News Flash

वस्त्रान्वेषी :  धोतराचा इतिहास

धार्मिक कारणांसाठी पेहराव करताना एका हिंदूने दोन अखंड वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे

विनय नारकर

धोतर हे बहुतेकदा जोडीतच बनवले जायचे. त्याला धोतरजोड किंवा धोत्रजोड म्हटले जायचे. रेशमाचे काठ असणाऱ्या धोतरजोडीस रेशीमजोडा म्हटले जायचे. एक धोतर विणून झाल्यावर दुसरे विणण्याआधी थोडय़ाशा जागेवर सूत विणले जात नाही, फक्त ताणा ठेवला जायचा, त्या जागेला ‘कुरूळी’ म्हटले जाते. मराठी भाषा किती प्रगत आहे याचे हे एक उदाहरण आहे.

पुरुषांच्या पेहरावातील ‘शिरोभूषणां’ बाबत आपण विस्ताराने जाणून घेतले. भारतीय पुरुषांच्या पेहरावातील अतिशय महत्त्वाचे वस्त्र, जे भारतीयत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे, असे वस्त्र म्हणजे ‘धोतर’. ज्या काही गोष्टी मूळ भारतीय म्हणून गणल्या जातात, त्यात धोतराचा समावेश केला जाऊ शकतो. धोतर हे सर्वार्थाने भारतीय परिधान आहे. धोतराचे प्राचीनत्व निर्विवाद आहे. शेकडो वर्षे भारतीय पुरुषांचे परिधान म्हणून टिकून राहण्यात धोतराला जे यश मिळाले आहे, त्याला दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे धोतर हे भारतीय हवामानास सुसंगत असे आहे आणि दुसरे कारण हे धार्मिक आहे. एखाद्या वस्त्राच्या लोकप्रियतेत धार्मिक कारण जास्त महत्त्वाचे का पर्यावरणीय कारण जास्त महत्त्वाचे?, हे प्रत्येकाने आपल्यापुरते ठरवायचे आहे.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, धार्मिक कारणांसाठी पेहराव करताना एका हिंदूने दोन अखंड वस्त्र परिधान करणे गरजेचे आहे. अखंड वस्त्र हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. स्त्री आणि पुरुष दोघांना हा नियम लागू होतो.  पुरुषांसाठी धोतर व उत्तरीय किंवा उपरणे. यासोबत धोतर नेसण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. धर्मशास्त्रांनी हिंदू पुरुषांना जसे ‘द्विवस्त्र’ असायला सांगितले आहे तसेच त्यांनी ‘त्रिकच्छ’ असलं पाहिजे, असेही सांगतात. त्रिकच्छ म्हणजे पुरुषांनी धोतर नेसताना तीन ठिकाणी खोचले असले पाहिजे. ही तीन ठिकाणे म्हणजे नाभी खाली, मणक्याजवळ आणि कटी प्रदेशाच्या डाव्या बाजूला. धोतर अशा प्रकारे तीन ठिकाणी निऱ्या करून खोचले असले तरच धर्मशास्त्र संमत असते. अशी द्विवस्त्र आणि त्रिकच्छ असलेली व्यक्तीच धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ शकते. असे नसणे हे म्हणजे अशुद्ध असणे. एके ठिकाणी तर असे नमूद केले आहे की द्विवस्त्र आणि त्रिकच्छ नसणे म्हणजे नग्न असणे आणि कोणतीही नग्न व्यक्ती धार्मिक विधींमध्ये सहभागी नाही होऊ शकत.

प्रसिद्ध लेखक निराद चौधरी म्हणतात, ही हिंदू परिधान परंपरा असे अधिष्ठान असल्याने इतकी वर्ष टिकून आहे. हे परिधान फक्त पोषाख कधीच नव्हते, आजही नाहीत. उपयोगितेच्या पुढे जाऊन ही परिधान परंपरा आपल्या समाजाची सांस्कृतिक ओळख आहे. हिंदू धर्मशास्त्रांनी धोतर या परिधानाबद्दल किती कडक नियम घालून दिले आहेत हे एक गंमत म्हणून पाहू या.

अमुक्तकच्छको भुत्वा प्रस्र्वयाति यो नर:

वर्णे पित्रिमुखे दद्यात दक्षिणे देवतामुखे ॥

जो पुरुष आपल्या धोतराच्या मागच्या निऱ्या न काढता मूत्रविसर्जन करेल, तो ते डावीकडे गेले तर पितरांच्या मुखात जाईल व उजवीकडे गेले तर देवांच्या मुखात जाईल..!!

धोतराच्या उत्पत्तीची पर्यावरणीय कारणेही पाहणे महत्त्वाचं आहे, जी अगदी साधी आहेत. आपल्यासारख्या उष्ण प्रदेशात असे मोकळे ढाकळे, सुती, शक्यतो पांढरे वस्त्र परिधान करणेच सुसंगत आहे. आपल्या जीवनपद्धतीचे पाश्चात्तीकरण होण्याआधी आपल्याला जमिनीवर बसण्याचे प्रसंग बरेच असायचे. त्यासाठीही धोतरासारखे सहज दुसरे वस्त्र नाही.

धार्मिक विधी किंवा समारंभात नेसली जाणारी धोतरे ही सहजा रेशमी असत. यांना ‘सोवळे’ म्हणतात. रेशम हे शुद्ध समजले जाते. हे न धुता, फक्त पाणी शिंपडून शुद्ध होते, अशी धारणा असते. सोवळ्यामध्येही काही प्रकार होते. हे मलबेरी व तसर रेशमामध्ये विणले जायचे.  रेशमी धोतरांत ‘कद’ सगळ्यात जास्त वापरला जायचा. कद म्हणजे साधारणपणे काठ नसलेले रेशमी धोतर. पितांबर खूप लोकप्रिय होते. महाराष्ट्रात जरीकाठी पिवळ्या रंगाचे रेशमी धोतर बरेच प्रचलित होते म्हणजेच पितांबर. मुळात पितांबर पिवळे असायचे, परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे निरनिराळ्या रंगांमध्ये बनू लागले. हस्तिदंती, हिरवा, लाल, जांभळा या रंगांतही पितांबर बनू लागले. स्नानानंतर पितांबर नेसून पूजा करणे हे नित्याचे होते. अन्न ग्रहण करतानाही पितांबर नेसले जायचे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात करताना राजांनी पितांबर नेसण्याचाही रिवाज होता. विवाह प्रसंगी वधूपित्याने नवरदेवास पितांबराचा आहेर करण्याची प्रथा रूढ होती. लग्नप्रसंगी व उपनयन संस्कारावेळी आणि काही विशेष सणांना जसे दसरा, राम नवमी, लक्ष्मी पूजन पितांबरच नेसले जायचे. कुलदेवतेसंबंधी कुळ धर्माचरणाच्या वेळीही पितांबर नेसणे अनिवार्य होते. हे पितांबर पैठण आणि येवला इथे प्रामुख्याने विणले जायचे. जरीकांठ किंवा रूईफुल काठ असलेले मुकटा व ठेपाऊ ही बरेच वापरले जायचे. हे सहसा गुलाबी व जांभळ्या रंगात असायचे.

धोतर हे बहुतेकदा जोडीतच बनवले जायचे. त्याला धोतरजोड किंवा धोत्रजोड म्हटले जायचे. रेशमाचे काठ असणाऱ्या धोतरजोडीस रेशीमजोडा म्हटले जायचे. एक धोतर विणून झाल्यावर दुसरे विणण्याआधी थोडय़ाशा जागेवर सूत विणले जात नाही, फक्त ताणा ठेवला जायचा, त्या जागेला ‘कुरूळी’ म्हटले जाते. मराठी भाषा किती प्रगत आहे याचे हे एक उदाहरण आहे. धोतरजोडे विणण्यासाठी महेश्वर, नागपूर, पैठण, अष्टी, चांदवड, सोलापूर, एदगिर (विदर्भ)  या पेठी प्रसिद्ध होत्या. पैठणचे धोत्रजोड अर्थातच खूप प्रसिद्ध होते. पेशवेकाळात सामान्य जन जे धोत्रजोड वापरीत, त्याची किंमत १२ ते १६ रुपये असे. सरदार मंडळी सहसा नागपुरी उंची धोत्रजोड वापरीत, ते साधारण ४० रुपयांपर्यंत असे. पेशवे वापरीत असलेले जरीकाठी धोतरजोड ६० ते ७० रुपये किमतीचे असत. पैठणचे धोतरजोड त्याहून वरचढ.

पेशवे माधवराव यांनी नाना फडणवीसांना लिहिलेल्या काही पत्रांवरून त्या वेळच्या धोतरांबद्दल काही महत्वाच्या बाबी समजतात.  १७६५ मध्ये लिहिलेल्या पत्रातील हा मजकू र..

‘खासगीत नेसावयासी धोत्रजोडे पैठणी पाहिजेत. त्यास येथून धोतर मासल्यास पाठवले आहे. त्याप्रमाणे सूत व रेशीम या प्रतीचे लांब हात दहा व रुंद हात सव्वादोन येणेप्रमाणे पुण्यात मिळतील तर धोत्रजोडे दहा खरेदी करून पाठवून देणे. पुण्यात न मिळत तर पैठणहून आणवून पाठवून देणे’. (पेशवे दप्तर १७६५)

‘सरकारात खासे धोत्रेजोड अगदी नाहीत. त्यास पैठणी धोत्रेजोड दहा दर लांब हात अकरा व रूंद पावणेतीन हात याप्रमाणे सांडणीस्वाराबरोबर पाठवून देणे’. (पेशवे दप्तर ३२ सन १७६९)

पुण्यात मनाजोगते धोतरजोड नाही मिळाले तर पैठणवरून मागविले जात. या पत्रांवरून तेव्हाच्या धोतरांची लांबी व रुंदी समजते. इतकी लांब-रुंद धोतरे असत म्हणजे ते सूतही तितकेच तलम असणार. पेशवे दप्तरामध्ये धोतरांबद्दल आणखीही काही महत्त्वाची माहिती मिळते. अशी माहिती आणि धोतराबद्दल आणखी जाणून घेऊ या पुढच्या भागात.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:49 am

Web Title: history of dhoti zws 70
Next Stories
1 ‘परीक्षा’ ही जुलमी गडे…
2 संशोधनमात्रे : अभ्यासोनि प्रगटावे
3 कागद जिवंत करणारी कला!
Just Now!
X