खाद्यपदार्थाचे शाकाहार व मांसाहार असे वर्गीकरण करायचे म्हटले तरी ज्या पदार्थाकडे या वर्गीकरणाच्या पलीकडे जाऊन मंडळी प्रेमाने बघतात असा पदार्थ म्हणजे ऑम्लेट. अंडी आणि ऑम्लेट हे समीकरण या पदार्थाच्या जन्मापासून अस्तित्वात आलं आहे. टोमॅटो ऑम्लेट वगैरे शाकाहारींची सोय झाली, मात्र अंडय़ाशिवाय ऑम्लेट म्हणजे कांद्याशिवाय कांदाभजी किंवा वांग्याशिवाय भरीत. एकूणच अंडी व ऑम्लेट ही जोडी जगभरात लोकप्रिय आहे. तरीही भारताचा विचार करता पूर्णत: शाकाहारी आणि अंडी चालतात असे शाकाहारी – असे गट पडतात. त्यामुळे ऑम्लेट हा मांसाहारी वर्गात मोडूनही बऱ्यापैकी दोन्ही गटांत पसंती मिळवून असलेला पदार्थ ठरतो.
ब्रिटिशांच्या भारतीय वास्तव्यात हा पदार्थ आपल्याकडे रूढ झाला असं म्हणताना मनात राहून राहून विचार येतो की, त्याआधी भारतात कोंबडय़ाही होत्या व अंडीही होती. मग ऑम्लेट हे नाव बाजूला ठेवता अंडय़ाच्या पोळ्या असं अस्सल देशी काहीतरी बनवलं जातंच असणार. फक्त ब्रिटिशांमुळे ऑम्लेट हा एखादा विशेष पदार्थ म्हणून हायलाइट झाला असावा.
कोंबडं आधी की आधी अंडं? या प्रश्नाइतकाच ऑम्लेटचा शोध कुणी लावला हा प्रश्न गहन आहे. भर उन्हात राखणीला बसलेल्या गुराख्याला किंवा एखाद्या सैनिकाला किंवा हातून चुकून अंड फुटून तव्यावर पडल्याने एखाद्या गृहिणीला, कोणाला हा शोध लागला हे स्पष्ट नसलं तरी घाईगडबडीत पोटभरीचं काहीतरी बनवण्यासाठी आतुर समस्त स्वयंपाकी मंडळींवर या पदार्थाचे खूपच उपकार आहेत.
ऑम्लेट हा जगभरात वापरला जाणारा शब्द मूळचा फ्रेंच आहे. अ‍ॅल्युमेले या फ्रेंच शब्दापासून तो सोळाव्या शतकात प्रचलित झाला. त्याचा नेमका अर्थ स्पष्ट नसला तरी लॅटिन भाषेत एक शब्द होता लॅमेला. ज्याचा अर्थ पसरट डिश असा होतो. त्याच्याशी साधम्र्य राखत आणि मूळ शब्दाचा अपभ्रंश होत होत ऑम्लेट हा शब्द अस्तित्वात आला. मात्र जुन्या काळातील दाखल्यांनुसार सध्याच्या काळाप्रमाणे दोन वा तीन अंडी वापरून नाही तर चांगली सात-आठ अंडी वापरून ऑम्लेट तयार व्हायचं. कारण त्या काळात हा एकेकटय़ा व्यक्तीसाठी नव्हे तर पूर्ण कुटुंबासाठी वा ग्रुपसाठी बनवला जाणारा पदार्थ होता. गावाकडे, शेतावर कोंबडय़ा राखणाऱ्या कुटुंबासाठी हा सोयीचा पदार्थ होता असं म्हणणं सयुक्तिक ठरेल. मात्र हाच पदार्थ नाश्त्याशी कसा जोडला गेला याची एक छान गोष्ट सांगितली जाते.
तर झालं असं की, दी ग्रेट नेपोलियन बोनापार्ट आपल्या सैन्यासह फ्रान्सच्या दक्षिण भागात कूच करत होता. याच भागातील बिझायर प्रांतात विश्रांतीसाठी तो थांबला. तिथल्या एका स्थानिक खानावळवाल्याने बोनापार्टला खास ऑम्लेट खाऊ घालून खूश केले. त्या ऑम्लेटची चव नेपोलियनला इतकी आवडली की त्याने गावातील सगळी अंडी गोळा करण्याचा आदेश सैनिकांना दिला. त्या खूप साऱ्या अंडय़ांचे भलेमोठ्ठे ऑम्लेट बनवून त्याला सैनिकांना दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ घालायचे होते. ही दंतकथा खरी असो वा नसो, पण आजही फ्रान्सच्या बिझायर प्रांतात वार्षिक उत्सव साजरा केला जातो आणि त्यात मोठमोठी ऑम्लेट्स बनवण्याची प्रथा पाळली जाते. पण या घटनेने ऑम्लेटचा नाश्त्याशी जो संबंध जोडला गेला तो आजही अबाधित आहे. ऑम्लेट व ब्रेड हा जगभरातील अनेक देशांचा ठरलेला नाश्ता आहे.
प्रत्येक देशात तिथल्या संस्कृतीप्रमाणे ऑम्लेटचं वैविध्य आढळून येतं. भारतात मसाल्यांचा वापर करून तयार केलेले मसाला ऑम्लेट चवीने खाल्ले जाते. ग्रीसमध्ये ऑम्लेट सोबत पास्ताचा खुबीने वापर होतो. इराणमध्ये चक्क अंडय़ात साखर फेटून आणि त्यात इतर पदार्थ वापरून हे ऑम्लेट तयार होते. इंग्लंड व अमेरिका दोन्ही देशांत दूध, अंडी, चीज ही ऑम्लेटसाठीची आवडती सामग्री आहे.
ऑम्लेटशी आपलं नातं दृढ झालंय त्याच्या ‘ईझी टू कुक’ स्वरूपामुळे. मुलगा असो वा मुलगी, स्वयंपाकघरात बनवल्या गेलेल्या पहिल्यावहिल्या पाककृतींमध्ये ऑम्लेटचा क्रमांक खूपच वरचा लागतो. अनेक पदार्थाचं रूप किंवा बनवण्याची पद्धत अगदी पक्की असते. ऑम्लेटमध्ये अंडय़ांचा अपवाद वगळता अन्य घटकांच्या बाबतीत अगदी हवे ते प्रयोग करून पाहायची मुभा आहे. त्यामुळे जगभरात हा पदार्थ अगदी आवडीने खाल्ला जात असला तरी त्याची तऱ्हा प्रत्येक ठिकाणी न्यारी आहे आणि हेच त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ आहे.
ऑम्लेट हा खास सवडीने, निगुतीने रांधला जाणारा पदार्थ नसला तरी त्याच्या सोपेपणातच लोकप्रियतेचं बीज रोवलेलं आहे. प्रत्येक संस्कृतीत म्हणी, वाक्प्रचारांमध्ये खाद्यपदार्थ स्थान पटकावून असतात. तशीच म्हण ऑम्लेट संदर्भातही प्रसिद्ध आहे .ou have to break few eggs to make an omlet. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है, या म्हणीचं हे इंग्रजी रूप.
आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत या सगळ्यांच्या ताटात विराजमान होणारं ऑम्लेट हे कडकडून भुकेल्या पोटावरचा झटपट पर्याय आहे. आयत्यावेळी वेळ मारून न्यायची वृत्ती या पदार्थात उपजत असावी. उशिरापर्यंत रात्री काम करणाऱ्या, फिरणाऱ्या मंडळींना हॉटेलचे बंद दरवाजे पाहून झालेल्या निराशेनंतर नाक्यावरची ऑम्लेट-पावची गाडी दिलासा देते तो अन्य कुणीही देणं शक्य नाही.
सकाळचा तुडुंब नाश्ता ते रात्रीचं लगबगीचं खाणं असे सर्व प्रहरी तत्पर ऑम्लेट पाहिले की म्हटला तर जवळचा, म्हटला तर तटस्थ, सदैव अबोल साथ देणारा जिवलग मित्र आठवल्यास नवल नाही.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Jupiter transits in Taurus sign
वृषभ राशीत गुरुचा प्रवेश होताच निर्माण होईल कुबेर योग! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळेल अमाप पैसा!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय