जीजिविषा

बऱ्याचदा आपलं काय किंवा कुठे चुकतं आहे हे आपल्या जवळचे लोक आपल्यावरच्या प्रेमापोटी क्वचित भीतीने आपल्याला सांगू शकत नाहीत. पण हे मेंदूचे डॉक्टर त्याविषयी तुम्हाला सांगतील. तुमचं आयुष्य तुम्हाला पूर्णपणे जगण्यासाठी मदत करतील. दुसऱ्यांना कसा आहेस किंवा कशी आहेस हे विचारण्याआधी हा प्रश्न स्वत:ला विचारा.

तर गेल्या आठवडय़ात माझी आणि माझ्या मैत्रिणीची इतक्या दिवसांच्या लांबलेल्या भेटीचा किस्सा मी तुम्हाला सांगत होते. तिच्या या गोंधळाचे कारण बाजूला ठेवूयात. पण, यानिमित्ताने माझ्या डोक्यात एक विचारचक्र सुरू झालं होतं.

आपल्याकडे नेहमी दु:ख या भावनेकडे तुच्छतेनेच बघितले जाते. कोणी कधी काही सांगितलंच तर त्यांच्या दु:खांचा बोभाटा आपण गावभर करतो. फार फार तर ‘बिचारा किंवा बिचारी!’, असा एक उद्गार  काढून आपण मोकळे होतो. दु:खाला कुरवाळून काय होणार आहे? आपले प्रॉब्लेम्स आपल्यालाच सॉल्व्ह करायला लागतात, असं  रडत बसून काय मिळणार आहे? ही आणि अशाच अर्थाची बरीच वाक्यं ऐकतच आपण मोठे होतो आणि मग दु:ख ही लपवायची गोष्ट असते हे यातून शिकतो आणि तेच पुढे शिकवत राहतो. दु:ख ‘मनात’ दाबून ठेवतो! मन म्हणजे काय? ते दिसत नाही त्यामुळे त्याला होणारे त्रासही अदृश्यच असावेत, अशी माणूसप्राण्यांची अपेक्षा असते. पण विचार मेंदूत तयार होतात आणि मेंदू हा शरीराचा भाग आहे हे आपण विसरतो. टॅन होऊ  नये म्हणून त्वचेची आपण किती काळजी घेतो, केस छान राहावेत म्हणून तेलाचे खत घालतो, पण मेंदूकडे मात्र साफ दुर्लक्ष करतो. कधी कोणी चुकून प्रयत्न केलाच जरी बोलायचा – तरी त्यावर आपण ‘ठीक आहे रे, सगळं नीट होईल. फेज असते ही फेज..’ अशी एक थूकपट्टी चिकटवून देतो. पण पट्टी निघाली की आत झालेल्या सेप्टिकचं काय? मग ती पट्टी कधी निघेल? कुठे – कशी निघेल हे नाही सांगता येत? कधी कॅफेमध्ये, कधी ऑफिस टॉयलेटमध्ये, कधी मैत्रिणीने सहज कशी आहेस?, असं विचारल्यावर तर कधी एकटय़ात? मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याएवढेच महत्त्वाचे आहे हे आपण विसरतो, कारण त्याबद्दलचे संवाद क्वचितच कोणत्या घरात होत असावेत.

सुसाइड करणाऱ्यांना भेकड म्हणून त्यांची निंदा केली जाते, पण माणूस जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपल्यासमोर असला तरी आपल्याला त्याचे दु:ख दिसत नाही. जवळची व्यक्ती वारली तरी दुखवटा मोजके दिवसच करायचा असतो मग त्यापुढे वाईट नसतं म्हणे वाटून घ्यायचं? कोणाला कोणत्या गोष्टीचे किती वाईट वाटायला हवं याचं  गणित समाजाने मांडून ठेवलं आहे. पण काही लोक कच्चे असतात गणितात हे समाज विसरतो. पण आपण हे विसरून चालणार नाही. दु:ख वैध आहे, किंवा सोशल मीडियाच्या भाषेत म्हणायचे झाले तर ‘दु:ख लेजिट आहे ब्रो !’ ते नसतं तर माणसाने जिवाचा आटापिटा करून प्रत्त्येक भाषेत त्या भावनेसाठी शब्द नेमला नसता. डिप्रेशन, अँग्झायटी आणि इतर आजार हे त्या पट्टीखालच्या ना भरलेल्या जखमेचे प्रतीक आहेत. मित्रमैत्रिणी, भावंडं, आई-वडील आहेतच, पण प्रत्येकाला आयुष्यात वैयक्तिक त्रास असतातच आणि म्हणूनच आपल्या मदतीसाठी मेंदूचे डॉक्टर धावून येत असतात. कोणीतरी त्यांचं पूर्ण आयुष्य हे माणसाच्या मेंदूला समजून घेण्यासाठी अर्पण केलं आहे, त्यांनी अभ्यास केला आहे तर त्यांना नक्कीच तुमची मदत करायला एक संधी द्या. बऱ्याचदा आपलं काय किंवा कु ठे चुकतं आहे हे आपल्या जवळचे लोक आपल्यावरच्या प्रेमापोटी क्वचित भीतीने आपल्याला सांगू शकत नाहीत. पण हे मेंदूचे डॉक्टर त्याविषयी तुम्हाला सांगतील. तुमचं आयुष्य तुम्हाला पूर्णपणे जगण्यासाठी मदत करतील. दुसऱ्यांना कसा आहेस किंवा कशी आहेस हे विचारण्याआधी हा प्रश्न स्वत:ला विचारा. या प्रश्नांची लहानपणापासून पाठांतर केलेली उत्तरं  विसरून जा आणि नव्याने स्वत:ला ओळखा, स्वत:चा शोध घ्या. ज्यांना आपली काळजी वाटते त्यांच्यापासून गोष्टी लपवू नका.

मी या सगळ्याचा विचार करत असतानाच श्वेता चहा घेऊन आली. आम्ही गप्पा मारल्या, तिने मन मोकळे केले आणि आम्ही तिच्यासाठी एक थेरपिस्ट शोधली. कालच तिचा फोन आला सांगायला की पहिले सेशन चांगले झाले. कशी आहेस?, मी पुन्हा विचारलं. ‘बेटर’ असं उत्तर मिळालं. ऐकून हायसं वाटलं. असो. तर ही कहाणी इकडे अजिबात संपलेली नाही.

खरंतर या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे, त्यामळे हा विषय मी इथे न संपवता तुम्हाला आग्रह करते आपापसांत का होईना चर्चा करा. पुढच्या वेळी जेव्हा कोणाला कसे आहात विचाराल तेव्हा औपचारिकता सोडून खरंच जाणून घ्या.

जाता जाता आजची टीप – जंक फूड हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. जे हार्मोन्स आपल्याला आनंदी राहायला मदत करतात त्यातला एक महत्त्वाचा हॉर्मोन हा पोटात (आतडय़ात) तयार होतो.  छान खाल तर छान राहाल.

कळावे,

जीजि