गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रांमध्ये पारंपरिक खेळांचं प्रदर्शन असतं. हे खेळ हौसेनं शिकणाऱ्या तरुणी वाढताहेत. तलवार, भाला, लाठी याबरोबर बरची, दांडपट्टा अशी वेगळी शस्त्रास्त्रं सहज चालवताना त्या इतिहासातल्या रणरागिणींचं स्मरण करून देतात. हे ‘मर्दानी’ खेळ शिकणाऱ्या तरुणींची प्रेरणा काय असते? कशासाठी शिकताहेत त्या हे खेळ?
सणावारातून परंपरा, परंपरेतून इतिहास आणि इतिहासातून प्रेरणा जतन करणं हा मानवी स्वभाव आह़े प्रत्येक सणाच्या निमित्ताने कोणत्या ना कोणत्या परंपरेचं जतन अनायासे होतंच़ गुढीपाडवा या हिंदू नववर्षांच्या निमित्तानेही मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांत गेल्या काही वर्षांपासून निघणाऱ्या स्वागतयात्रांच्या माध्यमातूनही अनेक परंपरांचं जतन केलं जातंय़ युद्ध आणि शौर्याचा जाज्वल्य इतिहास लाभलेल्या महाराष्ट्राच्या शस्त्रशास्त्राचाही अध्याय या निमित्ताने जोपासला जातोय़ शोभायात्रांमध्ये नंग्या तलवारी नि दांडपट्टे लीलया नाचवणाऱ्या नऊवारीतल्या तरुणी आपल्याला चटकन जिजाऊपासून राणीलक्ष्मीपर्यंतच्या रणरागिणींचे स्मरण करून देतात़ हा पारंपरिक मर्दानी खेळ हौसेने शिकणाऱ्या या तरुणींना नेमकी कोणती प्रेरणा असते?
‘शस्रास्त्र चालवणं हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा आह़े याच्या नियमित सरावाने चांगला व्यायाम होतो आणि शारीरिक क्षमतेत प्रचंड वाढ होत़े आत्मविश्वास वाढतो़ त्याचबरोबर एक जुनी परंपरा जतन केल्याचं समाधानही मिळतं,’ असं या मर्दानी खेळाबद्दल कोल्हापूरची आरती शिंदे सांगत़े बी़ टेक़्च्या दुसऱ्या वर्षांला शिक्षण घेणारी आरती वयाच्या दहाव्या वर्षांपासून या खेळाचं प्रशिक्षण घेत आह़े ती तलवार, दांडपट्टा, भाला, लाठी अशी सर्वच मध्ययुगीन शस्त्रं सहज चालवत़े दुहेरी लाठी चालविण्याचे दोन विश्वविक्रम तिच्या नावावर आहेत़ त्याची नोंद लिम्काबुकमध्ये झाली आह़े ६ जून २००४ साली मुंबईतल्या ताडदेवमध्ये तिने सलग चोवीस तास ३० मिनिटं दोन्ही हातांत लाठय़ा चालविण्याचा पहिला विक्रम केला़ त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत तिने तीस तास ३० मिनिटं दुहेरी लाठी फिरवत ताडदेवमध्येच नवा विक्रम केला़ अधिकाधिक लोकांपर्यंत हा खेळ पोहोचावा, त्यांना याचे शिलेदार होण्याची प्रेरणा व्हावी, यासाठीच ठिकठिकाणी सादरीकरणांमध्ये भाग घेतल्याचं आरती सांगत़े तिच्या मर्दानी खेळाच्या कौशल्यामुळे तिला राजमाता जिजाऊ या चित्रपटात बालजिजाऊचं काम करण्याचीही संधी मिळाली़ यापुढेही अशा संधी मिळाल्यास त्याचं सोनं करण्याची तिची तयारी आह़े

‘हिम्मत हाय व्हय कोणाची आमच्याकडे डोळा वर करून बघायची! सगळी शस्त्रं चालवतोय आम्ही, गेल्या दहा वर्षांपासून शिकतेय हा खेळ,’ असं इरसाल कोल्हापुरी ढंगात दिलेलं उत्तर आहे कल्याणी सूर्यवंशीचं!़ सध्या एम़ कॉम़ चं शिक्षण घेणारी ही कोल्हापुरी कन्या ‘आनंदराव पवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्थे’च्या माध्यमातून देशभर तलवार गाजवून आली आह़े ओरिसा, हरयाणा, हैदराबाद, पानिपत, गोवा, दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अशा अनेक ठिकाणी कल्याणीचे पट्टे फिरले आहेत़ स्त्रियांना स्वसंरक्षणाची प्रेरणा मिळावी, त्यांच्यातील लढाऊ बाणा जागृत व्हावा, असं कल्याणीला मनापासून वाटतं़ छत्रपती शिवराय आणि झाशीची राणी ही तिची प्रेरणास्थानं आहेत़ या प्रेरणेतूनच ती या मर्दानी खेळांकडे वळली़ आजही ती तिच्या सगळ्या कामांतून वेळ काढून दररोज रात्री साडेआठ ते साडेदहा असे दोन तास या खेळाचा सराव करत़े कसून सराव केल्यामुळे तिच्या सादरीकरणांमध्ये अगदी सहजता आली आह़े
याच संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या अनुजा पवार या सातवीतल्या विद्याíथनीला लहानपणापासूनच या खेळाची आवड आह़े संस्थेचे संस्थापक पंडितराव पवार यांची ती पुतणी असल्यामुळे तिला या खेळाचं बाळकडू घरातच मिळालं़ एवढय़ा लहान वयातही ती बहुतेक सर्व शस्त्रं चालवत़े ‘फक्त पट्टा-कुऱ्हाड तेवढी नाही जमत अजून, पण शिकणार मोठं झाल्यावर,’ असं ती अभिमानाने सांगत़े ही शस्त्र चालवल्यावरही खूप उत्साह मिळतो़ एकदम मस्त वाटतं, असंही ती म्हणत़े
मुंबईतल्या गिरगावात निघणाऱ्या शोभायात्रेतसुद्धा दरवर्षी हे मर्दानी खेळ सादर होतात़ या वर्षी तिथल्या यात्रेत ध्वजपथक, ढोलपथकासोबतच, महिलांचं एक विशेष ‘तलवारपथक’ही असणार आह़े या पथकातल्या तरुणी ढोलाच्या ठेक्यावर तलवारीची प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत़ त्यासाठी गिरगावातल्याच लहान-मोठय़ा मुलींचा रोज कसून सराव करून घेण्यात येत आह़े ‘मी या वर्षी पहिल्यांदाच यात्रेत तलवार चालवणार आह़े त्यासाठी आम्ही रोज सराव करतो, आमच्या दीदी सराव करून घेतात आमच्याकडूऩ तलवारबाजी मला खूपच आवडली, आता आणखी शिकावंसं वाटतंय मला, पुढच्या वर्षीही भाग घेणार आहे मी यात..’ असं या पथकात सहभागी होणाऱ्या मिताली रेळे या आठवीतल्या चुणचुणीत मुलीनं सांगितलं़
राज्यभर अशा अनेक तरुणी आहेत ज्यांना या शस्त्रांचा इतिहास मिथकात परिवर्तित होऊ नये, यासाठी ही मर्दानी कला जोपासायची आहे, पुढल्या पिढीपर्यंत हस्तांतरित करायची आह़े अन्यथा भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र ज्याप्रमाणे आज आपल्याला एक मिथक वाटतं, त्याचप्रमाणे उद्या दांडपट्टा, विटा, बरची, भीड-चीर, माडू, गुर्ज, वाघनखं अशी काहीशी अजब धाटणीची शस्त्रं आणि त्यांचा इतिहासही कल्पित वाटू लागेल़ एक वेळ मरणासन्न अवस्थेतल्या भाषेचं पुनरुज्जीवन करता येतं, हिब्रू भाषेतून इस्रायली समाजानं हे सिद्ध केलंय. पण केवळ सादरीकरणाच्या माध्यमातूनच जिवंत राहू शकणाऱ्या या पारंपरिक शस्त्रविद्या मेल्या तर मात्र पुनरुज्जीवनास अन्य मार्ग नोहे! ही एकच जाणीव या साऱ्यांच्या मागील खरी प्रेरणा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नय़े