|| प्रियांका वाघुले

कलाकार म्हणून आपण सतत फिट असायला हवं. कारण कलाकार हा प्रेक्षकांशी, समाजाशी संवाद साधणारा दुवा आहे, असे अभिनेता गौरव घाटणेकर म्हणतो. आपण किती वर्षे काम करतो, यापेक्षा आपण आपली भूमिका कशी सादर करतो, हे कलाकाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्यासाठी त्याने शारीरिक फिटनेसबरोबरच मानसिकदृष्टय़ा फिट राहण्यासाठीदेखील तितकीच मेहनत घेत राहणे आवश्यक असते, असे गौरव म्हणतो.

गौरवचा स्वत:चा फिटनेस फंडा काय आहे हे सांगताना तो म्हणतो, इतरांप्रमाणेच आधी फिटनेस म्हणजे दररोज जिमला जाणे आणि व्यायाम करणे असाच माझाही समज होता. पण कोणतीही गोष्ट वेळेनुसार कळत जाते. अगदी तसंच फिट राहाणं म्हणजे जिमला हजेरी लावून येणे नव्हे हेही लक्षात आलं. कोणतीही गोष्ट, कोणताही व्यायामाचा प्रकार मनापासून आणि जिद्दीने करायला हवा. आपण जे करतो आहोत ते आपण मनापासून, आवडीने केलं तरच त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर चांगला परिणाम होतो. फिटनेसच्या बाबतीत तर ते महत्त्वाचं आहे, असं तो म्हणतो.

त्यामुळे स्वत:ला आवडणाऱ्या गोष्टींमधून फिट राहण्याचा मार्ग निवडणे हा उत्तम पर्याय असल्याचे गौरव म्हणतो. स्वत: खेळाडू असून विविध खेळ खेळण्याची विशेष आवड गौरवला आहे. व्यायामाबरोबरच खेळाचाही तो स्वत:च्या शरीर निरोगी, हेल्दी ठेवण्यासाठी उत्तम प्रकारे उपयोग करून घेतो. व्यायाम आणि खेळ दोन्ही फिटनेससाठी महत्त्वाचे असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय त्याने घेतला होता, असं त्याने स्पष्ट केलं. क्रिकेटसारखा खेळ सगळ्यांनाच प्रिय असताना त्या सोबत स्क्वॉशही खेळत असल्याचे गौरवने सांगितले. स्क्वॉश हा खेळ शरीरासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे तो आवर्जून सांगतो. जिम, योगा याबरोबरच मैदानी खेळ हा अतिशय सुंदर पर्याय आपल्या फिटनेससाठी उपयुक्त ठरू शकतो, असं गौरव म्हणतो.

स्क्वॉश या खेळामुळे शरीराची लवचीकता वाढण्यासाठी मदत होते. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी हा खेळ उत्तम असून शरीराची झीज करण्यासाठी त्याचा फायदा होतो. याशिवाय मनाची एकाग्रता वाढण्यासाठीही या खेळाचा उपयोग होतो. जिम आणि त्याच्या जोडीने खेळ हा आपला फिटनेस फंडा असल्याचे गौरवने सांगितले.

viva@expressindia.com