13 December 2019

News Flash

महासत्तेच्या स्वप्नाचा वाटाडय़ा!!

जगातील सर्वात तरुण देश असे बिरुद मिरवणारा भारत आज २०२० च्या उंबरठय़ावर आहे.

विनायक पाचलग

जगातील सर्वात तरुण देश असे बिरुद मिरवणारा भारत आज २०२० च्या उंबरठय़ावर आहे. देशातील अर्धी लोकसंख्या म्हणजे जवळजवळ ६० कोटी लोकसंख्या २५ वर्षे किंवा त्याहून कमी वयाचा असणारा आपला देश खऱ्या अर्थाने सर्वाधिक वर्किंग पॉप्युलेशन असणारा देश आहे. पण खरंच आपण जागतिक पातळीवर विचार केल्यास वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण नक्की कुठे आहोत? भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २१ वर्षांपूर्वी ‘भारत २०२०’ अशी संकल्पना मांडली होती. २०२० पर्यंत भारत आर्थिकच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांत महासत्ता म्हणून जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ कलामच नव्हे तर जगभरातून या विचाराला प्रतिसाद मिळाला होता. २०२० मध्ये सुपर पॉवर होण्याची स्वप्ने पाहणारा हा सर्वात तरुण देश आज २०२० च्या उंबरठय़ावर उभा असताना नेमका कुठे आहे आणि भविष्यात त्याची वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे. अगदी तंत्रज्ञान असो, क्रीडा असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो भारताने कुठपर्यंत उडी मारलीय आणि ती अजून किती लांब मारु  शकतो, आपल्या हातात सध्या काय आहे आणि काय अजून मिळवणे बाकी आहे?, या आणि अशा अनेक क्षेत्रांतील प्रश्नांची तज्ज्ञांकडून बेरीज-वजाबाकी करत पुढच्या वाटचालीची दिशा धुंडाळण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’च्या वर्धापनदिन विशेष आवृत्तीमधून केला आहे..

स्मार्टफोन, ३जी/४जी आणि सोशल मीडिया या तीन गोष्टींमुळे संपूर्ण देश एका समान पातळीवर आला. एखाद्या खेडेगावातलं पोरगं असो किंवा बांद्रय़ातला हाय क्लास ‘यो’ मुलगा. ‘कोर्सेरा’, ‘खान अकादमी’सारखे ऑनलाइन कोर्सेस आज दोघांनाही थेट उपलब्ध आहेत. म्हणजे जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यात आता पैसे, गाव, कनेक्टिव्हिटी, धर्म, जात अशी बंधनं उरलेली नाहीत. तीच गोष्ट कमाईची. जेवढी प्रसिद्धी मोठय़ा स्टुडिओत बनणाऱ्या शॉर्ट फिल्म्सला नाही तेवढी प्रसिद्धी यूटय़ूबवर कोण्या गावातून बनणाऱ्या ‘गावाकडच्या गोष्टी’ आणि ‘खास रे’ला आहे. एखादा सामान्य माणूस ट्विटरवरून नेत्यांना प्रश्न विचारू लागला आहे आणि काही प्रमाणात का होईना, त्याला उत्तर द्यायचं प्रेशर राजकारण्यांवर येतं आहे. जनतेला अझ्युम करणं बंद करावं लागलं आहे. थोडक्यात काय तर संधीचं लोकशाहीकरण झालं आहे. अंगात दम असेल तर त्याला अडवता येणं शक्य नाही हेच २१ व्या शतकातल्या भारताचं सत्य आहे. याचे परिणाम मग सगळीकडेच दिसत आहेत. २१ व्या शतकातले हिरो, मग ते राजकारणी असोत, कलाकार असोत वा क्रिकेटर हे सगळे छोटय़ा शहरातून आलेले आहेत. या बदलामागे तंत्रज्ञान नाही तर दुसरे काय आहे?

यापलीकडे जाऊन तंत्रज्ञानाने काय केलं असेल, तर ते म्हणजे संपूर्ण भारताला ‘स्वप्नं’ दिली, ‘अ‍ॅस्पिरेशन’ दिलं. जे काम कलामांनी पुस्तक लिहून केलं ते काम हे सोशल मीडिया आणि मोबाइलचं जग रोज करत होतं, तरुणांमध्ये स्फुल्लिंग पेटवायचं.. अगदी गोरगरीब माणसालाही ३००० रुपयांत स्मार्टफोन आणि वर्षभरासाठी फुकट ५०० जीबी इंटरनेट मिळालं. आणि या दोन्हीचा खिडकी म्हणून वापर करून तो जग बघू लागला. त्याला मिळणारे अनुभव वाढले, इच्छा अपेक्षा वाढल्या. आपण राहतो तेवढंच जग नव्हे हे समजायला लागलं आणि तो मोठी उडी मारायला तयार झाला. हा बदल समजून घ्यायला एक प्रातिनिधिक उदाहरण पुरेसं आहे. साधारण २००९ ला आलेल्या ‘वेक अप सिद’ मधला प्रोटोगॉनिस्ट हिरो हा श्रीमंत घरातून आलेला होता, तर २०१३ मधल्या ‘यह जवानी है दिवानी’मधला स्वत:चं आयुष्य जगू पाहणारा हिरो हा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला होता आणि अगदी २०१९ साली आलेल्या ‘गली बॉईज’मधला ‘अपना टाइम आयेगा’मधला बंडखोर धारावीच्या झोपडपट्टीतून आलेला होता. सिनेमा समाजाचं प्रतीक असतो असं म्हणतात. तसं असेल तर हे सिनेमे भारतीय समाज आणि त्याची स्वप्नं बघायची ताकद कशी पाझरत गेली याचं उत्तम उदाहरण आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

याच तंत्रज्ञानामुळे भारतात इनोव्हेशनला अधिकच किंमत आली. ‘अ‍ॅपल’वाला स्टीव्ह जॉब्स भारतातल्या तरुणाईचा आयडॉल बनला आणि अवघ्या १० वर्षांत लोक मिलिनियर आणि बिलिनीयर बनू लागले. आजच्या तरुणाईच्या आयडॉल्समध्ये जसे रतन टाटा असतात तसेच बिनी बन्सल आणि विजय शेखर शर्मा पण असतात. याआधी सरकारी परवानगी शिवाय, परदेशी क्लाएंट नसताना १० वर्षांत भारतात बिलियन डॉलर कंपनी उभी राहिल्याचे माझ्या तरी वाचनात नाही. एकुणात काय, तर या तंत्रज्ञानानं भारताला ऑप्टिमिस्ट बनवलं एवढं नक्की..

हा झाला इतिहास आणि वर्तमान, पण देशासमोरचं खरं चॅलेंज तर पुढे आहे. ज्या गतीने तंत्रज्ञान वाढेल असा विचार आपण केला होता त्याच्या किती तरी पट जास्त वेगाने ते वाढतं आहे. त्यामुळे त्या वेगाशी स्पर्धा करताना आपली दमछाक होते आहे आणि ती वाढत जाणार आहे. आणि देश म्हणून याला सामोरं जावं लागेल. ज्या गतीने तंत्रज्ञान येईल, त्याहून जास्त गतीने त्याबद्दलची धोरणे आणि फ्रेमवर्क तयार करावे लागणार आहे. विशेषत: सोशल मीडिया, डेटा आणि ए आयच्या बाबतीत सरकारची पुढची पावलं ही देश म्हणून आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची असणार आहेत. त्यामुळे चॅलेंज अगदी आवासून उभं आहे हे खरं.

शिवाय तंत्रज्ञानाचा हा जो काही फायदा आपल्याला झाला तो काळाच्या ओघात आपण फक्त योग्य जागी होतो म्हणून झाला की आपण देश म्हणून प्रयत्नपूर्वक तो घडवून आणला, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे कोणत्यातरी खासगी कंपनीने त्यांच्या फायद्यासाठी ४ जी फुकट दिले म्हणून देशात डेटा क्रांती झाली. कोणीतरी ई-पेमेंटची कंपनी चालवत होता आणि नोटबंदीमुळे त्याची प्रसिद्धी झाली वगैरे वगैरे. आपण देश म्हणून ठरवून ‘इनोव्हेशन क्रांती’ आणली आणि त्यातून १००० तंत्रज्ञान उद्योजक तयार झाले, असे माझ्या तरी ऐकिवात नाही. उदाहरण द्यायचे तर महाराष्ट्रातील एमएससीआयटी हा असा प्रयोग आहे की जो सरकारने ठरवून घडवून आणला व ज्यामुळे संगणक साक्षरता गावागावांत पोहोचली, असे प्रयोग येत्या काळात अधिक करावे लागणार आहेत. इनोव्हेशन कौन्सिल, रँकिंग, नॅशनल रिसर्च फ्रेमवर्क , इंक्यूबेशन सेंटर अशा गोष्टी आता ऐकिवात येत आहेत, पण कदाचित देश म्हणून आपल्याला थोडा उशीर झाला आहे.

मग साहजिकच प्रश्न येतो की ‘भारताचं फेसबुक का नाही?’  भारत देश उत्तम तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तम नेतृत्व घडवत असला तरी जागतिक दर्जाचे मोठे एकही इनोव्हेशन भारताच्या नावावर नाही. भारतात गाजणारं बरंचसं तंत्रज्ञान हे कोणत्या ना कोणत्या परदेशी संकल्पनेचे भारतीयीकरण आहे. त्यामुळे आता आयटी फॉर इंडिया, इनोव्हेशन फॉर इंडिया हा आपल्यापुढचा अजेंडा असणे गरजेचं ठरेल असं दिसतं. आपल्याकडे आपले स्वत:चे असे कित्येक प्रश्न आहेत की जे आपण प्राध्यानाने तंत्रज्ञानाचा वापर करून सोडवू शकू, तिकडे लक्ष द्यायला हवं.

थोडक्यात काय, तर भारताच्या भविष्याची चावी ही तंत्रज्ञान आणि त्या अनुषंगाने येणारी नवे माध्यमे यांच्यात दडली आहे आणि आपण ती कशी फिरवतो यावर आपलं ‘महासत्ता’ होणं अवलंबून आहे.

डॉ. अब्दुल कलामांनी ‘इंडिया २०२०’ लिहिलं आणि देशाला व्हिजन दिलं. आज मागे वळून पाहताना असं लक्षात येतं की, या मार्गावरचा वाटाडय़ा बनण्याचं काम तंत्रज्ञानाने केलेलं आहे.

डॉ. कलामांनी एक मुद्दा प्रकर्षांने मांडला होता, सर्वासाठी आरोग्य, सर्वासाठी शिक्षण आणि सर्वासाठी रोजगार या भारतापुढच्या तीन प्राधान्याच्या गोष्टी असतील. आणि आज विचार केला तर असं लक्षात येतं की या तिन्ही ठिकाणी जी काही प्रगती आपण केली आहे ती फक्त आणि फक्त तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे शक्य झालेली आहे.

लेखक एम टेक (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) असून सध्या ‘वेदबीज टेक्नॉलॉजीज’ या डेटा अ‍ॅनालिसिस व सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीचे संस्थापक सीईओ आहेत. सोशल मीडिया हा त्यांच्या प्रमुख अभ्यासाचा विषय. सोशल मीडिया या विषयावर टेड एक्स या प्लॅटफॉर्मवरील व्याख्याता. इतर ठिकाणी जवळपास १०० हून जास्त व्याख्याने. गेली १० वर्षे तंत्रज्ञान, माध्यमे, संस्कृती या विषयावर लिखाण, ‘थिंक बँक’ या यूटय़ूब चॅनेलचे मुख्य संपादक आहेत.

First Published on July 25, 2019 11:55 pm

Web Title: india vision 2020 apj abdul kalam mpg 94
Just Now!
X