काही जणांना झोप का येत नाही? अशा झोपेसाठी त्रस्त झालेल्यांसाठी मला वाईट वाटतं फार. खरं किती नैसर्गिक गोष्ट आहे ती. तहान-भुके इतकीच.
मधे एकदा काहीच कारण नसताना सलग तीन रात्री मी टक्क जागी होते. म्हणजे खूप काही विचारमंथन चाललंय डोक्यात किंवा काही इमोशनल क्रायसिस झालाय आयुष्यात असं काहीच नव्हतं. भीतीचा सिनेमा वगैरेसुद्धा पाहिला नव्हता. सवयीनुसार थोडा वेळ पुस्तक वाचून झाल्यावर दिवा मालवून मी झोपले. म्हणजे डोळे मिटले. पण थोडय़ा वेळानी लक्षात आलं काहीच घडत नाहीए. जागेच आहोत आपण. पुन्हा कूस बदलत नव्यानी डोळे घट्ट बंद केले. झोपेचं नाव नाही तरीही! गंमतच वाटली मला. एरवी मी त्या भाग्यवंतांपैकी एक आहे ज्यांना झोपेची आळवणी करत बसावी लागत नाही. शांतपणे दैनंदिन गोष्टी आटोपत सहजपणे झोपेकडे जाता येतं मला. आपली आपली पद्धत असते द्रुत लय बदलत मंद्रकडे जाण्याची. तसं सगळंच रोजच्यासारखं चाललं होतं. पण का कोण जाणे, झापेच लागेना.
ते तीन दिवस फार कठीण वाटले. आदल्या रात्री झोप नसल्यामुळे दिवसा एवढं दमल्यासारखं झालं. नाहीतर सकाळी आंघोळ झाल्यावर अक्षरश: किल्ली मारलेल्या खेळण्यासारखी मी उत्साहात असते दिवसभर. पण त्या दिवशी चक्क सुस्कारा टाकून जिमला जायला निघाले. सायकल काढताना, ट्रेडमिलवर चालताना उगीच कर्तव्य पूर्ण केल्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी तर अर्धा तास कशीबशी चालले आणि ट्रेडमिल बंद करून व्यायाम अर्धवट सोडून  परत आले. तिसऱ्या दिवशी तर जावंसंही वाटलं नाही. पण पुढे आपोआप लागायला लागली बुवा झोप नेहमीसारखी.
असं आधीही झालंय मला. एक प्रकारचा खोकला यायचा रात्री. बसलेल्या पोझिशनमधे  ठीक वाटायचं-आडवी झाले की उसळी मारून खॉकखॉक सुरू. पाठ टेकल्याटेकल्या माझे मृत्युशय्येवरचे माधराव पेशवे व्हायचे अगदी. रात्र रात्र बसून काढलेल्या त्या रात्री अशाच बेचैन करणाऱ्या होत्या. पण ना. आता मी ठरवून टाकलंय ‘झोप’ ह्य़ा गोष्टीशी भांडायचं नाही आणि फार अपेक्षाही ठेवायच्या नाहीत. बदल आपल्या भूक लागण्यातही होतात ना. उन्हाळ्यात नाही लागत तेवढी भूक. नुसतं पाणीच प्यावंसं वाटतं फार. हिवाळ्यात कारण नसताना सारखं काहीतरी खावंसं वाटतं गरमगरम. मग झोपेलाही द्यावी की ती परवानगी. कधीकधी नाही येणार झोप. वेळच्या वेळी आलीच पाहिजे झोप-असं दामटून चिडचिडून झोपायला गेलो. तर विश्रांती, मन शांत रहाणे-ह्य़ाला काय अर्थ राहणार. त्यापेक्षा नियमित प्राणायाम किंवा ध्यान-थोडक्यात सहज श्वासोच्छवास हा स्वत:ला शांत, प्रसन्न ठेवणारा आपल्या मुठीतला पर्याय आहे. उपपर्याय म्हणून मी दुपारी झोपणं टाळते. एकतर मला दुपारी झोपा काढायला आवडत नाही- त्याची सवय नाही आणि दीर्घ वामकुक्षी घेत बसलं तर मला रात्री झोप लागत नाही- त्यामुळे दुपारची झोप मी टाळतेच शक्यतो.
झोप येईपर्यंत टीव्ही पाहणे हा एक अघोरी प्रकार वाटतो मला. एकीकडे डोळ्यांना चकचकीत प्रकाश रंग दाखवत बसायचं, मनाला निर्विकार ठेवत बसायचं आणि शरीराला सूचना देत रहायचं- झोप झोप म्हणून! काही जणांना ते कसं काय जमतं कोण जाणे. पुस्तक वाचणे हा मला उत्तम उपाय वाटतो. म्हणजे बसस्टॉपवर उभं राहून वाट बघत ताटकळण्यापेक्षा- बसमधे बसल्यासारखं. ती बस मग कधी ना कधी झोपेच्या गावाकडे निघतेच. चांगलं संगीतसुद्धा आपल्या धावणाऱ्या विचारांना गोळा करून दिलासा देतं. ते ओळखीचं आणि कमी आवाजातलं असेल तर नकळत एक सुस्कारा निघतोच लगेच- आणि श्वास लयीत येतात हळुवार. तरी अनेकदा झोपायला निघालं-की मला कामंच आठवतात राहिलेली. ह्य़ाला उपाय म्हणून मी आठवल्यावर सरळ लिहून -टिपूनच ठेवते ती गोष्ट. म्हणजे झोप लागेपर्यंत घोंघावत रहात नाही ते मनात.
असो. पण ज्यांना झोप येत नाही त्यांना माझी पूर्ण सहानुभूती आहे. विश्रांतीशिवाय शरीर नावाचं यंत्र आणि मन नावाचं तंत्र सुरळीत कसं सुरू ठेवायचं?  कितीही यश, संपत्ती, लौकिक, मानमरातब मिळू दे. दिवसाच्या शेवटी सहा-सात तास निवांत झोप लागते की नाही-इथेच येऊन पोचतं गणित. रोज रात्री माझ्या बाळाला झोपवताना-तिला झोप लागेपर्यंत पहात रहावंसं वाटतं. इतकं लोभस असतं ते! अक्षरश: काही मिनिटांत गाढ झोप लागते तिला. केवढा विश्वास असतो तिच्या गाई गाई करण्यात. आपणही तितकंच हलकं, निरागस होऊन आयुष्यावर विश्वास टाकत निश्चिंत व्हायला पाहिजे जोजो करताना. सगळ्यातून मार्ग निघतात त्यामुळे निद्रानाशाचेही निघतील. त्यासाठी इटालीअनमधे म्हणतात तसं. बोना नॉत्ते आणि सोन्नी दौरो. म्हणजे स्वप्नरम्य झोप येवो तुम्हाला. सकाळी सकाळीच गुड गुड नाईट.