रॉफीजचा गणपती’. सहज म्हणून ट्रॉफीजना हात लावल्यावर वेगवेगळ्या आकाराच्या आणि धातूंच्या ट्रॉफीजपासून गणपती बनवता येईल अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्याने हा गणपती तयार केला. वह्य़ांना वेगवेगळे कट्स देऊन त्याने वह्य़ांचा गणपतीही तयार केला आहे. प्रशांतला भविष्यात गाण्यात करिअर करण्याची इच्छा असून ओरिगामीचा छंदही तो जोपासणार आहे.
या तिघांच्या कलाकृती पंचगंगा मंडळ यंदाच्या उत्सवात मांडणार आहे. त्या बघायला येणाऱ्यांना एकदम हा देखावा दिसणार नाही. सुरुवातीचे काही सेकंद अंधारात चाचपडत गेल्यानंतर उजेड पडेल आणि या दृष्टिवंतांचे गणपती प्रेक्षकांपुढे येतील. ‘आपल्यासारख्या डोळसांना अंधारात चाचपडतानाच डोळ्यांचं आणि पर्यायानं नेत्रदानाचं महत्त्व कळतं. ते थेट पोचवण्यासाठी मुद्दाम ही क्लृप्ती करणार आहोत,’ असं यांचा डोळस मित्र सुमित सांगतो.
या दृष्टिवंतांची दृष्टी आपल्यासारख्या डोळसांच्या नजरेपाल्याड पोहोचलेली! त्यांच्या ‘दृष्टिकोनातून’ जगण्याकडे नव्याने पाहायला शिकवणारी! हॅट्स ऑफ बडीज!
लीना दातार