24 August 2019

News Flash

डाएट डायरी: व्हिगन डाएट

व्हिगन डाएट हा डाएटचा नुसता एक ट्रेण्ड नाही, तर ती एक प्रकारची साधना आहे,

व्हिगन डाएटचा बोलबाला ऐकून मलाही ते करावंसं वाटलं. व्हिगन डाएट हा डाएटचा नुसता एक ट्रेण्ड नाही, तर ती एक प्रकारची साधना आहे, हे आईच्या लेक्चरवरून मला समजलं.. व्हिगन डाएटविषयी सगळ्या शंका निरसन करणारी माहिती देणारं टीनएजर मुलीच्या डाएट डायरीचं आजचं पान..

‘आई, मी व्हिगन डाएट करू का?’ थोडं भीतभीत आईला विचारलं. आईने चक्क पहिल्या फटक्यात होकार दिला. आश्चर्याचो धक्कोच बसलो! कदाचित कोकणच्या गरमीत आमराईत बसून आंबे-फणस खाताना मस्त ताजी ताजी माशाची तुकडी रापताना तुडुंब भरलेल्या पोटी माझ्या मुखातून हे उद्गार आल्याची शंका तिला आली असावी. तिने केवळ ‘हो’ला ‘हो’ केलं आणि दुपारी ए. सी.मध्ये घामाच्या धारा पुसत आपण यावर चर्चा करू, असं ठरवलं. सुंदर कोकण, नागमोडी वाटा, तेवढीच कोकणची साधी माणसं. कोकणातल्या नारळ आणि काजूच्या चवीसोबतच रंगतात तिथल्या भुताच्या रंजक गोष्टी आणि अर्थातच त्याला जोड समुद्राच्या खळखळाटाची.
रोज संध्याकाळी आई आम्हा दोघींना आजोबांबरोबर परवचा म्हणायला बसवायची. गणपतीस्तोत्र आणि मारुतीस्तोत्र ठीक, पण ती न संपणारी रामरक्षा काही मला अजून पाठ येत नाही. विशिष्ट चालीवर असल्यामुळे रामरक्षा म्हणायला मज्जा येते हेही खरं. या भक्तिपाठानंतर ठरल्याप्रमाणे ‘व्हिगन डाएट’च्या चर्चेला सुरुवात झाली. थोडक्यात आम्ही मातोश्रींसमोर आहार प्रवचनाला बसलो. आईने ढएळअपासून मनेका गांधींपर्यंत सर्व चर्चा केली. भूतदया दाखवणे हे किती महत्त्वाचं आहे वगरे सर्व सांगितलं.
कुत्रे-मांजरी वगरे ठीक आहे, पण कोंबडी-मटण-मासे वगरे खायचे नाहीत म्हणजे काय.. हा ठासू वादविवाद झाला. जैन समाज, बौद्ध समाज, शाकाहारी वर्ग, धार्मिक परंपरा या सर्वाची उजळणी झाली. मग एकदाचं ठरलं की – शाकाहार- मांसाहार हे सर्व वैयक्तिक निर्णयांवर, श्रद्धेवर, सवयीवर अवलंबून असलेल्या गोष्टींमध्ये मोडतं. योग्य-अयोग्य अशी त्यावर चर्चा करणं फार महत्त्वाचं नाही. (हे ठरलं चर्चेनंतर!)
आईच्या सांगण्याप्रमाणे व्हिगन म्हणजे कुठलाही प्राणीजन्य पदार्थ वज्र्य करणे. लहानपणापासून दूध पिणारे आम्ही सर्व ‘व्हिगन’च्या तत्त्वामध्ये दूधही बसत नाही हे जाणल्यावर अचंबित झालो. दूध नाही, कारण दूध प्राणीज आहे. दुग्धजन्य पदार्थही नाहीत. म्हणजे दही, ताक, खव्यापासून बनवलेली मिठाई, आईसक्रीम, मलई, लोणी, केक.. काहीच नाही. बाप रे! याला पर्याय काय तर नाळाचं दूध, बदामापासून तयार केलेलं दूध इत्यादी. व्हिगन डाएट करणारे लोक सोयाबीनचं दूधही वापरतात.
हे सगळं ऐकल्यानंतर आणि त्यावर चर्चा झडल्यानंतर आम्ही त्यात न पडण्याचं मनातल्या मनात ठरवलं. नारळाचं दूध हा विषय निघाल्यावर नारळ आणि कोलेस्टेरॉलचं नातं काय रे बाबा? असा सहज प्रश्न बाबाला टाकला. खोबरं चोरून खाण्यात बाबाचा आणि धाकटीचा पहिला नंबर असतो, हे मला माहिती आहे. त्याला बगलदेत बदामापासून दूध निघतं कसं, याकडे चर्चा वळवण्यात आली. सोयाबीन आणि त्याचे फायदे हे एक अतिशय जाड आणि क्लिष्ट पुस्तक आई मध्यंतरी वाचत होती. त्यावेळी आमच्याकडे टोफूचे प्रयोग सुरू होते. टोफूपासून तयार केलेले पदार्थ तोंडातून घशाखाली गेले नाहीत. टोफू चिली फ्राय खरं तर बरं लागलं होतं, हेदेखील आठवलं. आई स्वत: अधूनमधून तिचा व्यायाम झाल्यावर सोयाबीनचं दूध घेते, हे मला माहिती आहे. आता व्हिगन डाएट म्हणजे मला हे सगळं खावं लागणार हे ध्यानात आलं आणि मी मनातल्या मनात व्हिगन लिस्टमध्ये चालणारे (निर्जीव)आणि न चालणारे (सजीव)गोष्टींची यादी करू लागले.
व्हिगन डाएट एकूण सोपं नव्हतं. आपल्याला माहीत नाही अशा कितीतरी गोष्टींची गणती व्हिगन डाएटच्या लिस्टबाहेर जात होती. मला आवडणारं जेली-कस्टर्ड, चॉकलेट वगरे सर्व लिस्टबाहेर गेल्याचं दुख काय सांगणार! सकाळी उठून मध- िलबू-पाणी प्यायची सवय झाली होती. आता नो मध. कारण मधमाश्यांपासून बनणारा पदार्थ चालणार नाही. आईने फक्कड चॉकलेट मिल्कशेक केला तेव्हा लक्षात आलं चॉकलेटच्या पाकिटावरदेखील खूप वेळा लाल गोळा छापलेला असतो. मांसाहार बंद असल्यामुळे तोंडाचे चोचले कोण पुरवणार? एकंदर व्हिगन डायट थोडं नाही तर बरंच कठीण आहे, हे पटलं आणि आईच्या झटक्यात होकाराचा अर्थ उलगडायला लागला. आई फोनवर व्हिगन डाएटबद्दलच बोलत होती कुणाशी तरी.. ही एक प्रकारची साधना आहे. भूतदयेची साधना कठीण पण हृदयाला पटणारी, मनाला शरीराला शांती देणारी. पण अत्यंत कठीण साधना!
फोन झाल्यावर आईची पेशंट तपासायची वेळ झाली. तिचं लेक्चर अर्धवट राहिलं. व्हिगन डाएटचे फायदे, त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी ती आता उद्या सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पुढच्या आठवडय़ात वाचायला मिळेल.

First Published on June 3, 2016 1:35 am

Web Title: health diet and food tips