05 March 2021

News Flash

स्वातंत्र्याचा अर्थ

‘कसली टोटलच लागत नाहीये! काय चाललंय आयुष्यात? डंब, युजलेस असल्याचं फिलिंग का येतंय मनात?’ या प्रश्नापाशी थांबत ती उठली.

| August 14, 2015 01:44 am

‘कसली टोटलच लागत नाहीये! काय चाललंय आयुष्यात? डंब, युजलेस असल्याचं फिलिंग का येतंय मनात?’ या प्रश्नापाशी थांबत ती उठली. जरा नव्‍‌र्हसच होती आज. ‘ए आई, जाम बोअर होतंय गं ! मरीन ड्राइव्हला जाऊ ?’ तिने विचारलं. समोर बसलेल्या आईने घडय़ाळात पाहिलं. ‘अगं ५ वाजलेत. आता कुठे तुला मरीन ड्राइव्हला जायचं सुचलं! ते काय कोपऱ्यावर जाण्याइतकं जवळ आहे का? आणि कोणासोबत जातेयस?’, ‘कोणी नाही गं! एकटीलाच जावसं वाटतंय,’ ती म्हणाली. ‘ते काही नाही. कुठेही जायचं नाहीस.’ ‘बरं.. निदान गच्चीत तरी जाऊ का?’ .. खरं म्हणजे, ती तिला हवं तसं जगणारी मुलगी. तिचा एकूणच स्वभाव बघता आताही खरं तर आईचं काही न ऐकताच तिला वाटलं म्हणून तिने मरीन ड्राइव्हला जाणं अपेक्षित होतं. पण आता ती नेहमीपेक्षा जरा वेगळीच रिअ‍ॅक्ट होत होती. आईची परवानगी मिळाल्या मिळाल्या ती गच्चीत गेली. दोन मिनिटं जरा शांतपणे फेऱ्या मारण्यात गेली. तिने वर आकाशाकडे पाहिलं. का कुणास ठाऊक पण तिला त्या क्षणी ‘विंग्ज ऑफ फायर’मधलं एक वाक्य आठवलं ‘ज्याला आपण घनरूप समजतो, त्यामध्ये खूप रिकामे अवकाश असते. ज्याला आपण स्थिर म्हणतो, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गती असलेले कण सतत फिरत असतात.’ पुढची काही मिनिटं ते वाक्य तिच्या मनात तसंच घोळत राहिलं.. ती पुन्हा विचारांमध्ये गुंतली. ‘काय चाललंय आपल्या आयुष्याचं? एक मनमानी कारभार यापलीकडे जाऊन काही तरी अर्थ लागतोय का आपल्या जगण्याचा? हवं तेव्हा हवं ते मिळावं असा किती अट्टहास असतो आपला. हट्टी तसे आपण लहानपणापासूनच! आपल्या मनाला जे वाटेल तेच करणारे. कुठलेही निर्बंध नकोसे असतात आपल्याला. नेहमीच फक्त स्वत:च्या मनासारखं वागण्याच्या या वृत्तीला ‘जगणं’ म्हणायचं का आपण? हल्ली काहीही, अगदी लहानातली लहान गोष्टही मनासारखी घडली नाही की लगेच हिरमुसायला होतं.’ तिच्याच विचारांनी ती अस्वस्थ होत होती.
तसं कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून तिने कलाकार मंडळींना, त्यांच्या जगण्याला खूप जवळून पाहिलेलं. त्यांच्याबद्दल हिच्या मनात कोण अप्रूप! त्यांच्यापेक्षाही कदाचित त्यांच्या वृत्तीबाबत! स्वच्छंदी असण्याबाबत! त्यांच्या कलेपेक्षाही त्यांची लाइफस्टाइल तिला जास्त फॅसिनेट करायची. मग ते दिवसाच्या कुठल्याही प्रहरी वेडय़ासारखं स्वत:ला कलेत झोकून देणं असो किंवा रात्रीच्या भैरवीत जगण्याचा नाद शोधणं असो. ‘काय भारी असतं यार या कलाकारांचं आयुष्य! ठरलेल्या नियमांपेक्षा, साचेबद्धतेपेक्षा किती वेगळं जगतात ही माणसं! आपणही खरं तर असेच जगतो की! आपल्या मनाला वाटेल तसं. मग त्यातून आपल्याला का नाही आनंद मिळत? कदाचित कलाकाराच्या लाइफस्टाइलमधला स्वच्छंदच आपल्याला कळलाय. पण त्याच्या विचारांमधला स्वच्छंद .. तो कुठे कळलाय आपल्याला?’
‘कलाकार स्वच्छंदी असला तरी त्याच्या कलेप्रति असणारं त्याचं पराकोटीचं प्रेम.. एखाद्या गोष्टीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची त्याची वृत्ती.. हे सगळं जमणारे आपल्याला? आयुष्यभर?’ तिच्या आत्मपरीक्षणाला आता कुठे सुरुवात झालेली. ‘कलाकाराच्या जीवनशैलीत स्वच्छंद असला तरी तो स्वतंत्र असतो त्याच्या विचारांनी. आपल्यासारख्या सामान्य माणसांची स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत असली तरी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या किती तरी गोष्टींचा परिणाम आपण आपल्या विचारांवर करून घेत असतो. त्या विचारांचं वेगळेपण, त्यांचं स्वतंत्र असणं जपता येत नाही आपल्याला. मग आयुष्यात आपल्यावर असणाऱ्या काही थोडक्या मर्यादांची आपल्याला एवढी का कटकट वाटते?
खरं तर, स्वत:वर काही मर्यादा घालून घेतल्या की जगण्याला एक शिस्त येते. लिबर्टी इज फ्रीडम विथ सर्टन लिमिटेशन्स असं तत्त्वज्ञान सांगतंच ना! स्वतंत्र, स्वच्छंद आणि स्वैराचार या तिन्हीत ‘स्व’ असला तरी स्वच्छंद आणि स्वैराचारात ‘तंत्राचा’ अभाव आहे. निसर्गाचं चक्र कधीही बदलत नाही. ऋतूचक्र, दिवसरात्रीची समीकरणं कधीही बदलत नाहीत. निसर्गाने स्वत:वर मर्यादा घालून घेतल्यामुळे तो स्वतंत्र आहे. त्याने त्याची मर्यादा ओलांडली की होणारा प्रकोपही आपण पाहिलाय. पुस्तकातल्या वाक्यात म्हटलंय तसा प्रचंड गतिशील असूनही तो स्थिर आहे आणि अवकाशाची पोकळी असूनही घनरूप! आपल्या जगण्यात ‘स्व’ असला तरी त्यात स्वच्छंदही नाही आणि जगण्याचं तंत्रही नाही. इथे सगळाच स्वैराचार!’ विचारांच्या इतक्या भाऊगर्दीनंतर ती आता कुठे शांत होत होती. स्वातंत्र्याचा अर्थ एका वेगळ्या तऱ्हेने समजू पाहत होती.
लीना दातार – viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 1:44 am

Web Title: independent meaning
Next Stories
1 तिरंगी फॅशन
2 इट्स ऑल अबाऊट चॉकलेट
3 व्हिवा दिवा
Just Now!
X