17 July 2019

News Flash

ऑनलाइन युद्ध : एक आत्मघाती हल्ला

सारासार

|| सारंग साठय़े

गेल्या एक-दोन आठवडय़ांत जे आपल्या देशात आणि जगभरात घडतं आहे ती एक अभूतपूर्व परिस्थिती मानली जाऊ  शकते. जगातील दोन न्यूक्लिअर ताकद असलेले देश जे कायमच एकमेकांचे शत्रू मानले जायचे, ते म्हणजे अमेरिका आणि उत्तर कोरिया हे एकमेकांशी चर्चा करायला व्हिएतनाममध्ये भेटले. व्हिएतनाम तो देश आहे ज्या देशाबरोबर अमेरिकेने दीर्घकाळ चालणारे युद्ध केले. साधारण त्याच वेळी एकमेकांत अजिबात सख्य नसलेले अजून दोन न्यूक्लिअर ताकदीचे शेजारी देश, भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांशी दहशतवादाच्या मुद्दय़ांवरून भिडले. हल्ले-प्रतिहल्ले, सर्जिकल स्ट्राइक, सुसाइड बॉम्बिंग, एअर स्ट्राइक, डिप्लोमॅटिक कोंडी, जिनेव्हा करार, असं सर्व काही गेल्या १५ दिवसात आपल्या कानावर पडलं.

परिस्थिती किती बिकट होती किंवा आहे हे भारतातल्या कुठल्याही सुजाण नागरिकाला सांगण्याची गरज नाही. या सगळ्यामध्ये सौदीचा क्राऊ न्ड प्रिन्स या दोन्ही देशांत येऊन गेला. याचबरोबर या दोन्ही देशांतील प्रसारमाध्यमांनी टीआरपीच्या चढाओढीत आगीत तेल ओतण्याचं काम केलं. पण या सगळ्याच्या पलीकडे जात एक वेगळं अति बीभत्स युद्ध आपल्या देशात पेटलं होतं. ते होतं ऑनलाइन स्टेट्स आणि व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्र्डस यांचं युद्ध! भारतावर झालेला हा दुसरा आत्मघाती हल्ला म्हणावा इतकं भीषण युद्ध. कोण उजवे, कोण डावे? कोण देशप्रेमी, कोण देश विरोधी? कोण शांतिदूत, कोण दुतोंडी नाग? यावरून एकमेकांवर प्रहार केले जात होते. ठेचा, मारा! पासून #रं८ठळहं१ पर्यंत सगळं बोललं जात होतं. होतं कशाला, अजूनही सुरू आहेच. आणि खरं युद्ध संपलं तरी ही स्टेट्सची त्सुनामी काही थांबणार नाही, अशीच सध्याची परिस्थिती आहे.

या माकड खेळाला आत्मघाती म्हणण्यामागे अनेक कारणं आहेत. आपल्या घरी आरामखुर्चीत बसून एका बाजूला टीव्ही बघत आणि दुसऱ्या बाजूला खात-पीत देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी चर्चा करणे याहून बाळबोधपणा तो कुठला? व्हॉट्सअ‍ॅपवरून युद्ध पुकारणे आणि #रं८ठळहं१ सारखे हॅशटॅग वापरून त्याला विरोध करणे या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी सोप्या आहेत. पण युद्ध ही इतकी साधी सोपी गोष्ट असू शकते का? तज्ज्ञांनाही समजायला अवघड जातात अशा गोष्टींवर बेछूट विधानं करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. पण याचा फायदा मात्र ज्याला मिळायचा त्याला मिळतो. या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे, आपण ऑनलाइन लिहिलेली प्रत्येक गोष्ट, आपण शेअर केलेला प्रत्येक व्हिडीओ, मीम, फोटोमधून या सोशल मीडिया प्लॅटफॉम्र्ससाठी डेटा (माहिती) गोळा होत असतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक मताचा एकाप्रकारे अभ्यास होत असतो. त्यातूनच अल्गोरिदम तयार होतात. अल्गोरिदम काय हे समजावून सांगायला बराच वेळ लागेल म्हणून सोप्या उदाहरणातून सांगतो. जेव्हा तुम्ही २-३ दिवस ऑनलाइन बुटांचे फोटो बघता, ‘नवीन शूज घायचे आहेत रे’, असा मेसेज मित्राला पाठवता किंवा ‘Nice shoes’ अशी कमेंट एखाद्या फोटोवर करता तेव्हा अचानक फेसबुकवर तुम्हाला बुटांच्या जाहिराती दिसायला लागतात. याचा अर्थ असा नाही की तुमचे मेसेजेस कोणीतरी बसून वाचतंय, पण एका सिस्टिमॅटिक पद्धतीने तुमच्या रोजच्या वापरात येणारे काही ‘‘key-words’ (महत्त्वाचे शब्द) टिपले जातात. आणि तुमच्या आवडीनिवडी जाणून घेऊन तुम्हाला इतर गोष्टी सुचवल्या जातात. हाच निकष व्हिडीओज, बातम्या आणि भाषण यांच्या बाबतीतही लावला जातो. म्हणजे जर तुम्ही युद्ध विरोधी असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त युद्ध विरोधी लेख वाचायला मिळतात. यात नुकसान असं की आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून ती गोष्ट समजून घेणं शक्य होत नाही. कारण त्या विषयाची जी सखोल विचारांतून आलेली मतं असतात, ती आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. मग सेल्फ असर्शनने आपला उद्रेक आणखीनच वाढत जातो, आणि दुसऱ्या बाजूच्या मतांविषयीची घृणादेखील. याने आपल्यातील दरी अजून मोठी होत जाते.

अमेरिकेत ज्या २०१६च्या निवडणुका झाल्या, त्यात लोकांचं मत परिवर्तन करण्यात फेसबुकच्या डेटा अ‍ॅनालिसिसचा वापर केल्याचा आरोप झाला. मग एक सांगा.. अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं मत इतक्या बेछूटपणे मांडणं किती योग्य आहे? मत मांडण्याला माझा विरोध नाही, पण त्यातल्या निष्काळजीपणाचा मी नक्कीच निषेध करतो. अल्गोरिदम हा तर खूप मोठा खेळ आहे, पण त्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन, भारतातील लोकांमधील वैचारिक फूट आपण जगासमोर नागवी करत आहोत. आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे अशाच फुटीचा फायदा बलाढय़ देश घेतात. ‘फोडा आणि राज्य करा’चा खेळ काही भारताला नवीन नाही. एकीकडे टोकाचे हायपर नॅशनलिस्ट आणि दुसरीकडे स्युडो सेक्युलॅरिस्ट अशी एकमेकांना नावं ठेवून अशा दोन विभागण्या करून आपणच स्वत:वरच एक आत्मघाती हल्ला करत आहोत. जरी या दोन्ही प्रकारचे लोक भारतात आहेत असं मानलं तरी मधल्या लोकांनी दोन्हीकडे ओढलं जाणं योग्य आहे का? विजय तेंडुलकरांनी ‘लोकसत्ता’मधील त्यांच्या एका लेखात लिहिलं होतं, ‘हत्या आणि रक्तपात या गोष्टी मानवी संस्कृतीला नवीन नाहीत, किंबहुना त्यावरच मानवी संस्कृती उभी राहिली आहे’. त्यामुळे काही गोष्टी अटळ आहेत आणि तुमच्या आमच्या हाताबाहेर आहेत असं जरी मानलं तरी या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आपापसात चालणारं हे किळसवाणं युद्ध जेवढय़ा लवकर थांबेल तेवढं सगळ्यांसाठीच चांगलं!

viva@expressindia.com

First Published on March 15, 2019 12:03 am

Web Title: india pakistan online war