26 September 2020

News Flash

जीवनशैलीतच फिटनेस हवा..

शरीराबरोबर मनाचा फिटनेस कसा जपायचा हे तज्ज्ञांकडून समजून घेण्यासाठी हा फिटनेस विशेषांक.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य, तंदुरुस्ती महत्त्वाची हे सगळ्यांना कळतं. ‘फिटनेस’ हा परवलीचा शब्द झाला असला, तरी त्यासाठी वेळ देणं काही जणांना अवघड जातं. काही जण वेळ देतात, पण माहितीच्या महापुरात चुकीच्या दिशेने वाहवत जातात. किशोरवयातच लठ्ठपणा, थायरॉइडसंबंधी आजार वाढत आहेत आणि ऐन तारुण्यात रक्तदाब, मधुमेहासारखे विकार जडू लागले आहेत. फिटनेससाठी व्यायाम आणि आहार या दोन गोष्टींवर लक्ष द्यायला हवं; पण कसं? फिटनेसच्या जगात नेमकं काय सुरू आहे? डाएटसंदर्भातल्या घोडचुका कोणत्या आणि आहारासंबंधीचे गैरसमज कुठले? शरीराबरोबर मनाचा फिटनेस कसा जपायचा हे तज्ज्ञांकडून समजून घेण्यासाठी हा फिटनेस विशेषांक ‘व्हिवा’ वर्धापन दिनानिमित्त देत आहोत. ख्यातनाम आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या अंकाच्या अतिथी संपादक आहेत. ऋजुता सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट म्हणून प्रसिद्ध असून करिना कपूर, आलिया भट, रिचा चढ्ढा, शाहीद कपूर, अनिल अंबानी यांच्यासारखे सेलेब्रिटी डाएटचा सल्ला ऋजुता यांच्याकडून घेतात. वेटलॉस आणि डाएटबाबतच्या गैरसमजुतींवर त्यांनी टाकलेला झळझळीत प्रकाशझोत आणि त्यांनी दिलेली फिटनेसची चतुसूत्री..

फिटनेसविषयी कधी नव्हे एवढी जागरूकता निर्माण होताना दिसते आहे. ही चांगली गोष्ट आहे, पण त्याच वेळी तरुणाई मात्र वेगवेगळे लाइफस्टाइल डिसीझ लहानपणापासूनच अंगावर बाळगू लागली आहे. या विरोधाभासाला कारण आहे चुकीच्या माहितीवर आधारित व्यायाम आणि आहारातील बदल. आपले प्राधान्यक्रम बदलले आहेत. पूर्वी फिटनेसचा वेगळा असा विचार करण्याची आवश्यकता नव्हती, कारण जीवनशैलीच आरोग्यपूर्ण होती. आजही व्यायाम आणि सुयोग्य आहार याचा समावेश जीवनशैलीतच करून घ्यायला हवा. ‘व्हिवा’च्या या फिटनेस विशेषांकात प्रामुख्याने तरुणाईच्या फिटनेसविषयीच्या विचारांचा, त्यांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या सध्याच्या लाइफस्टाइलचा विचार केला आहे.
तरुण मुला-मुलींवर अभ्यासाचं, करिअरचं, रिलेशनशिपचं नको इतकं प्रेशर आहे. सध्या कुमारवयीन आणि तरुण मुलींमध्ये पाठदुखी, डोकेदुखी, थायरॉइड, पीसीओडी (पॉलिसिस्टीक ओव्हेरिअन डिसीज) हे सगळं वाढतंय. मुलींना नियमित पाळी येण्यात अडचणी येताहेत याचं कारण व्यायामाचा अभाव हेच आहे. साधारण १२-१५ वर्षांनंतर मैदानावरचा खेळ कमी होत जातो. मग अभ्यासाचं प्रेशर. मग करिअरच्या मागे धाव, त्यानंतर रिलेशनशिपसाठी वेळ देणं, मग लग्न.. यामध्ये व्यायामाला महत्त्व असतं ते केवळ ‘फिगर’ चांगली हवी या उद्देशानं. फिटनेसबाबत जागरूक आहोत, असं म्हणणारी तरुणाई फिटनेस आणि डाएटबाबत इतक्या अघोरी प्रचाराला बळी पडतेय की, आजकाल आपण अन्नाला नावानं ओळखणंही बंद केलंय. मी वरणभात जेवले, असं म्हणायच्या ऐवजी – आज फक्त कार्ब्स आणि प्रोटीन्स खाल्लेत.. असं म्हटलं जातंय. आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म म्हटलंय, पण आपण मात्र सतत अन्नातल्या कॅलरीचे हिशोब करतोय.

मैदानी खेळ हवेतच!
नियमित व्यायाम आणि खेळ हे या वयात अगदी महत्त्वाचं असतं. मुलांपेक्षाही मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक आवर्जून सांगावंसं वाटतं – पुढील आरोग्याच्या दृष्टीने वयाच्या २३ वर्षांपर्यंत मैदानी खेळ खेळणं हे आवश्यक आहे. आपल्याकडे कुमारवयीन मुला-मुलींचे मैदानी खेळ अभ्यासाच्या कारणाखाली कमी केले जातात. आठवी-नववी उत्तीर्ण झाल्यानंतर मुली तर मैदानावर दिसतच नाहीत. मुलांचे क्रिकेट, फुटबॉल आदी काही ना काही खेळ सुरू असतात, पण मुलींच्या फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीज कमी होत जातात. मुलींसाठी खेळ आणि व्यायाम नियमित राहू शकेल असं वातावरण आपण निर्माण करायला हवं. मुलींनाही २३ व्या वर्षांपर्यंत नियमित मैदानी खेळ किंवा व्यायाम याची गरज असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट- या व्यायामात ‘घरकामा’चा यात समावेश होत नाही. आपल्याकडेकेर-लादी, कपडे धुण्यासारखी कामं करणं म्हणजे व्यायाम असं समजलं जातं. ही कामं केली की, वेगळ्या व्यायामाची काहीच आवश्यकता नाही, असंही बरेच लोक म्हणतात, पण हा व्यायाम नाही. याचा शरीराला फायदा होत नाही. जोपर्यंत आपल्या फिटनेसला, स्ट्रेंथला, स्टॅमिन्याला आपण चॅलेंज करत नाही, जोपर्यंत शरीराला अशा प्रकारे आव्हान मिळत नाही, तोपर्यंत आपली मानसिक वाढही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मुलींसाठी व्यायामाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे.

नोकरी सुरू होते तेव्हा..
पैसा वाढतो तशी फिटनेस लेव्हलही वाढली पाहिजे. सुबत्तेबरोबर स्वास्थ्य हवे. वेल्थ वाढते आणि हेल्थ खराब होत जाते, हे होता कामा नये. सध्या नोकरीची बहुतेक कामं बैठय़ा स्वरूपाची असतात. पाश्चात्त्य देशात कुठल्याही नोकरीच्या ठिकाणी, ऑफिसमध्ये व्यायामासाठी वेळ, जागा उपलब्ध करून दिली जाते. तो त्यांच्या वर्क कल्चरचा एक भाग झालाय. आता तेवढी जागरूकता आपल्याकडेही यायला हवी. विशेषत: नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी हे आवश्यक आहे. वर्ल्ड झोन बदलत आहेत. एका शहरात राहूनही तुम्हाला लंडन, हाँगकाँग, अमेरिका अशा तीन देशांत व्यवहार करावा लागतो. त्यामुळे कामाच्या वेळा अनिश्चित असतात. सध्याच्या कामाचं स्वरूप आणि नोकरीच्या तऱ्हा बघता, कुठल्याही वेळेला तुम्हाला कामाला जायला लागू शकतं. सतत फिरतीवर जायला लागणं, शिफ्ट डय़ुटीदेखील या बदलत्या काळात अनिवार्य असू शकतात. व्यायामाच्या बाबतीत या वेळा आड येत नाहीत. कारण व्यायामाची चांगली गोष्ट अशी की, तो कुठल्याही वेळेला केला तरी त्याचा तसाच परिणाम होतो. फक्त व्यायाम नियमित होणं आवश्यक आहे. व्यायामाच्या आधी आणि नंतर आपल्या इतर गरजादेखील पूर्ण झाल्या पाहिजेत.
आपली झोप पुरेशी झाली असली पाहिजे, खाणं व्यवस्थित असलं पाहिजे. रुटीन व्यवस्थित हवं. मग व्यायाम दुपारी ३ वाजता केला किंवा पहाटे ३ वाजता केला तरी चालतो. तो उपयुक्तच ठरतो.
नोकरीनंतरचा टप्पा असतो लग्नाचा. लग्न हा महत्त्वाचा टप्पा आहे आयुष्याचा. बदलते लग्न सोहळे हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे; पण पूर्वी मराठी लग्नं खूप साधी असायची. ती एका दिवसात.. खरं तर काही तासांत संपायची. आता मात्र आपण लग्न सोहळ्यांच्या बाबतीत अशा सगळ्या समाजांचा आदर्श ठेवायला लागलोय ज्यांची शारीरिक ठेवण जाड आहे, त्यांची लाइफस्टाइल वेगळी आहे. आपलं आटोपशीर जेवण आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य आहे.
शाकाहारी लोकांना पुरेसे प्रोटिन्स मिळत नाहीत, हा गैरसमज आहे. असं असतं तर शाकाहारी लोक आतापर्यंत टिकलेच नसते. मांसाहारी लोकांनाही आपण पुरेसे प्रोटिन घेतो म्हणजे सकस आहार घेतो, असं समजण्याचं कारण नाही. सोमवार, गुरुवार वगैरे मांसाहार न करण्याचे दिवस आवर्जून पाळले पाहिजेत. आहारातला हा बदल शरीराला आवश्यक असतो.

लग्नाचा मुलगा कसा हवा?
लग्न हा मुलीच्या बाबतीत आयुष्य बदलणारा टप्पा. मुलापेक्षा मुलीचं आयुष्य लग्नानंतर बदलण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच मुलगा कसा हवा, याविषयी मुलींना अनेकदा समुपदेशन केलं जातं. मुलींचे स्वत:चे काही विचार असतात. आजच्या जमानातल्या अनेक मुली असंही सांगतात की, ‘मला असा मुलगा हवा – हू विल मेक मी लाफ.’ मला याची फार गंमत वाटते. कपिल शर्मादेखील हसवतो. मग तो सगळ्यांना हवाय का? मुलगा कुठे काम करतो, कुठे राहतो, किती कमावतो हे चॉइसेस असतात तसे फिटनेसच्या दृष्टीने आणखीही काही चॉइसेस महत्त्वाचे ठरतात. तुमच्या स्वत:च्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी असा मुलगा बघा, जो तुमच्यावर प्रेम करेल, जो स्वयंपाक करू शकेल, ज्या मुलाची आई काम करणारी असेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लग्नानंतर जाड, अशक्त किंवा फिट बनवू शकतात. आपल्याकडच्या पद्धती बघता, संपूर्ण कुटुंबात फिटनेसची मेंटॅलिटी असणं महत्त्वाचं आहे. विशेषत: मुलाची मानसिकता महत्त्वाची. कारण वयाने पंचविशी-तिशीचा मुलगा असतो, पण घरात मात्र १५ वर्षांच्या मुलासारख्या सवयी असतात. मुलींना हे सगळं झेपत नाही आणि मग त्यांचा फिटनेस कमी होत जातो. त्या स्वत:ला वेळ देऊ शकत नाहीत.  लग्नानंतर एका वर्षांत पाच किलो वजन वाढलं तर इट्स अ बॅड मॅरेज. नोकरी लागल्यानंतर वर्षभरात पाच किलो वजन वाढलं, तर इट्स अ बॅड जॉब! लग्न किंवा नोकरी आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला हलकं वाटलं पाहिजे.. मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने.. तर ते यशस्वी!

मुलींसाठी मैदानांवर आरक्षण हवं
4मुंबईसारख्या शहरात एक तर खूप कमी मोकळी मैदानं आता शिल्लक आहेत. ज्या काही थोडय़ा फार ‘ओपन स्पेसेस’ आहेत त्या सगळ्या तरुण मुलांनी भरलेल्या असतात. तिथे त्यांचे क्रिकेट किंवा तत्सम खेळ सुरू असतात. खेळांच्या मैदानांवर मुली कधीच दिसत नाहीत. स्त्रियांसाठी आरक्षणाचा मुद्दा असेल, तर पहिलं आरक्षण या ‘ओपन स्पेस’साठी मिळालं पाहिजे. मैदानावर मुलींसाठी ठरावीक वेळी किंवा ठरावीक दिवशी तरी आरक्षण राहिलंच पाहिजे. कदाचित सुरुवातीला असं आरक्षण दिलं जाईल. वर्षभर एकही मुलगी त्या मैदानावर फिरकणार नाही. असं झालं तरी आरक्षण शाबूत राहिलं पाहिजे, कारण शेवटी हे एक प्रकारचं परिवर्तन आहे आणि परिवर्तनाला थोडा वेळ लागणार. हळूहळू मुली बाहेर येतील. हे आपल्यासाठी आहे, इथे खेळणं सुरक्षित आहे कळल्यानंतर त्यांची संख्या वाढेल. मुलींची, त्यांच्या पालकांची मानसिकता बदलायला थोडा वेळ लागणार.
आपल्याकडे विकास आराखडे तयार होतात, तेव्हा पार्किंगची सोय होते. त्यासाठी मोकळी जागा ठेवली जाते, पण खेळासाठी जागा नसते. ज्या क्षणी शारीरिक हालचाली मंदावतील, खेळणं कमी होईल, त्या क्षणी शरीराच्या तक्रारी सुरू होतील. आपल्या इमारतीत, आपल्या गल्लीत आणि शहरातही अशा खेळण्यासाठीच्या मोकळ्या जागा हव्यातच. पार्किंगची जागा जेवढी महत्त्वाची तेवढीच खेळण्याची जागा महत्त्वाची. सुदृढ तरुणाईसाठी हे अत्यावश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:01 am

Web Title: importance of fitness in life
Next Stories
1 प्रिय मला, ..माझ्याकडून
2 ‘शुगरबॉक्स’चं गोड गुपित
3 ‘स्पा ट्रीटमेंट’ माझी लाडाची
Just Now!
X