उन्हाळा आता चांगलाच जाणवायला लागला आहे. चटका बसणाऱ्या उन्हापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लोशन किंवा क्रीम आवश्यकच आहे. बाजारात पुरेपूर संरक्षणाची हमी देणारी आणि जादुई परिणामाचा दावा करणारी अनेक सनस्क्रीन उपलब्ध आहेत. पण कुठलं सनस्क्रीन आपल्या त्वचेसाठी योग्य हे कसं ओळखायचं? सनस्क्रीनमध्ये नेमकं असतं तरी काय? योग्य उत्पादन निवडताना काय काय बघायचं?

एसपीएफ फॅक्टर
हा घटक तुमच्या त्वचेचं अतिनील किरणांपासून म्हणजेच यूव्ही बीमपासून रक्षण करतो. त्वचेला उन्हाळा सोसत नसेल, लगेच लाल चट्टे उठत असतील तर एसपीएफ घटक जास्त असलेलं सनस्क्रीन लोशन निवडावं. १५ ते ३० एसपीएफ असणारी अनेक सनस्क्रीन उपलब्ध असतात. उन्हात गेल्यानंतर ज्यांच्या त्वचेला लगेच लालसरपणा येतो किंवा लवकर सनबर्न्‍स येतात त्यांना सनबर्नपासून बचाव करण्यासाठी एसपीएफ किमान ५० असावा लागतो. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या सनस्क्रीनमध्ये किमान संरक्षणासाठी एसपीएफ ५० असतो.

यूव्हीए फॅक्टर
त्वचेवर होणाऱ्या पिगमेंटेशनपासून बचाव करण्यासाठी यूव्हीए फॅक्टर काम करतो. यूव्हीए प्रोटेक्शन पीपीडी (परसिस्टंट पिगमेंट डार्कनिंग) फॅक्टरनुसार मोजतात. पीपीडी फॅक्टर जास्त तितकं यूव्हीए प्रोटेक्शन जास्त. त्यामुळे सनस्क्रीन घेताना पीपीडी फॅक्टरही तपासून बघा.

वॉटर रेझिस्टंट
काही सनस्क्रीन लोशन्स सँड आणि वॉटर रेझिस्टंट असतात. त्यामुळे त्वचेला क्रीम लावल्यानंतर हात- पाय – तोंड धुतलं तरी संरक्षण कायम राहतं. ज्याचे काम जास्त वेळ बाहेर फिरण्याचे आहे त्यांनी शक्यतो सँड आणि वॉटर रेझिस्टंट प्रॉडक्ट निवडावं.

तेलकटपणा नसावा
सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचा चिकट व्हायला नको. मुंबईसारख्या शहरात उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो. त्यातून सनस्क्रीन लोशन किंवा क्रीममुळे आणखी घाम आला तर त्वचेला चिकटपणा येतो, चेहरा तेलकट दिसतो आणि त्वचेच्या संरक्षणाऐवजी हानीच जास्त होते. ज्यांची स्कीन ऑइली आहे, त्यांनी तर सनस्क्रीन निवडताना विशेष काळजी घेतली पाहिजे. ऑइल फ्री गुणधर्म असणारी सनस्क्रीन अशा व्यक्तींसाठी योग्य ठरतील.

सनस्क्रीन कधी आणि कसे लावावे?
घराबाहेर पडण्यापूर्वी किमान २० ते ३० मिनिटे आधी सनस्क्रीन लोशन लावावे. उघडय़ा राहणाऱ्या सर्व भागावर सनस्क्रीनचा पातळ आणि एकसारखा थर देणे आवश्यक आहे. चेहऱ्याबरोबर, हात, पाय, पावलं यांनाही सनस्क्रीन लावावं. थेट उन्हात काम नाही किंवा गाडीतूनच जायचं आहे अशी परिस्थिती असेल तरी उन्हाळ्यात सनस्क्रीन लावून बाहेर पडणंच श्रेयस्कर आहे. पूर्णवेळ उन्हात काम असेल तर दर काही तासांनी सनस्क्रीन लोशन लावावं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात सनस्क्रीन लोशनसारखे वरवरचे उपाय कितीही केले तरी मुळात शरीर थंड राखणारे पदार्थ आणि प्रामुख्याने भरपूर द्रवपदार्थ घेणे आवश्यक आहे. उन्हात जाण्याआधी आणि उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. काही वेळाने मात्र भरपूर पाणी प्यावे. उन्हाळ्यात स्कीन हायड्रेटेड राखणं आवश्यक आहे.
(हाऊस ऑफ लॉरिएलच्या व्हिची लॅबोरेटरीकडून मिळालेल्या माहितीवर आधारित)