13 December 2019

News Flash

ग्लोबल देसी डिझायनर अनिता डोंगरे

जगभरातील बारा ब्रॅण्ड स्टोअर्सच्या माध्यमातून अनिता डोंगरे यांनी आपल्या ब्रॅण्डचा झेंडा जागतिक स्तरावरील फॅशन विश्वात फडकत ठेवला आहे.

|| तेजश्री गायकवाड

मराठी मध्यमवर्गीय घरातून येऊन फॅशनइंडस्ट्रीसारख्या ग्लॅमरस क्षेत्रात नाव कमवणाऱ्या नव्हे जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारी फॅशनडिझायनर म्हणजे अनिता डोंगरे. अनिता डोंगरेंनी गेल्या २० वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या ‘ग्लोबल देसी’ आणि ‘हाऊस ऑफ अनिता डोंगरे’ या ब्रॅण्ड अंतर्गत फॅशन विश्वात अनेक प्रयोग केले आहेत. जगभरातील बारा ब्रॅण्ड स्टोअर्सच्या माध्यमातून अनिता डोंगरे यांनी आपल्या ब्रॅण्डचा झेंडा जागतिक स्तरावरील फॅशन विश्वात फडकत ठेवला आहे.

फॅशन या शब्दापासूनही तसे दूरच राहणाऱ्या मध्यमवर्गीय घरापासून ते फॅशन इंडस्ट्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास उत्कंठावर्धक आहे. त्यांच्याया प्रवासाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल बोलताना, ‘माझा प्रवास हा आव्हानात्मक आहेच, परंतु तो तितकाच आनंददायकदेखील आहे’, असं त्या सांगतात. फॅशन इंडस्ट्रीत दररोज नवनवीन आव्हानं येत असत. आणि त्यातूनच मी अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकले आहे. मी लहान असल्यापासूनच मला डिझायनर व्हायचे होते. लहान वयातच माझ्या मनात हे पक्कं झालं होतं की मला फॅशन इंडस्ट्रीत जायचं आहे. लहान असताना मी माझ्या आजीच्या घरी जयपूरमध्ये बराच वेळ घालवायचे. राजस्थानचे सौंदर्य, रंगीबेरंगी बाजारपेठ, तिथलं आर्किटेक्चर, तिकडचे लोक इत्यादी सर्व गोष्टींकडे मी पूर्णपणे आकर्षित झाले होते. त्या वातावरणाचा अधिकच प्रभाव माझ्यावर पडला आणि त्यातूनच फॅशन क्षेत्रात यायची ओढ वाढली, असं त्यांनी सांगितलं.

फॅशन इंडस्ट्रीत यायचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनीमुंबईच्या एसएनडीटी महाविद्यालयातून फॅशनक्षेत्रातील पदवी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च्या ब्रॅण्डची सुरुवात करण्यापूर्वी मी आधी छोटय़ा बुटिकला माझे डिझाइन केलेले कपडे विकायचे, असं त्या सांगतात. डिझायनर म्हणून अनिता डोंगरे त्यांच्या ब्रायडल वेअरसाठी खूप प्रसिद्ध आहेत. ब्रायडल वेअरमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या कलेक्शनपासूनच वेगवेगळे आणि धाडसी प्रयत्न केले आहेत. आजपासून सुरू झालेल्या ‘व्होग वेडिंग शो’मध्येही एका वेगळ्या प्रकारचं ब्रायडल वेअर कलेक्शन त्या सादर करणार आहेत. ‘जेव्हापासून मी डिझाइन करायला सुरुवात केली तेव्हापासून नववधूंना आरामदायक वाटेल अशा पद्धतीने लग्नासाठी आरामदायक पोशाख तयार करायचा माझा कायम प्रयत्न राहिला आहे. ज्यामुळे त्यांचा पेहरावही उठून दिसायचा आणि तो दिवस त्यांच्यासाठी अधिक खास म्हणून नोंदला जायचा. लक्झरी आणि कम्फर्ट दोन्हीचं एकत्रीकरण ही एक संकल्पना होती जी मी भारतीय ब्रायडल वेअर इंडस्ट्रीमध्ये आणण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आजच्या माझ्या व्होग वेडिंग शोच्या ब्रायडल कलेक्शनमध्येही मी लक्झरी आणि कम्फर्ट एकत्र करून कलेक्शन सादर करते आहे. यामुळे नववधूला स्वत:च्या लग्नात इतरांप्रमाणेच जास्त एन्जॉय करता येईल’, असं त्या म्हणतात.

एकंदरीतच माझ्या कलेक्शनमध्ये सस्टेनेबिलिटी, पारंपरिकता आणि नावीन्य या तिन्हींचा विचार केलेला असतो. आणि अर्थातच डिझाईनिंगच्या बाबतीत माझं कलेक्शन लहानपणी पाहिलेल्या राजस्थानपासूनच प्रेरित आहे. त्यामुळे या सगळ्याचा सुंदर आविष्कार माझ्या कलेक्शनमध्ये पहायला मिळतो, असं त्यांनी सांगितलं. अनिता पर्यावरणाबरोबरच पारंपरिकतेबद्दलही सजग असलेल्या डिझायनर आहेत. आपल्या कलेक्शनमधून निसर्गाला, परंपरेला कधी धक्का बसेल अशी त्यांची कलाकृती नसते. त्यांच्या ब्रॅण्डच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक कारागिरांना काम करण्याची संधी दिली आहे. महिला कारागिरांनाही त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं असून या सगळ्याबरोबरच पर्यावरणाला नुकसानदायी ठरतील असे रंग, कापड मी कधीच वापरत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एवढय़ा वर्षांच्या प्रवासात अनेक गोष्टी आपल्या मनात घर करून राहतात. अशीच एक गोड आठवण अनिता यांनी सांगितली. ‘फॅशन इंडस्ट्रीतील इतक्या वर्षांच्या प्रवासातून निवडक आठवण सांगणं हे तसं माझ्यासाठी फारच कठीण आहे. पण इथे माझा खास अनुभव मला नक्की सांगावासा वाटतो. नुकतंच मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी वधू-वरांचा पोशाख डिझाइन केला होता, ती जशी खास आठवण आहे. तशीच आजवर अशा अनेक जोडप्यांच्या आयुष्यात खास ठरलेल्या त्यांच्या लग्नसोहळ्यांसाठी मी जे जे पोशाख डिझाइन केले ते कायम माझ्या मनात साठवलेले आहेत. अजून एक खूप आठवणीतली गोष्ट म्हणजे जेव्हा ‘सेवा’च्या (सेल्फ एम्प्लॉयड वुमेन्स असोसिएशन) महिला कारागिरांना ‘लॅक्मे फॅशनवीक’च्या क्लोजिंग शोमध्ये माझ्या ग्रासरूट शोसाठी आमंत्रित केलं गेलं होतं. तो खरोखरच माझ्या प्रवासातील एक वेगळा क्षण होता’, असं त्यांनी सांगितलं. माझ्यासाठी इतकी वर्ष सातत्याने काम करणाऱ्या, नेहमी पडद्यामागे असलेल्या त्या महिल्या कारागिरांना सगळ्यांसमोर रॅम्पवर आलेलं पाहून माझ्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नेहमीच काही नवीन करणं अनेकांना आव्हानात्मक वाटत असलं तरी माझ्यासाठी हे खूपच रोमांचकारी आणि उत्साहित करणारं आहे, असं अनिता म्हणतात. त्यांच्यासाठी फॅशनही एक भावना आहे आणि म्हणूनच मी इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करू शकते, असं मत त्यांनी व्यक्त केलं. ‘माझ्यासाठी फॅशनही पॅशन आहे. इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा कठोर परिश्रम आणि शिस्त या क्षेत्रात आहे. आपण काय करतो त्यावर आपण मनापासून प्रेम करणं आवश्यक असतं’, असं सांगतानाच फॅशनचा व्यवसाय गतिमान आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक आठवडय़ात नवीन ट्रेण्ड आणि शैली सादर केल्या जातात. ही इंडस्ट्री दरवर्षी डिझायनर्सच्या नवीन पिढय़ांचं स्वागत करते. या उद्योगात उभं राहण्यासाठी, आपल्याला सतत आपले नवनवीन डिझाइन शोधून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी सतत प्रयत्नशील रहा, कार्यरत रहा, असा मोलाचा सल्ला अनिता यांनी तरुण नवीन फॅशन डिझायनर्सनादिला.

अनिता डोंगरेसारखी डिझायनरही निव्वळ स्वस्वार्थासाठी काम न करता नेहमीच महिलांना काम मिळवून देण्यासाठी, पर्यावरणासाठी, आपली संस्कृती संपूर्ण जगात पोचविण्यासाठी झगडत आली आहे. सगळ्यात जास्त पॉवरफुल भारतीय महिला उद्योजिकामध्ये तिचा नंबर पहिल्या ५० मध्ये येतो.

viva@expressindia.com

First Published on August 2, 2019 12:04 am

Web Title: global desi designer anita dongre mpg 94
Just Now!
X