‘ग्रीन टी’चा उपयोग सौंदर्योपासनेतही करता येतो. अनेक सलॉन ट्रीटमेंटसाठी हल्ली ग्रीन टी बेस्ड प्रॉडक्ट्स वापरताना दिसतात. याच सलॉन स्टाइल ट्रीटमेंट घरच्या घरी करता येतील का?  ग्रीन टी ट्रीटमेंटसाठीच्या ‘डू इट युवरसेल्फ’ ट्रिक्स अर्थात घरगुती उपचार..

नेहमीच्या चहा-कॉफीला फाटा देत अनेकांनी ‘ग्रीन टी’चा आरोग्यदायी पर्याय स्वीकारला आहे. ग्रीन टी जेवणानंतर घेतल्यास पचनास मदत होते, हे आपण जाणतो. पण केवळ पिण्यासाठी नाही तर सौंदर्यवर्धक उपचारांसाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. नितळ त्वचा आणि निरोगी केसांसाठीचा सर्वात नसíगक आणि सुरक्षित मार्ग म्हणून ग्रीन टीकडे पाहता येईल. ग्रीन टी वापरून त्वचा आणि केसांचं आरोग्य कसं वाढवता येईल हे सांगणाऱ्या काही डीआयवाय ट्रिक्स..
नो स्पॉट लुक : आयुष्यभरात किमान एकदा तरी आपण मुरुमांचा त्रास सहन केलेला असतो. तारुण्यपीटिका म्हणजे तरुण मुलींना सगळ्यात मोठा शत्रू वाटतो. या मुरुमांपैकी काही सहजगत्या निघून जातात, तर काही डाग सोडून जातात. त्यानंतर आपण स्वत:वर ढीगभर क्रीम, गोळ्या आणि चेहऱ्याला लावायच्या उत्पादनांचा मारा करतो. पण हे डाग काही जात नाहीत. एक घरगुती उपाय करून बघा..  ग्रीन टीच्या काही टी बॅग्ज घेऊन त्या गरम पाण्यात घाला. पाणी गाळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. त्यानंतर प्रत्येक वेळी चेहरा धुण्यासाठी साध्या पाण्याऐवजी त्वचेला हितकारक असणारं हे द्रावण वापरावं. ग्रीन टीनं चेहरा धुतल्यानंतर पुसू नका. त्वचेत हे द्रावण हळूहळू मुरू द्यावं. हा क्रम सातत्याने पाळल्यास चेहऱ्यावरचे डाग हळूहळू नाहीसे होतील आणि मुरुमांनाही प्रतिबंध होईल. त्याचप्रमाणे अचानक मुरुमं येणंही बंद होईल. त्याजोडीला तुम्ही नंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावू शकता.
घरच्या घरी मॉइश्चरायझिंग क्रीम कसं बनवाल?
अधिक फायद्यासाठी घरी बनवलेलं ग्रीन टी फेस मॉइश्चरायझर लावावं. थोडं खोबरेल तेल, बदामतेल, ग्रीन टीची ओली पानं आणि तुमचं आवडतं इसेन्शिअल ऑइल घ्यावं. सर्व तेलं आणि चहाची पानं यांची क्रीमसदृश पेस्ट बनेपर्यंत ती चांगली वाटावीत. शेवटी त्यात सुगंधासाठी इसेन्शिअल ऑइलचे थोडे थेंब टाकावेत. हे मॉइश्चरायझर चेहरा आणि शरीराला लावल्याने त्वचेला आवश्यक असणारी आद्र्रता मिळते आणि तिचा पोत सुधारतो.
चमकदार डोळे : आपला बराचसा वेळ हल्ली कॉम्प्युटर, टीव्हीस्क्रीन किंवा मोबाइलमधले व्हिडीओज ब्राउझ करण्यात जातो. त्यामुळे डोळ्यांवर ताण येणं स्वाभाविक आहे. बरेचदा डोळे लाल होणं, त्यांना खाज येणं, डोळ्यातून पाणी येणं अशा समस्या यातूनच उद्भवतात. सतत मेकअपची उत्पादनं vv09वापरल्यानेही यातली लक्षणं दिसतात. डोळे सुजणं आणि डोळ्यांभोवती काळी वर्तुळं या समस्याही आजकाल सर्रास दिसून येतात. या समस्यांपासून उपाय म्हणून आयड्रॉप्स किंवा अंडर-आयक्रीम/ जेलसारख्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर केला जातो. या तक्रारींपासून सुटका मिळवण्यासाठीचा सोपा उपाय म्हणजे ‘ग्रीन टी कॉम्प्रेस ट्रीटमेंट’. ग्रीन टी बॅग्ज वापरून झाल्यावर आपण कचऱ्यात फेकून देतो. त्याऐवजी त्या फ्रिजमध्ये ठेवाव्यात आणि हवं तेव्हा काढून २० मिनिटं किंवा जास्त वेळासाठी डोळ्यांवर ठेवाव्यात. ग्रीन टीच्या पानांमधले अ‍ॅण्टिऑक्सिडण्ट घटक डोळ्यांचं क्लीन्झिंग करतात आणि शिरांभोवतीचा सारा ताण काढून टाकतात.
केसांना ठेवा नियंत्रणात : अनेक मुलींना आपले केस लांबसडक आणि चमकदार असावेत असं वाटतं. परंतु ताण-तणाव, प्रदूषण आणि रसायनांच्या वापरामुळे ते तुटतात, त्यांची टोकं दुभंगतात, ते शुष्क आणि भुरभुरीत बनतात. आजकाल हेअर डिटॉक्सिफाइंग ट्रीटमेंट लोकप्रिय होऊ लागली आहे. ग्रीन टी हा प्रमुख घटक असणारी उत्पादनं वापरल्याचे अनेक फायदे असले तरी घरच्या घरी ही ‘ग्रीन टी ट्रीटमेंट’ करता येते.
श्ॉम्पूने केस धुतल्यानंतर कंडिशनर लावण्याऐवजी कंडिशिनग म्हणून ग्रीन टीचं पाणी केसांना लावावं. केसांच्या फॉलिकल्ससाठी हे पाणी नवसंजीवनी ठरतं. ते केसांना पोषण देतं आणि त्यांच्या वाढीला चालना देतं. सेलिब्रेटींसारखे चमकदार आणि मऊसूत केस हवे असतील तर ग्रीन टीच्या पानांमध्ये एक अंडं फोडावं आणि दही घालून ते चांगलं एकजीव करावं. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावावं आणि ते अर्धा तास लावून ठेवावं. नंतर कोमट पाण्याने केस धुवावेत.
(सौजन्य – नॅचरल्स हेअर अ‍ॅण्ड ब्युटी सलॉन)