25 February 2021

News Flash

विष्णूज् मेन्यू कार्ड : पेरूच्या राज्यात

पेरू हे ताजा मेवा म्हणून लोकप्रिय फळ आहे. पेरू बहुधा सगळ्या प्रांतात मिळतो. दुपारी जेवणानंतर पिकलेला पेरू खाणं अत्यंत फायदेशीर असतं.

| November 29, 2013 01:02 am

पेरू हे ताजा मेवा म्हणून लोकप्रिय फळ आहे. पेरू बहुधा सगळ्या प्रांतात मिळतो. दुपारी जेवणानंतर पिकलेला पेरू खाणं अत्यंत फायदेशीर असतं. पेरूपासून काही टिकणारे पदार्थ आणि काही डेझर्ट्स आजच्या मेन्यू कार्डमध्ये खास तुमच्यासाठी..
पेरू हे हिवाळ्यातील एक लोकप्रिय व स्वस्त फळ आहे. त्यात पित्तशामक गुण असल्याने ते अत्यंत उपयोगी फळ आहे. मध्य किंवा दक्षिण अमेरिका हे पेरूचे मूळ स्थान आहे. मेक्सिको ते कोलंबिया, पेरू आणि ब्राझीलचा प्रदेश हे पेरूचे मूळ उत्पत्तिस्थान समजले जाते. पोर्तुगीजांनी हे फळ भारतात आणले आहे. सध्या भारतात सर्वत्र बगिचांमध्ये पेरूची झाडे लावली जातात. पेरूला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. तथापि क्षार नसलेली उच्च प्रतीची खडकाळ व थोडी कठीण जमीन पेरूला जास्त अनुकूल असते. ज्या जमिनीत पावसाचे पाणी साचून राहते अशी हलक्या प्रतीची जमीन पेरूला मानवत नाही, कारण पावसाचे पाणी जमिनीत साचून राहिल्याने पेरूचे रोप सुकून जाते. थोडक्यात कोरडवाहू जमीन पेरूला खूप मानवते. नदीकिनारी गाळाच्या जमिनीत पेरूची झाडे चांगली वाढतात. बीमधून रोप तयार करून लावलेल्या पेरूच्या झाडाची फळे आकाराने लहान, अधिक बिया असणारी व कमी गर असणारी असतात, तर कलम करून लावण्यात आलेल्या झाडाची फळे आकाराने मोठी, कमी बियाची व मुलायम व अधिक गर असणारी असतात. बनारस, अलाहाबाद व मिरझापूर या ठिकाणी पेरूची लागवड खूप मोठय़ा प्रमाणात होते. अलाहाबादचे अमरुद ही पेरूची सर्वोत्कृष्ट जात समजली जाते.
पेरूची भाजी करता येते. पिकलेले पेरू ताजा मेवा म्हणूनही खाल्ले जातात. दुपारी जेवणानंतर पेरू खाणे अत्यंत फायदेशीर असते. जेवल्यानंतर एक-दोन तासांनी एक मोठा पेरू खाल्ल्यास शरीराला आवश्यक ते घटक त्यातून मिळतात. अनशापोटी पेरू खाल्ल्याने किंवा अतिरिक्त प्रमाणात पेरू खाल्ल्याने पोटात वायू तयार होतो. जुलाब होतो व ताप येतो. वैज्ञानिक मताप्रमाणे पेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, ग्लुकोज, टूनिन अ‍ॅसिड व ऑक्झेलेटचे कण असतात. पेरूमध्ये मोसंबी, संत्री, पपई, िलबापेक्षा सी जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असते.

पेरूचं रायतं
साहित्य : अर्धवट पिकलेले पेरू २ नग, मलाईचे घोटलेले दही २ वाटय़ा, मीठ, साखर, चाटमसाला – चवीनुसार, बारीक चिरलेली मिरची – अर्धा चमचा, भाजलेले जिरे अर्धा चमचा.
कृती : दही मलमलच्या कापडातून गाळून, एकजीव करून घेणे. त्यात चवीनुसार मीठ, साखर, हिरवी मिरची घालून एकत्र करून त्यात पेरूचे तुकडे घालणे. वरून कोिथबीर, भाजलेले जिरे व चाटमसाला घालून, थंड करून सव्‍‌र्ह करा.

पेरूचा जॅम
साहित्य : पेरूचा गर १ वाटी, साखर १ वाटी, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ चिमूटभर.
कृती : पेरूचे दोन तुकडे करून बियांसकट गर काढून वाफवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्यात २ वाटय़ा पेरूच्या गराला १ वाटी साखर, अर्धा िलबाचा रस घालून मिश्रण घट्ट शिजवावे. मिश्रण चकचकीत होत आले की समजावे ते व्यवस्थित शिजले. नंतर बाटलीत भरून ठेवावे. पेरूचा गर काढण्याआधी त्यातील बिया काढून उरलेला पेरू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. एका पॅनमध्ये साखर व पेरूचा गर घालून घट्ट होईस्तोवर शिजवून घ्यावे. सर्वात शेवटी त्यात िलबाचा रस, चिमूटभर मीठ व जिलेटिन घालून मिश्रण थंड करून बाटलीत भरावे.
टिप : जिलेटिन टाकण्यापूर्वी थोडय़ाशा पाण्यात गरम करून विरघळून घ्यावे.

पेरूचे पंचामृत
साहित्य : पिकलेला पेरू १ नग, गूळ चवीनुसार, मेथी, हिंग, मोहरी, जिरं फोडणीकरिता, हळद, तिखट चवीनुसार, धणे-जिरे पावडर- अर्धा-अर्धा चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल २ चमचे, मेथी १ चमचा.
कृती : २ चमचे तेलात मोहरी, जिरं, मेथी, िहग घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून नंतर पेरूच्या फोडी घालाव्या. चवीनुसार मीठ घालून थोडं वाफवल्यावर उरलेला मसाला घालून थोडं पाणी टाकून शिजवावे. सर्वात शेवटी चवीनुसार गूळ घालून थोडा वेळ थंड करून फ्रिजमध्ये ठेवावे.

पेरूबोट
साहित्य : लांबसर मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धा वाटी, व्हॅनिला कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे.
कृती :
व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट करून घ्यावे किंवा एका भांडय़ात पाणी गरम करून गॅसवर ठेवावे. त्याच्या आतमध्ये बसणाऱ्या भांडय़ात कस्टर्डचे मिश्रण ठेवून ढवळावे. घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवावे. (याला डबल बॉयल्िंाग प्रोसेस म्हणतात, यामुळे कस्टर्ड जळत नाही.)
कृती ग्वावाबोट : पेरूचे लांबट भागाचे मधोमध दोन भाग करून बियांचा भाग काढून टाकावा व पेरूला थोडेसे वाफवून घ्यावे. थंड करून यामध्ये जेली घालून सर्व्हिंग प्लेटमध्ये पहिले कस्टर्ड ओतून त्यावर ही पेरूची फोड ठेवावी. वरून बदाम, पिस्त्याचे काप व मधाने सजवून थंड करून सव्‍‌र्ह करावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 1:02 am

Web Title: guava recipes
Next Stories
1 क्लिक
2 मनमुक्त मी, स्वच्छंद मी
3 दॅट लिट्ल स्पेस अ‍ॅण्ड टाइम
Just Now!
X