टेकजागर : आसिफ बागवान

भारतात दूरदर्शन सुरू झाल्याच्या घटनेला १५ सप्टेंबर रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. १४ सप्टेंबर १९५९ रोजी दिल्लीत एक छोटा ट्रान्समीटर आणि तात्पुरत्या स्टुडिओच्या मदतीने देशात प्रथमच टीव्ही प्रसारणाला सुरुवात झाली. तोपर्यंत भारतात टीव्ही या उपकरणाची अनेकांना माहितीही नव्हती. दूरदर्शनच्या पाच मिनिटांच्या बातम्यांचे नियमित प्रसारण सुरू होण्यास १९६५ साल उजाडले आणि मुंबईसारख्या महानगरात ते पोहोचण्यासाठी १९७२ साल उजाडले. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षांपर्यंत दूरदर्शन हे जेमतेम सात मोठय़ा शहरांपर्यंत पोहोचलं होतं. ते राष्ट्रव्यापी होण्यास आणखी सात वर्षे मोजावी लागली. त्याच वर्षी, १९८२मध्ये भारतीयांनी पहिल्यांदा रंगीत टीव्हीचा अनुभव घेतला..

हे सगळं आठवण्याची दोन कारणं. एक म्हणजे आज घराघरांत कुटुंबातील अविभाज्य घटक बनलेल्या टीव्हीचा पाया ६० वर्षांपूर्वी याच महिन्यात रचला गेला होता. दुसरं म्हणजे, गेल्या ६० वर्षांत दूरदर्शन ते डिजिटल असा प्रवास करणारा टीव्ही आता ‘स्मार्ट’ होऊन इंटरनेट विश्वाशी समरस होऊ लागला आहे. मनोरंजनाचं हे माध्यम आता अधिकाधिक व्यापक होऊ लागलं आहे. ‘ऑनलाइन स्ट्रिमिंग’ ही संकल्पना भारतीय प्रेक्षकांना अधिकाधिक आकर्षित करू लागली आहे. अवघ्या तीन-चार वर्षांत इंटरनेटद्वारे प्रसारित केल्या जाणाऱ्या वाहिन्यांनी भारतात आपलं बस्तान बसवलं आहे. २००८ मध्ये रिलायन्सने ‘बिगफ्लिक्स’ नावाची ‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) सेवा सुरू केली खरी; पण झी आणि सोनी या वाहिन्यांच्या ‘ओटीटी’ प्रसारणास सुरुवात झाल्यानंतर भारतीय प्रेक्षकांना मनोरंजनाचं हे नवीन माध्यम उमजलं. त्यावर कळस चढवला तो ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’ आणि ‘हॉटस्टार’ या प्लॅटफॉर्मनी. मागून आलेल्या ‘नेटफ्लिक्स’ने आपल्या ‘पाश्चात्त्य महती’च्या जोरावर अल्पावधीतच या ओटीटी प्लॅटफॉर्मना स्पर्धा निर्माण केली. आजघडीला देशात ४० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म कार्यरत असून त्यांची उलाढाल साधारण तीन हजार कोटींच्या आसपास आहे. त्यातच आता अ‍ॅपलनं ‘अ‍ॅपल प्लस टीव्ही’च्या रूपात या स्पर्धेत उडी घेतली आहे.

‘ओटीटी’ प्लॅटफॉर्ममधील ही स्पर्धा सध्या जगभरात सुरू आहे. ‘अ‍ॅपल प्लस टीव्ही’ हा या स्पर्धेचाच एक भाग आहे. गेल्याच आठवडय़ात कॅलिफोर्नियात झालेल्या वार्षिक परिषदेत अ‍ॅपलने आपल्या नव्या ‘स्ट्रिमिग’ सेवेचे अनावरण केले. नवनवीन वेबसीरिज, लोकप्रिय चित्रपट आणि मालिका या वाहिनीद्वारे प्रसारित करण्याचे अ‍ॅपलने जाहीर केले आहे. सुमारे पाच डॉलर प्रतिमहिना इतके शुल्क ‘अ‍ॅपल प्लस टीव्ही’ आकारणार आहे. यात अ‍ॅपलची खरी टक्कर नेटफ्लिक्सशीच आहे. नेटफ्लिक्स ही जगभरातील लोकप्रिय ओटीटी वाहिनी असल्यामुळे अ‍ॅपलने थेट या वाहिनीलाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका आणि अन्य काही राष्ट्रांत नेटफ्लिक्स सुमारे १४ डॉलरच्या आसपास मासिक शुल्क आकारते. अ‍ॅपलने त्याच्या निम्म्याहूनही कमी मासिक शुल्कात आपली सेवा जारी केली आहे. इकडे भारतातही अ‍ॅपल आणि नेटफ्लिक्स यांच्यात भारतीय प्रेक्षकांसाठी टक्कर होणार आहे. कारण भारतात ‘अ‍ॅपल प्लस टीव्ही’ अवघ्या ९९ रुपये प्रतिमहिना या दराने उपलब्ध होईल. भारतीय प्रेक्षकवर्ग किमतीच्या बाबतीत चोखंदळ असल्यामुळे अ‍ॅपलने १०० रुपयांपेक्षाही कमी मासिक शुल्कात आपली सेवा देऊ केली आहे. हे दर नेटफ्लिक्सच नव्हे तर भारतातील अन्य काही ओटीटी वाहिन्यांच्या मासिक शुल्कापेक्षाही कमी आहेत. नेटफ्लिक्सचे टीव्हीवरील मासिक प्रसारण शुल्क पाचशे रुपयांपासून सुरू होते. मात्र, भारतातील दरस्पर्धा पाहून त्यांनीही गेल्या महिन्यापासून दोनशे रुपयांत प्रसारणाचा ‘मोबाइल प्लॅन’ सुरू केला. ‘झी ५’ सारखी वाहिनी ९९ रुपये मासिक शुल्काने सेवा पुरवते. ‘हॉटस्टार’वर वार्षिक योजनाच असल्यामुळे तेथे ९९९ रुपये भरून या वाहिनीची ‘प्रीमियम’ सेवा मिळवता येते. अशा स्पर्धात्मक दरांच्या स्पर्धेत अ‍ॅपलने तळापासून सुरुवात करत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापाठोपाठ ‘डिस्ने’ ही लहान मुलांपासून किशोरवयीनांमध्ये लोकप्रिय असलेली वाहिनीही ‘ओटीटी’ क्षेत्रात स्वतंत्रपणे उतरणार आहे. डिस्नेने अमेरिकेत सात डॉलर मासिक शुल्कानिशी प्रसारण जाहीर केले आहे. मात्र, भारतात त्यांचे शुल्क अ‍ॅपलच्या मासिक शुल्काइतकेच असण्याची शक्यता आहे.

भारतातील ओटीटी वाहिन्यांची बाजारपेठ त्या तुलनेत नवी आहे. त्यामुळे त्यामध्ये विस्तारण्याची प्रचंड क्षमता आहे. एका कंपनीच्या अंदाजानुसार भारतातील व्हीडिओ स्ट्रिमिंग उद्योग दरवर्षी २० टक्क्य़ांची वाढ नोंदवण्याची शक्यता आहे. २०२३ पर्यंत या उद्योगाची उलाढाल १.७ अब्ज डॉलरच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.  आजघडीला देशातील ६२ कोटीहून अधिक जनता इंटरनेटशी जोडली गेली आहे. यातील मोठा टक्का विशेषत: तरुणवर्ग मनोरंजनासाठी पारंपरिक माध्यमांऐवजी ऑनलाइन माध्यमाला पसंती देऊ लागला आहे. दर्जेदार कार्यक्रम, विषयांतील नावीन्य, जाहिरातविरहित प्रसारण आणि सेन्सॉरची कात्री नसल्याने असलेला खुलेपणा या सर्वामुळे तरुणवर्गात ओटीटी वाहिन्यांना अधिकाधिक पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर, त्यासाठी पैसे मोजण्याची मानसिकताही या वर्गात रुजली आहे. त्यामुळे साहजिकच या सर्व कंपन्यांचा ओढा भारताकडे वाढतच राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याला ऑनलाइन स्ट्रिमिंगचे असंख्य पर्याय उपलब्ध होतील, यात शंका नाही.

viva@expressindia.com