तेजश्री गायकवाड

काय मग कशी सुरू आहे नवरात्र? गरब्याचा फेर धरला की नाही? कितीही नाही म्हटलं तरी नवरात्रीच्या नऊ  दिवसांमध्ये एक दिवस तरी आपण रास-गरबा खेळायला जातोच. जसजशी आपली लाइफस्टाइल बदलते आहे तसा त्याचा प्रभावही आपल्या सणवारांवर सहज पडताना दिसतोय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या सुरू असलेला नवरात्राचा सण. नवरात्राच्या सणामध्ये फक्त फॅशनचेच रंग बदललेले आहेत असं नाही, तर गरब्याचेसुद्धा कुठे ट्रॅडिशनल तर कुठे फ्युजन तर कुठे चक्क फिटनेससाठीचा गरबा असे तऱ्हेतऱ्हेने रंग बदललेले आहेत.

भारतीयांसाठी आपले बॉलीवूडपटांचे डायलॉग, सिनेमे, गाणी, डान्स म्हणजे जीव की प्राण असतो. त्यामुळे हीच आवडती, जिव्हाळ्याची गोष्ट सणांमधूनही आपल्याला भेटत राहते. गरब्यामध्ये तर गेली कित्येक वर्ष हिंदी चित्रपटांमधील गाण्यांवर ठेका धरला जातो आहे. छोटय़ा छोटय़ा नवरात्र मंडळांपुढे खेळल्या जाणाऱ्या रास गरबामध्ये हमखास बॉलीवूडची गाणी वाजवली जातात. बॉलीवूडच्या गाण्यांवर फेर धरता यावा म्हणून त्याला योग्य ती बीट देऊन ती वाजवली जातात. स्पेशल गरबा गाणी सोडून अशा बॉलीवूडच्या गाण्यांची प्रसिद्धी बघता यंदा अनेक मोठमोठय़ा शहरांमध्ये बॉलीवूड गाण्यांचाच गरबा रंगलेला दिसून येतो आहे. परंतु कितीही बॉलीवूड गाण्यांना तरुणाईची पसंती असली तरी काही टक्के तरुणाईला आजही फाल्गुनी पाठक यांच्या पारंपरिक गरबा गाण्यांवरच ठेका धरायला आवडतो. याविषयी ‘शो ग्लीट्स इव्हेंट्स आणि एण्टरटेन्मेट’चे ऑर्गनायझर संतोष सिंग सांगतात, ‘कितीही बॉलीवूड नंबर आले तरीही दांडियाची राणी असलेल्या फाल्गुनी पाठक यांची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. म्हणूनच आम्ही आजही स्पेशल फाल्गुनी पाठक यांचा शो नवरात्रामध्ये ठेवतो. तरुणाईला आजही अगदी ट्रॅडिशनल गाण्यांवर गरबा, दांडिया खेळायला आवडतो. बाकी वर्षभर फ्यूजन गाण्यांवर आयुष्य काढणारी तरुण मंडळी दांडिया, गरबा मात्र ट्रॅडिशनल गाण्यांवरच करण्यासाठी आग्रही असतात. इतकी वर्ष फाल्गुनी पाठक यांची गाणी नवरात्रामध्ये वाजत आहेत आणि ही प्रथा पुढेही सुरूच राहील असा माझा विश्वास आहे.’

ही प्रथा पुढे अशीच राहण्यासाठी आजचा तरुण वर्गच कारणीभूत असेल हे नमूद करायला संतोष सिंग विसरले नाहीत. असंच काहीसं मत असलेला ‘ईशान डान्स अ‍ॅकॅडमी’चा ईशान ठाकर सांगतो की, कितीही वेगवेगळी गाणी आली तरी पारंपरिक गाण्याला तोड नाही. त्यामुळे गाण्यांप्रमाणे पारंपरिक गरबा दांडियाच्या डान्स स्टेप्सलाही सगळ्यांची पसंती असते. त्यामुळे मी ट्रॅडिशनल गरबाच शिकवण्यावर भर देतो. डीपिंग, मेकिंग लटका झटका, १ टाळी, २ टाळी, ३ टाळी या काही स्टेप्स हमखास सगळ्याच वयोगटांतील लोकांना आवडतात. आमच्याकडे मित्रमैत्रिणी मिळून, एखाद्या सोसायटीमधले किंवा इमारतीमधले सगळे जण एकत्र होऊन गरबा शिकायला येतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी आजकाल गरबा इव्हेंटमध्ये अगदी साल्सा, जॅझ असेही डान्स प्रकार मुद्दाम ठेवले जातात. हे अगदीच इनोव्हेटिव्ह असलं तरीही पारंपरिक गरब्यामध्ये जी जादू आहे ती बाकी कशाला नाही. तुम्ही गरब्याच्या ट्रॅडिशनल स्टेप्स या अगदी माधुरी दीक्षित यांच्या १, २, ३  गाण्यांपासून ते ‘परी हुं मै’सारख्या गाण्यांवर सहज करू शकता, असं तो सांगतो.

एकंदरीत आपल्या सणासुदीला तरुणाई ‘गो ट्रॅडिशनल’चा नारा देत पुढे जातेय असं म्हणायला हरकत नाही. ट्रॅडिशनल गरबा हा फक्त मनोरंजन म्हणून न राहता आता चक्क फिटनेस आणि वजन कमी करायलाही वापरला जातो आहे. फिटनेस गरब्याचे छोटे छोटे वर्कशॉप यंदा बघायला मिळत आहेत. याबद्दल झुम्बा इन्स्ट्रक्टर श्रुती साळुंखे सांगते, ‘या नवरात्रीमध्ये मी नऊ दिवसांचं गरबा फिटनेस वर्कशॉप ठेवलं आहे. हाय आणि लो ऱ्हिदममध्ये केला जाणारा गरबा हा एक उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरबा फिटनेस कोणत्याही वयोगटांतील व्यक्ती करू शकते. गरब्याच्या ट्रॅडिशनल स्टेप्स हा वजन कमी करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. व्यवस्थित आहार आणि योग्य पद्धतीने गरबा केला तर २ दिवसांत १ किलो वजन नक्कीच कमी होऊ  शकतं. गरब्याच्या स्टेप्समुळे पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. सोबतच गरबा खेळताना शरीराचे अगदी सगळेच भाग वापरले जातात त्यामुळे शरीर लवचीकही होतं,’ अशी माहिती तिने दिली. काही स्टेप्समुळे तुमची कं बर शेपमध्ये येण्यास मदत होते आणि  आम्र्स व पायांचीही ताकद वाढते. हा एक उत्तम कार्डिओ आहे, असं श्रुती म्हणते. आपल्या आवडत्या गाण्यांवर थिरकत थिरकत वजन कमी करायला आणि फिट दिसायला कोणाला आवडणार नाही. त्यामुळेच फिटनेसचा हा प्रकार तरुणाईने आपलासा केला नसता तरच नवल होतं.

कोणताही सण-उत्सव म्हटलं की सर्वात आधी चर्चा होते ती ध्वनिप्रदूषणाची. ध्वनिप्रदूषणाविरोधात अनेक शहरांत कडक नियम आहेत, या नियमांना पाठिंबा देण्यासाठी आता ‘सायलेंट गरब्याला’ सुरुवात झाली आहे. या वर्षीही सायलेंट गरब्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईमध्ये ‘राजमहाल बँक्वेट् आणि थिंकिंगमंत्रा’ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या ‘लाइव्ह सायलेंट गरबा २.०’चे आयोजन केले आहे. लाइव्ह गरब्यासोबत ‘सायलेंट गरबा’ असा अनोखा अनुभव सध्या गरबाप्रेमींना मिळतो आहे. पर्यावरणाचे भान राखून करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ‘राजमहल बँक्वेट्स’च्या संचालिका अबोली आनंद म्हणाल्या, आम्ही नेहमीच नवीन आणि वेगवेगळ्या संकल्पना लोकांसमोर आणण्याचा विचार करत आलो आहोत. दोन वर्षांपूर्वी आम्ही शहरात सायलेंट गरब्याची क्रेझ सुरू केली आणि या वर्षी आम्ही ‘लाइव्ह सायलेंट गरबा २.०’ नावाचा अशा प्रकारचा पहिला जाहीर गरबा रंगवला आहे. या प्रकारात स्टेजवर सुरू असलेला लाइव्ह सिंगिंग परफॉर्मन्स हेडफोन्सद्वारे ऐकण्याचा आनंद घेत गरबा रंगतो. यासाठी खास ‘साऊंडप्रूफ बूथ’ तयार करण्यात आला आहे. ज्यात कलाकार पारंपरिक गरबा कराओके ट्रॅक हेडफोन्सवर ऐक ता येतात. ‘लाइव्ह सायलेंट गरबा’ ही अनोखी संकल्पना पहिल्यांदाच मुंबईकर आजमावत आहेत. थिंकिंगमंत्राचे प्रवक्ता तेजस तावडेच्या मते, अशी नवीन संकल्पना मांडणं हे एक आव्हानच होतं. लोकांना गरबा व दांडिया रात्रभर खेळण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणायची संकल्पना आम्ही मांडली. या कार्यक्रमात गरबा लाइव्ह परफॉर्मन्स आणि गाणी सादर होतील. मध्यरात्री २ वाजेपर्यंत कोणतेही नियम न मोडता हेडफोन्स लावून गरबा खेळण्याचा आनंद सध्या लुटला जातो आहे. हेडफोन्सकडे निवडण्यासाठी तीन ट्रॅक आहेत. त्यात थेट गरबा परफॉर्मन्स, बॉलीवूड, ट्रॅडिशनल गुजराती गरबा गाणी असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे संगीत उपलब्ध आहे. आपल्याला हवे ते संगीत निवडून गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद देणारा हा सायलेंट गरब्याच्या प्रकाराला आबालवृद्धांकडून प्रतिसाद मिळतो आहे. काळानुसार सामाजिक-पर्यावरणीय बदलांचे भान राखून योग्य ते बदल करत सणवार साजरे केले गेले तर त्याचा आनंद द्विगुणित होईल हे निश्चित!