shabda-logoएखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

शब्द जसे उलगडत जातात तशी त्यातली गंमत वाढत जाते. एखादा माणूस आपल्याशी बोलत नसेल,अळीमिळी गुपचिळी असेल तर त्या माणसाबद्दल आपण काही जाणू शकत नाही, पण काही वेळा काही व्यक्ती अगदी रोजच्या उठण्याबसण्यातल्या असूनही शेवटपर्यंत कळतच नाहीत. आजचा शब्द असाच आहे. इतका परिचित,पण तरी आपल्या विविध रूपांनी पुर्ण गोंधळात टाकणारा. गॅराज या शब्दाचा असा सखोल वगरे विचार करावा लागेल असं वाटतंच नाही, कारण तो इतका परिचित, इतका रोजच्या वापरातला आहे की याचं असं काय बुवा गुपित आहे जे आपल्याला ठाऊक नाही? असा ठाम विश्वास असतो. पण चक्क या शब्दाने पुरतं गोंधळात टाकलंय.

साधारणपणे आपण  एक शब्द निवडतो. त्याचे विविध उच्चार जाणून घेतो आणि त्यातला अचूकपणाशी अगदी जवळ जाणारा उच्चार फायनल करतो. आज मात्र टोटल विन-विन सिच्युएशन आहे. आपण या शब्दाचे विविध उच्चार आधी तपासून बघू या. गॅरेज, गराज, गॅराज, गराश, गरॅज आणि इतरही. यापकी नेमका उच्चार कोणता याचा शोध घ्यायला गेल्यावर चक्क असं आढळलं की हे सर्वच उच्चार बरोबर आहेत. आपण ज्या शब्दाचा इतका सहज उच्चार करतो त्याची इतकी भावंडं आहेत हीच मुळात आपल्यासाठी बातमी असते. आपण बोलताना ‘गॅरेज’ हा उच्चार नक्की केलेला आहे. पण या शब्दाच्या अचूक उच्चारांत, गॅरेज अगदी खालच्या पायरीवर  आहे. अधिकतर ‘गॅराज’ हा ब्रिटिश उच्चार किंवा ‘गराश’ वा ‘गराज’ हा अमेरिकन उच्चारच स्वीकारण्यात आल्याचे दिसते. अन्य उच्चार पूर्ण चूक नाहीत पण तितकेसे प्रचलित नाहीत. गॅराज, गराज, गराश हीच रुपं जगाने स्वीकारली आहेत.

फ्रेंच शब्द ॠं१ी१ पासून २० व्या शतकाच्या सुरुवातीस हा शब्द प्रचारात आला. या शब्दाचा मूळ अर्थ आहे शेल्टर वा निवारा. गाड्यांना सार्वजनिकरित्या पाìकग करता यावे या दृष्टीने युरोपीय देशात जी सोय होती तिला गॅराज म्हटले जायचे. म्हणजे गाड्यांचा निवारा वा आश्रयस्थान. हा सार्वजनिक शब्द गाड्यांच्या वाढत्या संख्येसोबत मात्र खाजगी झाला. घराजवळची गाडी पार्क करायची जागा म्हणजे गॅराज आणि सामूहिकरित्या अनेक गाड्या पार्क होतात तो पाìकग एरिया असे दोन शब्द निर्माण झाले आणि मग त्यातच गाडी दुरुस्त करण्यासाठी ज्या ठिकाणी दिली जाऊ लागली ते दुरुस्तीकेन्द्र म्हणजेसुद्धा गॅराजच ठरले.

या प्रवासाकडे पाहिल्यावर गाड्यांइतकाच या शब्दाच्या उच्चाराचाही बराच मोठा प्रवास झाला आहे असे दिसते. यातला कोणता उच्चार आपल्या गॅराजमधून कोणासमोर व कधी वापरायचा आणि कोणता उच्चार पार्क करून ठेवायचा हे स्वातंत्र्य किमान या शब्दाच्या बाबतीत आपल्या हातात आहे एवढं नक्की.

रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com