15 December 2019

News Flash

स्वागतयात्रेत मुलींचाच जोर!

गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या प्रथेने तपपूर्ती केली आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणमधल्या या शोभायात्रांमध्ये सध्या मुलींची संख्याच अधिक दिसतेय.

| March 28, 2014 01:14 am

गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेच्या प्रथेने तपपूर्ती केली आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याणमधल्या या शोभायात्रांमध्ये सध्या मुलींची संख्याच अधिक दिसतेय. आपलं घर, नोकरी, शिक्षण सांभाळत मुली नियोजनापासूनची सर्व व्यवस्थेत हिरिरीनं भाग घेत आहेत.
गुढी पाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. पारंपरिक वेषभूषेत, प्रथेप्रमाणे मराठमोळ्या साजानं नटलेल्या तरुणी स्वागतयात्रांमध्ये नेहमीच दिसतात. पण स्वागतयात्रेची शोभा वाढवणं एवढय़ापुरतंच मुलींचं अस्तित्व मर्यादित नाही तर नियोजन, व्यवस्थापनापासूनच्या सगळ्याच आघाडय़ांवर मुलींचा टक्का सध्या वाढताना दिसतोय.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरू झालेल्या नववर्ष स्वागतयात्रांनी तपपूर्ती केली असून या स्वागतयात्रा आता शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग बनल्या आहेत. परिसरातल्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्याचा प्रयत्न या स्वागतयात्रा करत असतात. फक्त स्वागतयात्राच नाही तर वर्षभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे संघटन अधिक भक्कम करण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होताना दिसतो. स्वागतयात्रेच्या निमित्ताने एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुणाईच आहे. आयोजनापासून कार्यक्रमाच्या यशस्वीतेपर्यंतचं सर्व काम हीच तरुणाई आपल्या खांद्यावरून यशस्वीपणे वाहते. या तरुण संयोजकांमध्ये मुलींचं अस्तित्व गेल्या काही वर्षांत अधिक ठसठशीतपणे जाणवायला सुरुवात झाली आहे.
यंदाच्या स्वागतयात्रेसाठी तयारीत असलेल्या तरुणींची लगबगसुद्धा जोरदार सुरू आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याणच्या ध्वजपथक, ढोलपथक, झांजपथकासह सर्वच पथकांमध्ये सर्वार्थाने मुलांपेक्षा मुलींचा प्रभाव अधिक आहे.
डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या स्वागतयात्रेची तयारी दोन महिने आधीपासून सुरू होते. नव्या पथकांचा प्रयोग ही मंडळी करत असून यंदा ध्वजपथकाचा स्वागतयात्रेत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. या पथकात चाळीसपैकी तीस मुली आहेत. ‘ध्वजपथकाबद्दल कमालीचं आकर्षण होतं आणि यात माझ्या अनेक मैत्रिणीसुद्धा सहभागी होणार असल्यामुळे मीसुद्धा भाग घेतेय’, असं या वेळी सहभाही होणारी अंकिता देवळे म्हणाली. गणेश मंदिर देवस्थानच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होणारी सम्राज्ञी वेलणकर यंदा ध्वजपथकामध्ये सहभागी झाली आहे. पहिल्या स्वागतयात्रेपासून आत्तापर्यंतच्या सर्व पथकांमध्ये सहभागी झाले असल्याचे ती आवर्जून सांगते. इंजिनीअरिंगच्या शिक्षणानंतरसुद्धा अजूनही ती या स्वागतयात्रेत नेमानं सहभागी होतेय. आता खासगी कंपनीतला जॉब सांभाळून दोन तासांचा सराव ती नियमितपणे करते. मनाचा उत्साह वाढवणारा हा चांगला व्यायाम आहे, असं सम्राज्ञी सांगते.
संस्थांच्या ढोलपथकात सहभागी असणाऱ्या तरुणी ढोल ताणण्यापासून ते ढोलाची व्यवस्थित काळजी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वत: करतात. ‘कष्टाचं काम असलं तरी कुणाच्याही मदतीशिवाय हे काम करण्याचा आनंद वेगळा असतो’, असं या ढोलपथकातील वृशाली घाणेकर सांगते. चार्टर अकाऊंटन्ट असलेली वृषाली गेल्या दोन वर्षांपासून या ढोलपथकामध्ये सहभागी होऊन ताशा वाजवते.
यंदाच्या ठाण्यातल्या स्वागतयात्रेचं वैशिष्टय़ म्हणजे येथील ढोलपथक असणार आहे. विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने वीरगर्जना ढोलपथकाची निर्मिती करण्यात आली असून यंदा स्वागतयात्रेत हे पथक अग्रस्थानी असणार आहे. ठाणेकरांचं ढोलपथक म्हणून त्याची वेगळी ओळख निर्माण झाली असून यातही मुली अग्रभागी आहेतच. कल्याणमधल्या शिवगर्जना ध्वजपथाचा सरावदेखील जोरकसपणे सुरू असून तरुणींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. ‘आमच्यासाठी कोणतीही गोष्ट अवघड नाही. आम्ही एकत्र आलो तर खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. उत्साह, जल्लोष आणि आनंद या सर्वाचं मिश्रण या स्वागतयात्रेच्या निमित्ताने समाजाला देता यावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो’, असं मत कल्याणची तबलावादक स्वप्नगंधा करमरकर व्यक्त करते.
नववर्ष स्वागतयात्रेत मुलींचा सहभाग पहिल्यापासूनच आहे. पण गेल्या काही वर्षांत तो अधिकाधिक वाढतोय. डोंबिवलीच्या स्वागतयात्रेतील पथकांचे मार्गदर्शक विनय वेलणकर यांनी सांगितल्याप्रमाणे, महिलांचा शंभर टक्के सहभाग असलेली पथकंसुद्धा आता बनत आहेत. त्यामुळे मुलींचा प्रभाव वाढला आहे, हे नक्की!

मी गेल्या दोन वर्षांपासून ढोलपथकात सहभागी होत आहे. मी मिरवणुकीत ताशा वाजवते. आम्ही मुली ढोल ताणण्यापासून ते ढोलाची व्यवस्थित काळजी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी स्वत: करतात. कष्टाचं काम असलं तरी कुणाच्याही मदतीशिवाय हे काम करण्याचा आनंद वेगळा असतो.
वृशाली घाणेकर
(चार्टर अकाऊंटन्ट)

First Published on March 28, 2014 1:14 am

Web Title: girls in gudi padwa swagat yatra
Just Now!
X