17 October 2019

News Flash

आरोग्याच्या डाएटवाटा

डाएट एकटय़ाने कधीही सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी मदत करत नाही

|| गायत्री हसबनीस

डाएट एकटय़ाने कधीही सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी मदत करत नाही तर त्याबरोबरीने अनेक गोष्टी ज्या जिद्दीने आपण डाएट करतो त्याच जिद्दीने कराव्या लागतात. डाएट करून आरोग्य कसे राखावे? तर त्यातून होणारा फायदाच नेहमी लक्षात ठेवावा. सध्या आजूबाजूला एवढे डाएट प्रकार ट्रेण्डमध्ये असताना त्यातला नेमका आपला कोणता हे कसे शोधायचे इथपासून ते एकूणच डाएटची योग्य-अयोग्यता यावर आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी प्रकाश टाकला आहे.

एखादी व्यक्ती डाएट करते तेव्हा ती फिटच असते असा बऱ्याच जणांचा समज असतो. जगात शेकडो पद्धतीने सोशल मीडिया, ब्लॉग, यूटय़ूब, फेसबुक, इंटरनेट, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप अशा अनेक माध्यमांतून डाएट प्लॅन आणि वजन कमी करण्यासाठीचे नानाविध उपाय सांगितले जातात. आरोग्य राखायचे असेल तर अमुक एक डाएट प्लॅन फॉलो केला जातो, फिटनेससाठी वेगळा डाएट प्लॅन, लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगळा असे नाना प्रकार शोधले जातात. त्यामुळे फिट राहण्यासाठी डाएट हाच एकमेव मार्ग आहे अशी जर तरुणाईचीही धारणा झाली तर त्यात नवल नाही; पण नक्की डाएट करून आरोग्य राखले जाते का? डाएट कुठला करावा? त्याचे महत्त्व काय? याबद्दल ठळकपणे आणि नीट माहिती करून घेणे आवश्यक असते.

योग्य आहार, जीवनशैली आणि जीवनमूल्ये यांच्या साहाय्याने आपले आरोग्य डिफाइन होते. आपल्या आयुष्यात आपण किती गोष्टींना महत्त्व देतो, आपली भूक आणि गरज कशी आहे, आपलं रूटीन, आपला स्वभाव, मानसिक शांतता आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी तुमच्यातली क्षमता किती आहे त्या दृष्टीनेच डाएटची निवड करणं, आपल्या जीवनशैलीशी तो मिळताजुळता आहे का हे तपासून घेणं आवश्यक ठरतं. कारण डाएट केल्यावर तुमच्या शरीराला आणि आरोग्याला हानी पोहोचणार नाही याची खात्री करून घ्यावी लागते. कोणतेही डाएट केल्याने फायदाच होईल याकडे लक्ष देत त्यातून तुम्ही काय आत्मसात करू  शकता याबद्दल सांगताना डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. ‘‘डाएट केले किंवा नाही केले तरी तुमच्या वयानुसार तुम्हाला चार-पाच किलोमीटर पळता येणं, जिने चढता येणं, डोंगर चढता येणं या सर्व गोष्टी उत्साहाने आणि तितक्याच ताकदीने करता आल्या पाहिजेत. या सर्वातून आयुष्यात आनंदही मिळाला पाहिजे आणि या सर्व गोष्टी होण्यासाठी शरीराला पोषणाची आवश्यकता आहे, ते पोषण म्हणजे डाएट. आता डाएट म्हणजे उपाशी राहून वजन कमी करणे, मशीन वापरणे, पट्टे वापरणे, न्यूट्रिशियन सप्लीमेंट बाजारातून विकत आणून घेणे हे सर्व कृत्रिम प्रकार आहेत जे सस्टेनेबल नाहीत,’’ असं दीक्षित सांगतात. डाएट प्लॅन यशस्वी होऊ  शकत नाही, पण लाइफस्टाइल यशस्वी होऊ  शकते. त्यासाठी कुठलेही मशीन लागत नाही, डॉक्टर लागत नाही किंवा बाहेरून काही विकत आणावं लागत नाही, असं सांगत यासाठीच ‘लाइफस्टाइल मॉडिफिकेशन’ हा प्रकार आपण पुढे आणल्याचं त्यांनी सांगितलं. यात दिवसातूंन दोन वेळा जेवा आणि साडेचार किलोमीटर चाला. तुम्ही जे खात आहात ते तुम्ही खाऊ  शकता, परंतु आहारात हेल्दी गोष्टी असल्याच पाहिजेत. कुठलेही गोड पदार्थ, साखर आणि गूळ हे आरोग्यासाठी चांगले नसतात. त्याचबरोबर जास्त तेल, तूप खाणं आणि जास्त मीठ खाणं हे आरोग्यासाठी घातक आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टी आणि जंकफूड खाऊ  नका, असं त्यांनी सांगितलं.

डाएट म्हणून तुम्ही खाण्याचं प्रमाण कमी करण्याची किंवा वेगळंच खाणं खाण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘‘दिवसातून दोनदा जेवा. इन्सुलिन सिक्रेशन कमी झालं तर वजन कमी होईल आणि फॅ ट्स बर्न होतील, पण हे करताना फळं, सॅलडसारखे हेल्दी फू ड घ्या. जंकफूड किंवा फॅटफूड खाऊ  नका. त्यामुळे शरीराची एक हालचाल तयार होईल. जी माणसं अर्धा-एक किलोमीटर चालत नव्हती ती आता लाइफस्टाइल बदलल्यामुळे  मॅरेथॉनसारखी धावायला लागली. हे जे सांगितलंय त्यात डाएट कमी आणि लाइफस्टाइलचा भाग जास्त असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. वजन हा शेवटी हा एक आकडा आहे. वजन कमी झालं म्हणून फिट झालं असं होत नाही. वजन कमी झाल्याने एखादा माणूस अशक्त झाला, आजारी पडला तर त्याचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे वजन तुमच्या मसल्सचं आहे की फॅ ट्सचं आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. डाएटचे अघोरी प्रकार केल्याने नुकसान जास्त होते. अमुक खा, तमुक नको यामुळे न्यूट्रिशियन डेफिशिअन्सी निर्माण होते. म्हणून डाएट कसं करावं आणि किती करावं याबद्दल स्वत:वर विश्वास ठेवा, असं दीक्षित यांनी सांगितलं. लाइफस्टाइल मॉडिफिकेशनमधून तुमच्यात चार बदल घडतात आणि ते तुम्ही अनुभवू शकता. यातून वजन कमी होईल, पोटाचा घेर कमी होईल, तीन महिन्यांचा अ‍ॅव्हरेज ब्लड ग्लुकोज कमी होईल, फास्टिंग इन्सुलिन कमी होईल. अर्थात हे व्यक्तिगणिक आहे, मात्र या चार गोष्टी कुठल्याही डाएट प्लॅनने घडल्या तर जगातला कुठलाही डॉक्टर हे वाईट आहे असं म्हणू शकत नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं.

कुठल्याही वयोगटातील आणि क्षेत्रातील मंडळी ही लठ्ठ असली तरी ती फिट असतात. आपण चांगलं दिसावं, फिट राहावं ही भावना काही आजची नाही, पण त्यासाठी काय करावं याबाबत लोक गोंधळलेले आहेत. कारण सध्या अनेक डाएट प्लॅन आहेत, मग कुठल्या डाएटवर विश्वास ठेवावा, हा त्यांच्या मनातला प्रश्न असतो. यासाठी वर जे चार ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर सांगितले ते तुमचा आरसा आहेत. तुम्ही जो डाएट प्लॅन करताय त्यांचा उपयोग होतोय की नाही ते बघा. कोणतीही गोष्ट जर तुम्ही २१ दिवस सलग केली तर त्याची सवय लागते, या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी लक्षात घ्या. शिवाय, डाएटमध्ये सुचवलेल्या गोष्टी किती व्यवहार्य आहेत याचाही विचार केला पाहिजे. जर तुम्हाला एका डाएट प्लॅनमध्ये चिकन-मटण-फिशच खाण्याविषयी सुचवलं आहे किंवा कोणाला एखादा शेक प्यायला सांगितलाय, तर तो किती दिवस शेक पिऊ  शकेल, किती दिवस सतत चिकन-फिश खाऊ शकेल? त्यामुळे आयुष्यभर जे करण्यासारखं असेल ते निवडा. या बारीकसारीक गोष्टींचा विचार केलात तर तो डाएट प्लॅन न राहता तुमची लाइफस्टाइल होईल, कारण शेवटी लाइफस्टाइल यशस्वी होते, डाएट प्लॅन नाही, त्यामुळे त्या दिशेने विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, अशी माहिती डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दिली.

मानसिक स्वास्थ्य आणि योग्य आहार याचा मोठा सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे फक्त डाएट नाही तर त्याला व्यायामाचीही योग्य जोड द्यावी लागते. डाएट म्हणजे पूर्णत: फिटनेस नाही; परंतु त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आहाराबरोबरच फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी महत्त्वाची ठरते. लोक रोज काही तास चालतात तरी त्यांचं वजन कमी होत नाही. तेव्हा ती तुमची एक फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी झालेली असते. त्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीचं रूपांतर व्यायामात करायचं असेल तर त्यात तुम्हाला दर तीन महिन्यांनी नवीन भर घालायला हवी, असं दिवेकर यांनी सांगितलं. आपल्या आरोग्यासाठी पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची असते, असं त्या म्हणतात. शिवाय, सध्या डाएटचे अनेक प्रकार लोक फॉलो करत असतात. मात्र ते करत असताना आपलं शरीर काय म्हणतंय, पोट काय म्हणतंय याकडे आपलं दुर्लक्ष होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. एखाद्या डाएटमध्ये सकाळचा नाश्ता करू नका, असं म्हटलं असेल तर ज्यांना रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी सणसणीत भूक लागते त्यांच्यासाठी ते अशक्य असतं. इथेच डाएट करण्याचं धैर्य मोडून पडतं. यापेक्षा मुळात आपला आहार हा हलका असावा म्हणजे एकदम पोट तडीस जाईपर्यंत खाऊ नये. दुसरं म्हणजे वेळा पाळणं. आपल्याकडे एक म्हण आहे ‘तेलात वात आणि पानांत भात’ म्हणजे आपण जेव्हा सात-साडेसातला देवापुढे दिवा लावतो तेव्हा पानातही भात आला पाहिजे. आपण तेव्हा जेवलो तर आपल्याला झोपही व्यवस्थित लागते. रात्री तुम्ही फार तर दूध पिऊ  शकता. रात्री हलकाच आहार असावा, कारण आकाशात जसजसा सूर्य जाऊन चंद्र येतो तसतशी आपली पचनशक्ती कमी होते. त्यामुळे रात्री आइस्क्रीम, स्वीट्स अशा गोष्टी खाल्या तर वजन वाढते. रात्री जेवल्यानंतर फळं खाणंही टाळावं, कारण ग्लुकोजच्या रूपात ते साठवलं जातं. त्यामुळे अन्नाकडे पाहताना केवळ प्रोटीन, काबरेहायड्रेट्स या अर्थाने न पाहता त्याचा र्सवकष विचार करा, असेही त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.

सुदृढ व्यायाम, योग्य डाएट, काम केल्यानंतर तणाव दूर करणे आणि भरपूर पाणी पिणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, असं ‘डॉक्सअ‍ॅप’च्या वैद्यकीय ऑपरेशन्स प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी म्हणतात. क्रॅश डाएट केल्याने एखादवेळेस तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल, पण शेवटी बॅलन्स्ड डाएट महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणसाची शरीररचना, जीवनशैली, आवडीनिवडी आणि एखादी गोष्ट आत्मसात करायची ताकद वेगवेगळी असते. त्यामुळे नेहमीच असा एक कस्टमाइज्ड डाएट चार्ट असावा ज्यात वरील सर्व गोष्टी बसू शकतील. प्रत्येकाची अमुक एक डाएट फॉलो करण्याची शक्ती आणि क्षमता कितपत आहे हेही तपासून डाएट करणं महत्त्वाचं आहे. योग्य डाएट आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी जीवनशैलीतल्या बदलासाठी अत्यंत आवश्यक आहेत, असंही त्यांनी सांगितलं. अनेकदा काही दिवस डाएट करून मग तो सोडला जातो, हे चुकीचं आहे. जो डाएट ठरवला आहे तो हेल्दी असला पाहिजे आणि दररोज फॉलो केला पाहिजे तरच डाएट आणि फिटनेसचं हे समीकरण तुम्हाला निरोगी ठेवेल, असं गौरी कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

सध्या किटो डाएटपासून दीक्षित डाएट, पंडित डाएट, जपानी डाएट पद्धती अशा अनेक पद्धती आहेत, मात्र यातील आपल्याला सूट होऊ शकेल असे डाएट कोणते, याचा विचार करताना तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टींचा निश्चितच फायदा होईल. डाएट कोणता हे ठरवण्यापेक्षा त्यामुळे आपली जीवनशैली निश्चित कोणत्या स्वरूपाची असेल, याचा गांभीर्याने विचार केला तर फिटनेसचे समीकरण जास्त तंदुरुस्त असेल हे लक्षात घेतले पाहिजे.

First Published on June 13, 2019 11:52 am

Web Title: healthy diet plan