02 June 2020

News Flash

शेफखाना : वाट उद्योजकाची

कामात व्यग्र राहणे, सतत पुढे चालत राहणे आणि प्रगतीचा विचार करत राहणे हाच यासाठी एकमेव उपाय आहे.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ प्रसाद कुलकर्णी

गेल्या आठवडय़ात आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील नव्या संधींविषयी माहिती जाणून घेतली. आता या संधींचा फायदा घेत असतानाच उद्योजकाने कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात आणि कुठल्या गोष्टींची जपणूक करायला हवी, याविषयीची माहिती आपण या शेवटच्या लेखात जाणून घेणार आहोत.

‘शेफखाना’ या सदरातील हा माझा शेवटचा लेख. नेहमीच पदार्थाविषयी बोलणाऱ्या या सदरात हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचा वेगळा विषय हाताळता आला, याचं मला अप्रूप वाटलं! आज आपण यशस्वी उद्योजक होण्याच्या मार्गात कोणत्या अडीअडचणी येतात व त्या कशा टाळाव्यात याची माहिती घेऊयात.

उद्योजक व्हायचे असेल तर सर्वप्रथम नैराश्य टाळावे. नकारात्मक दृष्टिकोन असेल तर बरेच प्रश्न निर्माण होतात. अशा प्रश्नांची संख्या वाढत जाते आणि त्यांची उत्तरं शोधण्याच्या नादात आपण आणखी प्रश्न निर्माण करतो. मी हे करण्यास सक्षम आहे का? हा व्यवसाय फायदेशीर आहे का? मी सर्व कर्जाची परतफेड करू शकेन का? माझ्या ग्राहकांना माझे उत्पन्न आवडेल का? आणि बरंच काही. अशा प्रश्नावलीतील प्रश्नांची तार एकमेकांशी जुळलेली असते व त्यांच्या दबावाखाली येऊ न व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच अंत होतो. असे प्रश्न सहसा व्यवसायाच्या सुरुवातीच्या किंवा पूर्वतयारीच्या काळात उद्भवतात. कदाचित असफलतेची शंकाच या प्रश्नांचे मूळ कारण आहे. त्यामुळे औदासिन्य किंवा नैराश्य टाळण्यासाठी आपण स्वत:ला कामात गुंतवून ठेवणे फार महत्त्वाचे आहे. कामात व्यग्र राहणे, सतत पुढे चालत राहणे आणि प्रगतीचा विचार करत राहणे हाच यासाठी एकमेव उपाय आहे. बरेचसे व्यावसायिक या काळातून जातात त्यामुळे ही काही फार गंभीर समस्या नाही, परंतु एकदा माणूस यात अडकला की बाहेर येणं कठीण होऊन बसतं.

यशस्वी उद्योजकाची पायरी चढताना..

व्यवसायातील दर्जाचे मापदंड सांभाळणे, आपले शिक्षण-कलाकौशल्ये काळानुसार प्रगत करत राहणे महत्त्वाचे आहे, नाही तर आपण व्यवसायात मागे पडू शकतो. त्यामुळे आत्मविश्वास ढळत जातो आणि माणूस आपोआप नैराश्याकडे झुकतो. प्रशिक्षण किंवा अनुभव-शिक्षणाची कमतरता, ठप्प व्यवसाय किंवा व्यवसायात पडलेलं काही काळाचं अंतर अशा परिस्थितीतून बाहेर पडणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळी लोक एका टप्प्यावर आपल्या व्यवसायाची वाढ थांबवतात आणि ‘आमची कुठेही शाखा नाही’ असं म्हणत पारंपरिक किंवा पूर्वीपासून चालत आलेल्या उत्पन्नावर निर्भर होतात. मग या परिस्थितीत उत्पन्नवाढीची, विस्ताराची सोयच राहात नाही. यासाठी व्यवसाय सल्लागाराच्या मदतीने आपल्या उद्योगात वाढ करता येऊ शकते.

व्यवसायातील कोल्डनेस टाळावा. हे निष्क्रियतेशी किंवा बदल टाळणाऱ्या परिस्थितीशी संबंधित आहे. ज्या वेळी एखादी व्यक्ती पूर्णपणे असाहाय्य आणि हरलेली असते, व्यवसाय संपूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर असतो तेव्हा ही परिस्थिती दिसून येते. दीर्घकाळ अपयश, तोटा हे यामागील मुख्य कारण होय. ही परिस्थिती टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीने वेळेतच उद्योग नियंत्रकाशी संपर्क साधण्याची गरज असते. व्यवसायावर परत नियंत्रण आणण्यात आणि भविष्यात व्यवसायाशी संबंधित कु ठलीही दुर्घटना टाळण्यासाठी तो मदत करू शक तो. तज्ज्ञांच्या मदतीने के ल्या जाणाऱ्या अशा बदलांचे आपण स्वागतच केले पाहिजे.

‘मी सर्वात श्रेष्ठ आहे’ किंवा ‘मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे’ या वृत्तीमुळे इतरांना निकृष्ट दर्जा देण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अशा प्रवृत्तीमुळे लोक आपल्या सोबत राहणे टाळतात, आपल्या चांगल्या आणि वाईटात आपल्याला एकटे टाकतात. म्हणूनच व्यवसायात ‘नम्रतेचे’ महत्त्व समजून घेणे फार गरजेचे आहे. त्यासाठी ‘डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर’ किंवा ‘पाय नेहमी जमिनीवर असावेत’ सारख्या विचारांचा दृष्टिकोन व्यवसायवाढीसाठी उपयोगी ठरतो.

व्यवसायात आपण एखाद्या प्रोग्रॅम रोबोटप्रमाणे वागतो किंवा विचार करतो आणि बदल स्वीकारण्यास कचरतो. यामुळे व्यवसायाला मर्यादा येतात, वाढ थांबते. सामान्यत: अशा दृष्टिकोनाची थट्टा करतात. आपल्याशी व्यवसाय करणे टाळतात. ग्राहक आपल्याकडून उत्पादने खरेदी करणे टाळतात. कधी कधी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरतो, परंतु प्रत्येक बाबतीत नाही. ‘आम्ही एक ते चार बंद असतो’ सारख्या पाटय़ा आपली सेवामर्यादा आणि परिणामी विक्रीतील घट वाढवणाऱ्या ठरतात. व्यवसाय ठरावीक पद्धतीने चालावा यासाठी देखरेखीखाली व्यवस्थित तयार केलेले नियम फायदेशीर ठरतात. व्यवसायातील कोणतेही नियम आपल्याला जाचकच वाटतात. त्यामुळे कर्मचारी आणि ग्राहक दोघांकडूनही ते मोडण्याचाच प्रयत्न केला जातो. कर्मचाऱ्यांनी कायम नियमांचे पालन केले तर ग्राहकांना सातत्याने सेवा देणे सोपे जाते.

बहुतेक वेळा गोष्टी टाळणे किंवा ठरवल्यानुसार कृती करण्याच्या बाबतीत आळशीपणा केला जातो. अशी व्यक्ती व्यवसायाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याच्या विचारप्रक्रियेमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करत नाही. त्यामुळे व्यवसायाचा असुरक्षित आणि बदलत असलेला स्वभाव कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये गांभीर्य व विश्वासाचा अभाव निर्माण करतो. हा गोंधळ वाढला तर दिशाभूल करणारी परिस्थिती उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी आपण धिराने काम घेणे आवश्यक आहे. सगळ्या गोष्टी नियोजनानुसार घडत आहेत आणि आपण कुठलीच संधी गमावली नाही हे पाहण्यासाठी सिंहावलोकन करणे गरजेचे आहे.

ब्रेडची भजी

साहित्य : बेसनाचे पीठ- २०० ग्रॅम, ५ ब्रेड स्लाइस, हळद १/४ टीस्पून, चवीनुसार मीठ, लाल मिरची पूड १/४ टीस्पून, धणे पूड १ टीस्पून, पार्सली १/४ टीस्पून, हिरवी मिरची २, तळण्यासाठी तेल.

कृती : प्रथम एका वाडग्यात बेसनाचे पीठ व्यवस्थित चाळून घ्या. त्यात पाणी घालून मिश्रण तयार करा. त्यात हळद, मीठ, लाल मिरचीची पूड, धणे पूड, पार्सली आणि मिरची घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर ब्रेड तुम्हाला आवडेल त्या आकारात कापून घ्या (त्रिकोण किंवा चौकोन). एका कढईत तेल गरम करा. कापलेले ब्रेड तयार बेसनाच्या मिश्रणात बुडवून तेलात व्यवस्थित लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्या. नंतर ही भजी एका टिश्यू पेपरवर काढून घ्या. गरम गरम भजी कोथिंबिरीच्या चटणीसोबत सव्‍‌र्ह करा.

ब्रेड दहीवडे

साहित्य : १० ब्रेड स्लाइस, २५० ग्रॅम दही, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ व काळीमिरी पूड, लाल मिरची पूड १/२ टीस्पून, आमचूर पावडर १/२ टीस्पून, चिरलेला पुदिना, एक चुटकी जिरे पूड, अनारदाना १ टीस्पून, पनीर.

कृती : प्रथम ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्या आणि ब्रेड पाण्यात भिजवून काढून ठेवा. पनीर बारीक करून घ्या व नंतर भिजवलेल्या ब्रेडसोबत एकजीव करून घ्या. या मिश्रणात चवीनुसार मीठ व एक चुटकी आमचूर पावडर घाला व परत एकजीव करा. तयार मिश्रणाचे बारीक बारीक गोळे करा. एका भांडय़ात थोडे पाणी गरम करून बाजूला ठेवून द्या. एका कढईत तेल तापवून घ्या. तयार गोळे तेलात लालसर होईपर्यंत तळून घ्या. तळलेले गोळे गरम पाण्यात १० मिनिटं भिजत ठेवा व नंतर त्यातले पाणी पिळून काढा. दही छान फेटून घ्या. मग त्यात मीठ आणि मिरची पूड घाला. हे दही तळलेल्या गोळ्यांवर टाका व पुदिना, जिरेपूड, अनारदाना पावडर टाकून सजवा.

ब्रेडचा उपमा

साहित्य : ५ ते ६ ब्रेडचे स्लाइस बारीक क्यूबमध्ये कापलेले, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहोरी, १/२ टीस्पून जिरे, १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, १ टीस्पून बारीक चिरलेलं आलं, ६ ते ७ कढीपत्ते बारीक चिरलेले, २ मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरलेले, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून लाल मिरची पूड, १ चुटकी हिंग, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ.

कृती : एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करा. गरम तेलात १ टीस्पून मोहरी व १/२ टीस्पून जिरे टाका. व्यवस्थित तडतडू द्या. जिरे लालसर होईपर्यंत परता. पुढे त्यात १/२ कप चिरलेला कांदा टाका व बारीक ते मध्यम आचेवर कांदा पिवळसर होईपर्यंत परतून घ्या. मग त्यात हिरवी मिरची, आले व कढीपत्ता घालून १० ते १२ सेकंद परतून घ्या. नंतर यात टोमॅटो, हळद, लाल मिरची पूड आणि १ चुटकी हिंग घाला व हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. तुम्हाला जास्ती तिखट खाण्याची सवय असल्यास तुम्ही १/२ चमचा तिखट जास्त घालू शकता. मिश्रण एकजीव झाल्यावर यात चवीनुसार मीठ टाका. हे मिश्रण टोमॅटो छान मऊ  होईपर्यंत व संपूर्ण मिश्रणाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्या. टोमॅटो व्यवस्थित शिजतील याची काळजी घ्या नाही तर त्यातला कच्चेपणा जाणवू शकतो. तसेच हे मिश्रण जास्त ओले किंवा रस्सेदार करू नका नाही तर त्यातला ब्रेड अतिरिक्त भिजला जाईल. तयार मिश्रणात ब्रेड क्यूब घाला व बारीक आचेवर व्यवस्थित एकजीव करून घ्या. ब्रेडचे काठ कुरकुरीत होईपर्यंत हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे परता. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार ब्रेड उपमा नाश्त्यासाठी गरमागरम सव्‍‌र्ह करा.

ब्रेडचे घावण

साहित्य : ६ ते ७ ब्रेड स्लाइसेस पाण्यात भिजवलेले, १ बारीक कांदा, १ ते २ हिरव्या मिरच्या, १ ते २ टेबलस्पून तांदळाचे पीठ, १ कप रवा, १/२ इंच आल्याचा तुकडा, १ ते २ टेबलस्पून चिली फ्लेक्स, २ ते ३ टेबलस्पून दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, परतण्यासाठी तेल.

कृती : भिजलेला ब्रेड पिळून त्यातले अतिरिक्त पाणी काढून टाका. पुढे एका वाडग्यात तांदळाचे पीठ, रवा व दही एकजीव करून घ्या. या मिश्रणात ब्रेड स्लाइस, कांदा, मिरची, आलं, कोथिंबीर घाला व त्या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून डोश्याच्या पिठाप्रमाणे पातळ करून घ्या. मिश्रणाचे घावण अगदी सहजपणे गोलाकार होणे कठीण आहे, पण हे घावण रवा डोसा किंवा घावण्याप्रमाणेच घालावेत. गरजेनुसार तेल वापरून परतून घ्या व दोन्ही बाजूने लालसर भाजून घ्या. ब्रेडचे घावन तयार आहे. आवश्यक असल्यास वरून चिली फ्लेक्स घाला.

ब्रेड थालीपीठ

साहित्य : ८ ब्रेड स्लाइस, गव्हाचे पीठ १/४ कप, १ बारीक चिरलेला कांदा, १ हिरवी मिरची, लाल मिरची पूड १/४ टीस्पून, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल.

कृती : एका वाडग्यात ब्रेडचे स्लाइस भिजत ठेवा. ब्रेड मिक्सरमध्ये बारीक वाटा व त्यात गव्हाचे पीठ, कांदा, मिरची आणि मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या. तयार पिठाचे लहान लहान गोळे करा व त्या गोळ्यांचे थालीपीठ थापून घ्या. तवा गरम करा व गरम तव्यावर थापलेले थालीपीठ व्यवस्थित तेल लावून दोन्ही बाजूने भाजून घ्या. ब्रेडचे थालीपीठ तयार आहे.

शब्दांकन : मितेश जोशी

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 12:03 am

Web Title: hospitality careers entrepreneur abn 97
Next Stories
1 गड दुर्गा
2 फॅशनेबल नवरात्र
3 मिशन फिटनेस
Just Now!
X