गायत्री हसबनीस

बदल हा निसर्गाचा नियम आहे, परंतु जे मूळ आहे ते तोडून आपण त्यातून नक्की काय मिळवू शकतो हा खरा प्रश्न. हिपस्टर ही फॅशन आली तेव्हा तिच्या मूळ स्वरूपात ती या दशकापर्यंतही टिकू शकली नाही. मूळ हिपस्टर फॅशनमध्येसातत्याने इतके बदल होत गेले की ते कधी कळलेच नाहीत आणि मोजलेही नाहीत. मात्र फॅशनच्या इतिहासातील या हिपस्टरचा उगम आणि त्याचे बदलत गेलेले रूप यांचा प्रवास मात्र अचंबित करणारा आहे.

दररोज आपल्याला वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक भेटत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले गुणदोष वगळता निसर्गाने दिलेल्या आकलन व कल्पनाशक्तीची भरभराट ज्या माणसात असते त्याची दिनचर्या आणि राहणीमान फार वेगळे ठरते किंबहुना ते इतरांना आकर्षित करते. आपली ओळख इतरांपेक्षा कैकपटीने वेगळी असलेल्या असंख्य वल्ली डोळ्यासमोर येतात ते फॅशनच्या दुनियेतून. आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळसाध्या धाटणीत न अडकवता त्याला वेगळेपण देण्याचा या वल्लींचा आग्रह असतो. आपण डोक्यापासून ते पायापर्यंत कसे व किती वेगळे दिसतो याची चाचपणी करणारी मंडळी एका बाजूला आणि आपण कसे दिसतोय याचा फारसा विचार न करता आत्मविश्वासाने जगात वावरणारी हिपस्टर्स मंडळी दुसऱ्या बाजूला.. म्हणूनच या ‘हिपस्टर्स’ची कहाणी अफलातून आहे. या हिपस्टर्सचा अर्थ फक्त एका ठरावीक वयोगटातील किंवा एका ढाच्यातील फॅशनप्रेमी असा नसून प्रत्येक वयोगटातील आणि विविध प्रकारच्या फॅशनला आपल्या दैनंदिन आयुष्यात सहभागी करून घेणाऱ्यांना हिपस्टर्सची मात्रा लागू पडते. वास्तविक ही फॅशनएका चळवळीतून उभी राहिली आहे आणि त्या चळवळीत अनेकांचा सहभागही होता. त्यातून लोकांचा वेगळा गट निर्माण झाला. त्यामुळे या फॅशनला लौकिकार्थाने ‘हिपस्टर’ हे नाव पडले, कारण त्यामागे अनेक लोकांच्या सहभागाचा इतिहास आहे. हा सहभाग वैचारिक किंवा आत्मसन्मानासाठी नव्हता, पण हिपस्टर्सची ही चळवळ १९३० ते ४०च्या दशकातील तरुण संगीतकारांनी केलेली एक क्रांतिकारी चळवळ होती, जी प्रामुख्याने वंशवादाशी निगडित होती.

मुळात तत्सम मनोरंजन, लोकप्रिय संगीत, स्लॅग भाषा, आरामदायी जीवन या सगळ्या घटकांनी पुरेपूर अशी या चळवळीतील सहभागी लोकांची जीवनशैली होती. आणि या जीवनशैलीप्रमाणेच त्यांची केशरचना, कपडय़ांची स्टाइल, फॅशनअशा गोष्टीही सातत्याने बदलायला लागल्या. त्या वेळेस या चळवळीतील सहभागी संगीतकार रिबेल तर होतेच, पण संगीतासोबत फॅशनही तितकीच रिबेल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे एका बाजूला चळवळीतून समोर आलेले हे संगीतकार फॅशनमध्ये बदल घडवत गेले. परिणामी १९४०च्या चळवळीतील संगीतकारांना हिपस्टर संबोधले जाऊ  लागले आणि १९९० नंतर त्यांनी त्या काळी अनुसरलेल्या फॅशनला त्यांच्या नावाने म्हणजेच ‘हिपस्टर फॅशन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

परंपरेची एक ऐतिहासिक किनार या हिपस्टर फॅशनला आहे. त्या वेळेचे संगीत हे लिबरल होते, त्यामुळे ही फॅशनदेखील तितकीच बंडखोर आहे. हिपस्टरचे वैशिष्टय़ म्हणजे स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण न करता व्यक्तिसमूहाची फॅशनम्हणून आपली स्वतंत्र ओळख त्यांनी जपून ठेवली आहे. हिपस्टर फॅशनही कोणा एका व्यक्तीची फॅशन नाही तर समूहाने ती फॅशनकरणारे कित्येक जण आज जगभरात वावरत आहेत. पण मुळात हिपस्टर फॅशन म्हणजे नेमके काय?या फॅशनमध्ये कशाकशाचा समावेश होतो? ती कशी केली जाते? स्टाइल्स काय आहेत आणि ती कशी बदलत गेली? असे असंख्य प्रश्न आजच्या काळात अनेक दिग्गज फॅशनक्रिटिक्सनाही पडतात. हिपस्टर फॅशनचा शोध आणि बोध घेणे अजूनही सुरूच आहे. कुणी त्यावर अमुक एका पद्धतीने बोलतं तर कुणी आणखी वेगळ्या पद्धतीने बोलतं. क ोणाच्या मते हिपस्टर ही अशी आहे तर कोणाच्या मते ती तशी नाही. रिबेल होणं आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठीची धडपड ही १९४०च्या दशकात पाश्चात्त्य देशातील तरुणांमध्ये कमालीची वाढलेली होती. त्यामुळे त्यांनी अंगाखांद्यावर वागवलेली फॅशन तर किती रिबेलियस असू शकते, असा विचार मनात येतो.

हिपस्टर फॅशनची गंमत अशी की विचित्रपणा आणि साधेपणा याची योग्य सांगड त्यात असते. हिपस्टर फॅशनहे एक पाठय़पुस्तकच आहे आणि त्यात अशा बऱ्याच फॅशनसंज्ञा किंवा फॅशनस्टाइल्स आहेत, ज्यातील अनेक स्टाइल्स आज फॅशनम्हणून वापरल्या जातात, अर्थात त्याही फक्त हिपस्टर फॅशनमध्येच वापरल्या जातात. त्या स्टाइल्स १९३०-४०च्या दरम्यान वापरल्या जायच्या. या स्टाइल्स आता तब्बल ५० वर्षांनी रिवाइव्ह झाल्या आहेत. त्यामध्ये बूटकट जीन्स, प्लेड पॅण्ट्स, फ्लॅनल शर्ट्स, स्लाऊ ची बिनीज, सस्पेण्डर्स, फेडोराज, पिकोट्स, होमबर्ग हॅट्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. मुळात या सर्व स्टाइल्स पन्नास-साठ वर्ष जुन्या आहेत. त्यामुळे ज्या स्टाइल्स या परत हिपस्टर फॅशनमुळे आज नावारूपाला आल्या आहेत त्यातून एखादी फॅशनसंकल्पना फॅशन प्रकारांना वर्षांनुवर्ष किंवा काही वर्षांनंतरसुद्धा कशी पुनरुज्जीवित करू शकते याची कल्पना येते. आजचा काळ हा असा आहे की आपण फॅशनही मिक्स करतो. त्याप्रमाणेच १९४० नंतर आलेल्या कित्येक स्टाइल्स या हिपस्टर फॅशनम्हणजेच वरील फॅशन प्रकारांसोबत एकत्र झाल्या आहेत. ज्या आज आपण हिपस्टर फॅशनमध्ये पाहू शकतो. १९४० ते ४५ नंतर म्हणजेच फार फार तर १९६०च्या काळापासून डेनिम, लेदर जॅकेट्स, कार्डिगन, जम्पसूट, स्निकर्स, स्वेटर्स, व्ही-नेक, हूडी, कॅज्युअल ब्लेझर (मेन आणि वूमन्स फॅशन) अशा फॅशन स्टाइल्स विकसित झाल्या, ज्या आत्ताही हिपस्टर फॅशनमध्ये समाविष्ट आहेत. असं असूनही १९६०-७०च्या काळात हिपस्टर फॅशनही तितकीशी लोकप्रिय ठरली नव्हती. त्या काळात हिप्पी आणि ग्रज फॅशनचा पगडा अतिशय जास्त होता. पण जुनं फिरून परत आणण्याच्या इच्छेमुळेच रेट्रो, विण्टेज फॅशनसोबत हिपस्टर फॅशनही १९९० नंतर तितकीच लोकप्रिय होऊ  लागली. तसं पाहायला गेलं तर हिपस्टर १९९० नंतर तीन काळात मोडते. एक म्हणजे १९९०चं दशक, दुसरा काळ २०००चं दशक आणि तिसरा म्हणजे २०१०चं दशक जे आता लवकरच समाप्त होईल. या तिन्ही काळात हिपस्टर ही फॅशनतीन टोकांप्रमाणे वेगळी आहे, कारणही पुन्हा तेच की जुनी फॅशनमिक्स करून नवं काही तरी आणण्याची ओढ. पहिल्या काळातील फॅशनही केशरचना आणि त्यावरील अ‍ॅक्सेसरीजवर भर देणारी होती. तिसऱ्या टप्प्यात डेनिमचा वापर, लेगिंग्स, नेटपॅण्ट आणि लेदर शूज या गोष्टी अचानक इन होऊ लागल्या. त्यानंतर आजच्या दशकात हिपस्टर हा परवलीचा शब्द बनला आहे. सगळ्या तऱ्हेची फॅशन, सर्व प्रकार आणि स्टाइल्स इतक्या मिक्स झाल्या आहेत की तुम्हाला जसं स्टाइल स्टेटमेंट ठेवण्याची इच्छा आहे तशी ती तुम्ही ठेवू शकता. या प्रसाराचं महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया. आता युनिक दिसण्याच्या लोभापायी हिपस्टर मात्र तिचे मूळचे रूप पूर्णपणे पुसून जाऊन फक्त सोशल मीडियावर दिखाव्यापुरती भविष्यात उरणार की काय, अशी भीती वाटते.

हिपस्टर फॅशनची किमया अशी आहे की ती भविष्यात दंतकथा बनू शकते. बदलासोबत फॅशनची तयार झालेली चौकट मोडून त्यात आपले काही तरी ‘अ‍ॅड’ करण्याची हौस या फॅशनच्या मूळवैशिष्टय़ाला हानिकारक ठरू शकते. हिपस्टर सध्या ट्रेण्डी फॅशनठरली ती याच विचाराने. फॅशनवीकमध्ये बऱ्याचदा उतरूनही फॅशनवीकच्या मंचावर ती तितकीशी आपली छाप पाडू शकली नाही, हीही एक शोकांतिका आहे.

viva@expressindia.com