दीपेश वेदक, मुंबई viva@expressindia.com

तंत्रज्ञानाचा वास्तव आयुष्याशी असलेला संबंध हा एरव्हीही सहज लक्षात येत नाही इतकं  आधुनिकीकरण आपल्या अंगवळणी पडलं आहे. टाळेबंदीमुळे तंत्रज्ञानाचा आपल्या आयुष्यातील वापर आणखीनच वाढला आहे. टाळेबंदीत अशक्य असलेल्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य होत आहेत. याची प्रचीती नुकतीच आयआयटी, मुंबईच्या विद्यार्थ्यांनी घेतली. आयआयटीचा पदवीप्रदान सोहळाही सध्या करोना काळातील परिस्थितीमुळे रखडला होता. मात्र पदवीप्रदान सोहळा झाला नाही तर विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडेल हे लक्षात घेत आभासी सोहळ्याचे आयोजन करत आयआयटीच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. अर्थात, आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा प्रत्यक्ष अनुभवता आला नाही, याची खंतही विद्यार्थ्यांच्या मनात असली तरी जो सोहळा घडला तोही दखल घेण्याजोगा होता, हे तेही मान्य करतात.

पदवीप्रदान सोहळा हा विद्यार्थीदशेतील एक महत्त्वाचा टप्पा. त्यातही आयआयटी, मुंबईमधून पदवी घेऊन बाहेर पडणं, हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र तीन ते चार वर्षे मेहनत घेऊन जेव्हा पदवीप्रदान सोहळ्याची वेळ आली तेव्हा टाळोबंदीमुळे विद्यार्थ्यांंचा हा सोहळा लांबणीवर जाणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अनेक विद्यार्थ्यांंना शिक्षणानंतर लगेच नोकरी लागल्याने त्यांना पदवी प्रमाणपत्र घेऊन कंपनीमध्ये रुजू व्हायचं होतं. तर अनेकांना पुढील शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र गरजेचं होतं. अशा वेळी विद्यार्थ्यांंची गैरसोय होऊ नये आणि त्यांना पदवी प्रमाणपत्र लवकर मिळावं, तसंच पदवीप्रदान सोहळा लांबणीवर पडू नये म्हणून आयआयटीच्या प्राध्यापकांनी आभासी पदवीप्रदान सोहळा आयोजित केला. या सोहळ्यात प्रत्येक विद्यार्थ्यांला आपल्या आभासी प्रतिमेच्या माध्यमातून का होईना पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्याची अनुभूती मिळाली. अशाप्रकारे आभासी पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्याचा पहिलाच प्रयत्न आयआयटी मुंबईने यशस्वी करून दाखवला.

‘पदवीप्रदान सोहळा खूप महत्त्वाचा असला तरी सध्याची परिस्थिती बघता प्रत्यक्ष हजेरी लावून तो पार पडणं शक्य नव्हतं. अशा वेळी आयआयटी, मुंबईच्या प्राध्यापकांनी पुढाकार घेऊन साकारलेल्या या छोटेखानी आभासी सोहळ्याला आम्ही हजर राहिलो. महिनाभर मेहनत घेऊन त्यांनी दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांंचे आभासी रूप तयार केले आणि हा सोहळा पार पाडला, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत,’ अशी प्रतिक्रिया याच संस्थेतून पदवी घेतलेल्या चिन्मय भोगावकरने व्यक्त केली. ‘परीक्षा वेळेत झाल्या, मात्र टाळेबंदीमुळे प्रत्यक्ष भेटून पदवीप्रदान सोहळा होणं शक्य नव्हतं. अशा वेळी हा सोहळा पुढच्या वर्षी घ्यावा, असंही अनेकांचं म्हणणं होतं. मात्र पदवी घेतल्याचे प्रमाणपत्र सर्व विद्यार्थ्यांंना हवं होतं आणि ते वेळेत विद्यार्थ्यांंना सुपूर्द करणं ही आयआयटी, मुंबईची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी टाळेबंदी संपण्याची वाट पाहणं चुकीचं ठरलं असतं. म्हणून आभासी पद्धतीने झालेल्या या सोहळ्याचे कौतुकच आहे’, असं तो पुढे म्हणाला. या दोन तासांच्या सोहळ्यासाठी जवळपास दोन महिने २० जणांचा चमू कार्यरत होता. पदवी स्वीकारणारे दोन हजार विद्यार्थी, सोहळ्यासाठीचे प्रमुख पाहुणे—मान्यवर अशा जवळपास ३८ व्यक्ती.. या सगळ्यांच्या डिजिटल प्रतिमा तयार करणे, यासाठी पुरस्कार देणाऱ्या प्रमुख पाहुण्यांच्याही बसताना, राष्ट्रगीतासाठी उभे राहताना, पुरस्कार देताना अशा वेगवेगळ्या अवस्थेतील प्रतिमा विकसित करण्याचे आव्हानही या २० जणांसमोर होते आणि त्यांनीही ते यशस्वीरीत्या पेलले.

आयआयटीत प्रवेश घेतल्यापासूनच आम्हाला पदवीप्रदान सोहळ्याचं आकर्षण असतं. त्यामुळे या सोहळ्यासाठी आम्ही सगळेच विद्यार्थी खूप उत्सुक होतो. मात्र टाळेबंदी होऊन हा सोहळा असा आभासी पद्धतीने होईल, अशी अपेक्षा मुळीच नव्हती. विद्यार्थ्यांंचे हित लक्षात घेऊन हा सोहळा वेळेत पार पडला असला तरी विद्यार्थ्यांंच्या त्या उत्साहाचं काय?’, असा सवाल आयआयटी, मुंबईतून पदवी घेतलेला आकाश गणवीर विचारतो. आपल्या मुलाच्या पदवीप्रदान सोहळ्याला हजर राहावं ही अनेक पालकांची इच्छा असते. विद्यार्थ्यांंनाही हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा असतो. आपल्या प्राध्यापकांना, मित्रांना एकदा शेवटचं भेटायचं असतं. या आभासी सोहळ्यामुळे हे काहीच करता आलं नाही, अशी खंतही तो व्यक्त करतो. पदवीप्रदान सोहळा पुन्हा घेता येणं शक्य नाही, मात्र विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांची राहून गेलेली भेट टाळेबंदीनंतर घडवून आणावी, अशा मागणीचा अर्ज काही विद्यार्थ्यांंनी आयआयटी, मुंबईकडे केल्याचं आकाश सांगतो. महिनाभर मेहनत घेऊन, प्रत्येक विद्यार्थ्यांंची उंची आणि इतर बाबी लक्षात घेत साकारलेल्या विद्यार्थ्यांंच्या आभासी रूपाचे तो कौतुकही करतो. आयआयटी, मुंबईच्या इंडस्ट्रिअल डिझाईन विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक डिझाईन क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत, त्यांची मदत घेतल्यास हा सोहळा अधिक चांगल्या प्रकारे झाला असता, असेही त्याने नमूद केले. तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी नामांकित संस्था जेव्हा कोणतीही कल्पना नसताना प्रत्यक्षात असा आभासी सोहळा उभा करते तेव्हा त्याबद्दल विद्यार्थ्यांंच्या मनात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या तरी त्याचे सकारात्मक पडसाद जनमानसावर उमटले आहेत. सध्या जगभरात आभासी वास्तवाबद्दल (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) नवनवीन संशोधन सुरू असताना आयआयटी मुंबईने साकारलेल्या या आभासी पदवीप्रदान सोहळ्याने तंत्राविष्काराचे नवे अवकाश विद्यार्थ्यांसमोर खुले के ले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.