19 February 2020

News Flash

साथी हाथ बढाना

पुरानंतर पुनर्वसनाचे काम मोठे आणि महत्त्वाचे असते.

(संग्रहित छायाचित्र)

|| विपाली पदे

पुरानंतर पुनर्वसनाचे काम मोठे आणि महत्त्वाचे असते. हे लक्षात घेऊन त्या त्या भागात पोहोचून लोकांची मदत करणाऱ्यांमध्ये एक नाव म्हणजे रोहित वर्तक. ‘शिवदुर्गमित्र लोणावळा’ आणि पुण्याच्या ‘रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या साहाय्याने त्यांनी प्राण्यांची यातून सुटका करण्याचे काम हाती घेतले. सांगली येथील बिलवडी गावात १२ कार्यकर्त्यांबरोबर जाऊ न त्यांनी अनेक जनावरांना सुरक्षित स्थळी हलवले. तीन दिवसांत चार ते पाच इतर ठिकाणीदेखील त्यांनी नेटाने काम केले. प्राण्यांना आवश्यक असणारी सगळी औषधे आणि इतर साधनं ते बरोबर घेऊन गेले होते. रोहित आवर्जून सांगतो की पुरात अडकलेल्या नागरिकांना अनेक माणसं वाचवत होती, पण प्राण्यांना वाचवण्यासाठी मदतीचे हात पुढे येत नव्हते. स्वत:च्या बोटींनी आत जाऊ न त्यांनी चिखलात अडकलेल्या अनेक प्राण्यांना वाचवले. जखमी प्राण्यांवर उपचार केले आणि त्याच गावात सुरक्षित स्थळी हलवले. कोणतेही संकट आले असताना आपण सर्वप्रथम ‘जीवित’हानी टाळण्यावर भर देतो. या जीवितांमध्ये प्राण्यांचादेखील समावेश होतो ही बाब मनात पक्की ठेवून या संस्थेने केलेले कार्य हे नुसतेच प्रशंसनीय नाही तर अनुकरणीयदेखील आहे.

वडाळ्याचा धनंजय शिंदे हाही एक आयटी इंजिनीअर आहे. तोही संकटाच्या वेळी पूरग्रस्तांसाठी धावून गेला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर येणारी रोगराई टाळण्यासाठी धनंजयने आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले. सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अजूनही मदत गेलेली नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी आढावा घेतला. चोरगेवाडी आणि सुखवाडी इथे काम सुरू केले. इथे मदतीसाठी जाण्यापूर्वी दहा दिवस आधी त्यांनी लोकांना आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन केले आणि त्याला लगेच प्रतिसाददेखील मिळाला. डॉक्टर , कार्यकर्ते यांच्याकडून पैसे न मागता त्यांचा वेळ मागितला आणि जवळपास पन्नास ते ऐंशी हजारांची औषधे घेऊ न गेले. पुणे, मुंबई , ठाणे, औरंगाबाद, नाशिक अशा विविध ठिकाणांहून डॉक्टर आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने गेले होते. वातावरणातील रोगजंतू घालवण्यासाठी त्यांनी पावडर टाकली, रस्ते स्वच्छ केले. ते सांगतात की त्यांनी या दोन गावांत जमेल तितकी वैद्यकीय सेवा पुरवण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानिक पातळीवरील लोकांनी त्यांना मदत केली. स्वत: तेथील सरपंच त्यांच्या बरोबरीने नागरिकांसाठी कार्य करत होते. फक्त सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता सामान्य नागरिकांनीही आपापल्या परीने संकटग्रस्तांना मदत करावी असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.

आपल्यापैकी अनेकांनी या पुराच्या बातम्या टीव्हीवर, सोशल मीडियावर पाहिल्या, फॉरवर्ड केल्या, परंतु या बातम्यांनी व्यथित होऊन ठाण्याचा युवक हर्षद समर्थ याने प्रत्यक्ष तिथे जाऊ न मदत करण्याचे ठरवले. ज्यांना आपल्या इतर कामांमुळे पूरग्रस्त भागात जाणे शक्य नव्हते. अशांसाठी त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून मदतीची विनंती केली. या विनंतीला प्रतिसाद देऊन अनेकांनी हर्षदला कपडे, धान्य, बिस्किटे व इतर आवश्यक वस्तू आणून दिल्या. या सर्व सामानाने त्याचे पूर्ण घर भरून गेले हे तो आनंदाने सांगतो. हे सर्व सामान घेऊन तो आठजणांसह कोल्हापूरमधील ब्रह्मनाळ गावात गेला. तो खरंतर तिथे पूरग्रस्तांना मदत करायला गेला होता, मात्र त्याला आलेला अनुभव विलक्षण होता असं तो सांगतो. ‘दादा आधी भाकर खाऊ न घ्या मग आमची बुडलेली घरं बघा’, हे गावक ऱ्यांचे त्याच्या कानावर पडलेले शब्द होते. हे शब्द म्हणजे त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे प्रतीक आहे, असं तो आवर्जून सांगतो. या सर्व मदतकार्यादरम्यान त्याला जसे विलक्षण अनुभव आले तसेच काही अनुभव मात्र मन सुन्न करणारे होते. देशातील अनेक भागांमधून आलेल्या मदतीचे ट्रक हायवेवरच अडवून आपल्या गावात नेण्याकडे काही पूरग्रस्त गुंतले होते. आणि म्हणून गावातील आतल्या भागांमध्येही मदत पोहोचावी यासाठी तो आग्रही होता. या सगळ्या गोंधळामध्ये एक सुखावणारी बाब म्हणजे अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजकरणापलीकडे जाऊन लोकांना मदत करत होते, असं तो सांगतो. अशा प्रकारे त्याने पाच दिवस कोल्हापुरात मदतीचे कार्य केले आणि अजूनही तो इतरांना मदतीचे आवाहन करतो आहे.

प्रसाद पवार हाही एक युवा कार्यकर्ता असून तो ‘चाणक्य मंडल’, पुणे येथून कोल्हापुरातील प्रयाग चिखली या गावात मदतीसाठी पाच दिवस गेला होता. तिथे मुख्यत्वे त्याने पूर ओसरल्यानंतर साफसफाईची कामे हाती घेतली होती. सरपंचांच्या मदतीने ग्रामपंचायत शाळा, पडलेली घरे, रेशनची दुकाने स्वच्छ केली. त्याला आलेला अनुभव म्हणजे गावात फिरत असताना त्याच्या लक्षात आले की काही घरांमध्ये दिवाळी आहे तर काही घरांमध्ये खडखडाट. आणि म्हणून त्याने दारोदारी जाऊन आलेल्या मदत साहित्याचे वाटप केले. विशेषत: मागास भागावर त्याने लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या बरोबर गेलेल्या ८० कार्यकर्त्यांची सोय तिथल्या सरपंचांनी स्वत:हून केली. दारोदारी मदत घेऊन जात असताना घरात अन्नाचा कण नसणाऱ्या नागरिकांनीही चहा तरी पिऊन जा, असा आग्रह त्याला केला. पण आपण मदत करायला गेलेलो आहोत हे पक्के ध्यानात ठेवून अनेक तरुणांचे नेतृत्व करत त्याने जवळपास संपूर्ण गाव स्वच्छ केले. त्याच्या डोळ्यात पाणी येणारा क्षण म्हणजे गावातील महिलांनी ‘आमच्या धाकटय़ा भावांनी आमचे संरक्षण केले, मदत केली’, अशी भावना व्यक्त केली. एवढेच नाही तर याच भावनेने त्यांना राखी बांधून भविष्यात संकट आल्यावर पुन्हा मदतीला येण्याची प्रेमळ विनंतीही त्यांनी केली.

या व्यक्तींबरोबरच इतरही अनेक व्यक्ती आणि संस्था यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ हे वाक्य फक्त प्रतिज्ञेपुरते मर्यादित न ठेवता या तरुणाईने ते प्रत्यक्षात आणले आहे. या सर्वाच्या अथक मेहनतीमुळे अनेक पूरग्रस्त भागांतील घाण, कचरा दूर होण्यास मदत झाली आहे. पुनर्वसनाच्या कामाला त्यामुळे वेग येईल. ज्यांना अगदीच मूलभूत वस्तूंची गरज होती, त्यांना तिथपर्यंत त्या पोहोचवून देण्यापासून ते वाहून गेलेल्या घराची उभारणी करण्यासाठी त्यांच्या बरोबरीने एक पाऊल पुढे टाकणाऱ्या या तरुणाईने एकमेकांच्या मदतीने मोठे कार्य उभे राहू शकते, याचे प्रत्यंतर आणून दिले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला होता. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या महापुरामागे अनेक घटक कारणीभूत असल्याचे आता समोर येत आहे. अनेकांनी या महापुरासाठी सरकारच्या निष्क्रिय प्रशासनाला जबाबदार धरले. तर काहींनी या पुरामागील शास्त्रीय कारणे समोर आणली. परंतु काही व्यक्ती आणि संस्था मात्र या कारणांमध्ये अडकून न पडता झालेले नुकसान कसे भरून काढता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ अशी फक्त भावनिक पातळीवर मदत करण्यापेक्षा तरुणाईने प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांमध्ये जाऊ न सर्वतोपरी मदत करण्यावर भर दिला. यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यापासून ते त्यांची विस्कळीत झालेली घरं पुन्हा उभी करण्यापर्यंत सर्व कामांमध्ये त्यांनी जमेल तसे योगदान दिले.

First Published on August 23, 2019 12:09 am

Web Title: heavy rainfall maharashtra flood mpg 94 4
Next Stories
1 केक आर्टिस्ट
2 मोबाइलचा ‘झेन मोड’
3 फिट नट – तेजस डोंगरे
Just Now!
X