तेजश्री गायकवाड, स्वप्निल घंगाळे

आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे आपला फोन आणि त्यामध्ये असणाऱ्या असंख्य अ‍ॅप्सचा आपण अगदी दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत वापर करतच असतो. आपल्या इवल्याशा फोनमध्ये अगदी पाणी पिण्याची आठवण करून देणारं अ‍ॅप ते खाण्याचे पदार्थ पुरवणारे अ‍ॅप्स अशा असंख्य गोष्टी असतात. परंतु, भारत सरकारने अचानक आपल्या या फोनमधील ५९ चिनी अ‍ॅप्सवर डिजिटल स्ट्राइक करत त्यावर बंदी घातली. त्यानंतरही दोन वेळा बंदीची यादी वाढवत ही संख्या दोनशेच्या पुढे गेली. आपल्या आयुष्याचा भाग झालेली ती अ‍ॅप्स अचानक नॉट रिचेबल झाल्याने अनेकांची सगळीच गणितं कोलमडली. आता या अ‍ॅप्ससाठी पर्यायी देशी अ‍ॅप्सचा शोध जोरात सुरू झाला आहे..

देशाच्या सुरक्षेसाठी घातक बनत चाललेले अ‍ॅप्स असंख्य भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होते. त्यामुळे हे अ‍ॅप्स  धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यात टिक टॉक, हॅलोसारख्या प्रचंड प्रसिद्ध अ‍ॅप्ससह वुई मेट, शेअर इट, यूसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर—चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, यू व्हिडीओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ आणि त्यानंतर जवळजवळ ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. बंदीनंतर  या अ‍ॅप वापरकर्त्यांंसाठी कोणते पर्याय शिल्लक आहेत? या अ‍ॅप्सना पर्याय असतील तर ते अ‍ॅप्स कोणते? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आजही आहेत. याच धर्तीवर अनेक तरुणांनी या अ‍ॅप्सला पर्याय म्हणून भारतीय अ‍ॅप्सची निर्मिती करायला सुरुवात केली. या स्वदेशी अ‍ॅप्सला भारतीयांकडून अल्पावधीत उत्तम प्रतिसादही मिळाला.

चिनी पबजीचे भारतीय रूप म्हणजेच फौजी हे अ‍ॅप लॉन्च करणार असल्याची घोषणा अभिनेता अक्षय कुमारने काही आठवडय़ांपूर्वी केली. तर दुसरीकडे मराठमोळ्या निखिल मालनकरने पबजीला भारतीय पर्याय म्हणून ‘सबजी’(रवइॅ)चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल तो सांगतो,‘खूप गाजलेल्या पबजीसारख्या गेमिंग अ‍ॅपला तरुणाईला पर्याय हवा होता. तरुणांची हीच गरज लक्षात घेऊन ‘गेम—ई—ऑन’ या माझ्या गेमिंग कंपनीने एक नवा खेळ बाजारात आणला आहे. ‘स्पेशल युनिट बॅटल ग्राऊंड’ अर्थात ‘सबजी’ असे या खेळाचे नाव आहे’. आभासी जगातील अत्याधुनिक बंदुकांसह रणांगणावर मित्रांसोबत आभासी लढाई लढण्याची मजा सबजीमध्ये आहे, असं निखिल सांगतो. या खेळात आठ खेळाडूंसोबत खेळण्याची सुविधा आहे. फ्री फॉर ऑल, टीम डेथमॅच आणि कॅप्चर दी फ्लॅग अशा तीन पद्धतीने यामध्ये खेळता येते. खेळ रोमहर्षक व्हावा यासाठी एका बंद पडलेल्या कारखान्याचा नकाशा यात समाविष्ट आहे. याचे आत्तापर्यंत जवळजवळ १० दशलक्ष डाऊनलोड झाले आहेत. ‘चिनी तंत्रज्ञ एवढे अ‍ॅप्स, खेळ बनवू शकतात मग आपले तंत्रज्ञ काय करतात? अशा आशयाचे आपल्या तंत्रज्ञांची खिल्ली उडविणारे मेसेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. आपण भारतीय तंत्रज्ञानात कुठेही मागे नाही. ‘सब्जी’ हे याचं उत्तम उदाहरण आहे. संपूर्णत: भारतीय संस्कार असलेलं हे अ‍ॅप आपल्या तरुणाईसाठी निश्चितच एक चांगला पर्याय ठरेल,’ असा विश्वास निखिलने व्यक्त केला.

चिनी अ‍ॅप्सला असाच एक पर्याय म्हणजे ‘कागज’ नावाचे अ‍ॅप. आपल्यापैकी अनेकांना ‘कॅमस्कॅनर’ अ‍ॅप बंद झाल्याने कागदपत्र स्कॅन कशी करावी? असा प्रश्न पडला असेल तर भारतीय तरुणांनी तयार केलेले कागज हे अ‍ॅप तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. विशेष म्हणजे चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनीच समाजमाध्यमांवरून या अ‍ॅपची लिंक शेअर करत किमान स्कॅनिंगबद्दल तरी भारतीयांना आत्मनिर्भर होण्याचा नारा दिला होता. गाजलेल्या चिनी अ‍ॅप्ससारखेच फीचर असलेले अनेक भारतीय अ‍ॅप्स बाजारात येत आहेत. ‘टिक टॉक’सारख्या गाजलेल्या अ‍ॅपसाठी ‘चिंगारी’, ‘मित्रोन’, ‘बोलो इंडिया’ हे स्वदेशी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. तसेच ‘शेअर इट’साठी ‘शेअर चॅट’, ‘यु डू’, ‘एअरमीट’, ‘जिओ मीट’, ‘यू.सी.न्यूज’साठी ‘इनशॉर्ट्स’, ‘यू.सी. ब्राउजर’ला ‘जिओ ब्राउजर’ आणि ‘एपिक’, ‘कॅम स्कॅनर’ला ‘कागज स्कॅनर’ आणि ‘डॉक स्कॅनर’, ‘क्लॅश ऑफ किंग’ सारख्या खेळासाठी ‘ल्युडो किंग’ असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. तर फॅशन जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘क्लब फॅक्टरी’ आणि ‘शीइन’सारख्या अ‍ॅप्लिकेशनला ‘बेवकूफ’, ‘अजिओ’, ‘मिन्त्रा’ असे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये भारतीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या अ‍ॅप्सचं कौतुक केलं. मोदींनी यावेळी अनेक अ‍ॅप्सच्या नावांचा उल्लेख केला. त्यांनी केलेल्या या कौतुकामुळेच गूगल प्ले स्टोअरवर अवघ्या दोन दिवसांमध्ये हे अ‍ॅप्स वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आले. सोशल कॅटेगरीमध्ये ‘गुगल प्ले स्टोअर’वरील टॉप दहा अ‍ॅपमध्ये ‘जोश’, ‘स्नॅपचॅट’, ‘मोज’, ‘रोपोसो’ आणि ‘चिंदीगिरी’ या अ‍ॅप्सचा समावेश झाला. तर शिक्षण कॅटेगरीमधील लोकप्रिय अ‍ॅप्सच्या यादीमध्ये ‘एपी सरकार सेवा’, ‘दृष्टी’, ‘सरळडेटा’, ‘व्हूट किड्स’, ‘पंजाबएज्युकेअर’, ‘डाउटनट’, ‘कुटूकी किट्स’ या अ‍ॅप्सची चलती असल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक अ‍ॅप्सच्या यादीमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅपबरोबरच भारतीय बनवटीची ‘स्टेपसेटगो’, ‘होम वर्कआऊट’, ‘लूज वेट अ‍ॅप फॉर मेन’, ‘इन्क्रीज हाइट वर्कआऊट’, ‘सिक्स पॅक्स इन ३० डेज’ ही अ‍ॅप्स असल्याचं दिसून आलं.

मोदींनी देशातील नागरिकांनी भारतीय बनवटीच्या अ‍ॅप्सला प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन केलं होतं. या माध्यमातून केवळ आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ मिळणार आहे. या अ‍ॅप्सला प्रोत्साहन दिल्यास ही अ‍ॅप्स सध्या लोकप्रिय असणाऱ्या, मात्र परदेशी कंपन्यांच्या मालकीची असल्याने वापरासाठी असुरक्षित समजल्या जाणाऱ्या अ‍ॅप्सला टक्कर देऊ शकतील का याचीही चाचपणी केली गेली, असं मोदी म्हणाले होते. या निमित्ताने भारतीय अ‍ॅपची निर्मिती करणाऱ्या ‘कूकू’, ‘स्टेपसेट गो’, ‘झोहो’, ‘चिंदीगिरी’, ‘कुटूकी’, ‘एफटीसी टॅलेंट’ यासारख्या कंपन्याही लोकांसमोर आल्या. एकंदरीत या सगळ्यांमुळे स्वदेशी अ‍ॅपसाठी पोषक वातावरण निर्माण झाले.

‘आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धे’मध्ये देशभरातून आलेल्या सात हजार अर्जांपैकी सर्वोत्तम अ‍ॅप्स निवडण्यात आली आहेत. ही सर्व अ‍ॅप्स वेगवेगळ्या कॅटेगरीमधील आहेत. यामध्ये प्रमुख्याने गेमिंग, मनोरंजन, व्यापार, वापर (युटिलिटी), सोशल मीडिया आणि आरोग्यसंदर्भातील अ‍ॅप्स या कॅटेगरींचा समावेश आहे. चिनी अ‍ॅप्सवर घातलेली बंदी भारतीय अ‍ॅप्सच्या पथ्यावर पडला आहे. एकीकडे भारतीय अ‍ॅप्सची निर्मिती करण्यात तरुणाईने पुढाकार घेतला आहे, तर दुसरीकडे या स्वदेशी अ‍ॅप्सना तरुण वापरकर्त्यांकडूनही तितकाच भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.  हा बदल सकारात्मक असून तरुणांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा आहे हे मात्र निश्चित. viva@expressindia.com