बार्बेक्यू म्हटलं की फार्म हाऊसच्या मोकळ्या-ढाकळ्या वातावरणात बाहेर ठेवलेल्या छोटय़ाशा कोळशाच्या शेगडीवर शिजणारं चिकन, हास्यविनोद सुरू असलेला मोठ्ठा ग्रुप, साथीला म्युझिक, त्याच्या ठेक्यावर नाचणारा, मद्याचे पेले रिचवणारा तरुणांचा ग्रुप. हे चित्र युरोपातल्या घरातून थेट बॉलीवूडपर्यंत आणि तिथून आता आपल्याही घराघरात कॉमन झालंय. युरोपात कडाक्याची थंडी जराशी सरली की, या बार्बेक्यू पार्टी सुरू होतात. वसंत ऋतू आल्याची वर्दी देतात आणि ‘वॉर्म समर’ला ‘वेलकम’ करतात. पण आज आपण इंडियन बाब्रेक्यू पार्टीबद्दल बोलतोय. याचं खरं नाव आहे ‘पोपटी’. ‘ये पोपटी क्या है?’ हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तसं ‘पोपटी’ रंगापर्यंत आणि फिमेल पोपटाला काय म्हणणार? वगैरे काही कोटय़ा सोडल्या तरी त्या पोपटाचा या पोपटीशी काहीही संबंध नाही.
पण साधारण रायगड जिल्ह्य़ात अलिबाग आणि कोकणातल्या काही भागांत पोपटी प्रकार चांगलाच प्रचलित आहे. एकदा थंडीचे वेध लागले की पोपटी पाटर्य़ा जोर पकडू लागतात. साधारण जानेवारी महिन्यामध्ये पावटय़ाच्या शेंगांचं पीक आलं की, हा बेत आखला जातो. कारण पोपटीची संपूर्ण बिशाद पावटय़ाच्या शेंगा आणि भांबुडर्य़ाच्या पाल्यावर अवलंबून असते. उनके बिना कुछ नही होता है बॉस! सुरुवात होते ती पहाटे उठून भाज्या गोळा करण्यापासून. (बाबा रे, थंडीत ते पण गावाला जाऊन लवकर उठायचं.. मोठं काम. पर करना पडता है.) पोपटीमध्ये चिकन आणि अंडय़ासोबतच बटाटे, रताळी, सफेद कांदा आवडत असतील तर वांगी या भाज्या असतात. पावटय़ाच्या शेंगा भरपूर लागतात. त्यात कंजुषी नाही चालत. मुळात पोपटीचा बेतच चौघं-पाचजण जमवून होत नाही. त्यासाठी कमीत कमी बारा ते पंधरा जणांचा ग्रुप लागतो. ग्रुप जितका मोठा तितकी पार्टी रंगते. भाज्यांबरोबर मातीच्या मडक्यांचीसुद्धा व्यवस्था करावी लागते आणि शेकोटीच्या सरपणाची सुद्धा. मग शेजारच्या बागांमध्ये लाडीगोडी लावून सरपणासाठी सुकं लाकूड, सुक्या फांद्या, झाडपाला गोळा केला जातो. मग घरी येऊन सगळ्या भाज्या नीट धुऊन घ्याव्या लागतात. आलं, लसूण आणि मसाल्यांचं वाटण लावून चिकन छानपकी मॅरिनेट करायला ठेवलं जातं. तोपर्यंत मग इतर तयारी. शेकोटीची जागा साफ करून तयार झाली की मग एकच लक्ष्य. बदामाची, केळ्याची पाने आणि भांबुडर्य़ाचा पाला आणण्याचं. तशी बदामाची पाने बाजारात पण मिळतात. पण गावात प्रत्येकाच्या अंगणात एकतरी बदामाचं झाड असतंच आणि त्याची भरपूर पानं या सीझनमध्ये झाडाभोवती पडलेली असतात. त्यामुळे तोडण्याचे कष्टही वाचतात आणि पसाही. भांबुर्डे हे एक झुडूप आहे. गावात रस्त्याच्या कडेला हे उगवते. त्याला ओळखायला मात्र पारखी नजर लागते. त्यानंतर ही पानेसुद्धा धुऊन पुसून ठेवायची.
हे सगळं करेस्तोवर दिवस मावळायला लागतो. मग छान मॅरिनेट झालेलं चिकन व्यवस्थितपणे बदामाच्या पानामध्ये गुंडाळून पुरचुंडय़ा बनवतात. मडक्यांमध्ये आधी चारही बाजूंना भांबुडर्य़ाचा पाला लावून मग त्यावर केळीची पानं ठेवली जातात. यामुळे मडक्याच्या आतलं साहित्य जळत नाही आणि त्यात छान भांबुडर्य़ाचा वास मिसळला जातो. पुढे मडक्यांमध्ये बदामाच्या पानांच्या पुरचुंडय़ांचे थर भरले जातात. प्रत्येक थराच्यामध्ये बटाटे, कांदे, रताळी, शेंगा, ओवा, मीठ आणि भांबुडर्य़ाचा पाला दाबून भरला जातो. मडक्याचे तोंड पाला आणि केळ्याच्या पानांनी बंद केलं जातं. पण हे मडकं काठोकाठ भरणं गरजेचं आहे. नाहीतर ते शेकोटीत फुटू शकतं. त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे. शुद्ध शाकाहारी मंडळींसाठी फक्त भाज्यांची वेगळी मडकी भरली जातात.
मग सुरू होते खरी पोपटीची धमाल. नीट आखणी करून मडकी त्यावर उपडी ठेवली जातात. त्याच्या बाजूला फांद्या, पाला, लाकूड लावून शेकोटी बनवून जाळ दिला जातो. साधारणपणे व्हेज हंडी अध्र्या तासात तयार होते आणि नॉनव्हेज पाऊण तासात. तरी तुमची शेकोटीची धग किती आहे त्यावरसुद्धा हे टायिमग अवलंबून असतं. अंडय़ांना मातीचा लेप लावून शेकोटीच्या आत ठेवलं जातं. गरम झाल्यावर माती सुकते आणि मग ती साफ करून आतल्या उकडलेल्या अंडय़ाची मजा घेतली जाते. एकदा विस्तव शांत झाला की मडकं जाड कापडाच्या साहाय्याने उचलून कागदावर उलट करून काठीच्या मदतीने हळूहळू त्यातल्या पुडय़ा बाहेर काढल्या जातात. एकदा पुडय़ा कागदावर पडल्या की सगळ्यांचा एकच हल्लाबोल होतो. सगळेजण चारही बाजूंनी गर्दी करून त्यातल्या चिकनच्या पुडय़ा, रताळी, बटाटी लंपास करतात. कोणाच्या जिभा पोळतात, हाताला चटके बसत असतात पण कोणाला त्याची तमा नसते. पुढे गलका करून बसलेल्यांना वाटत असतं सगळा माल आपल्यालाच मिळणार पण त्यांना काय ठाऊक पाठी बसलेल्यांनी त्यांचे फितूर आधीच पुढे पाठवलेले असतात. एक एक करून त्यांच्यासमोरून कधी पुडय़ा हवेत उडून मागे जातात त्यांना त्याचं कळत नाही. समोर राहतो तो पावटय़ाच्या शेंगांचा ढीग. त्यातून त्यांना रताळी, चिकनचे तुकडे निवडून घ्यावे लागतात.
एरवी रताळी, कांद्याला नाही म्हणणारी पोरं मस्त भाजलेली रताळी मिटक्या मारत खातात. सकाळी पाच-सात किलो आणलेलं चिकन बघून ‘जास्त नाही ना होणार?’ हा प्रश्न विचारणाऱ्यावर ‘बापरे कमी पडतंय की काय?’ असं विचारायची पाळी येते. रोज ताट वाटीत सभ्यपणे जेवणारे जेव्हा हातात पुरचुंडी घेऊन किंवा कागदावर रताळे सोलून खातात तेव्हा हायजिन, बॅक्टेरिया हे शब्दसुद्धा पुन्हा पुस्तकात जाऊन गुपचूप बसतात. सोबत सोलकढी, कोल्ड्रिंक किंवा व्हिस्कीचा पेला नाचवत प्रत्येकजण मिटक्या मारत खात असतो.
तेलाचा आणि पाण्याचा चिमूटभरसुद्धा वापर न करता बनवलेल्या या पोपटीत ताज्या भाज्या वापरल्या जातात. त्यात कोणत्याही अनसíगक पद्धतीचा वापर न केल्याने पचायला सुद्धा हलकी असते. आता हा हंगाम ओसरणाऱ्या थंडीबरोबर ओसरतोय त्यामुळे यापुढे कधी कॉलेजमध्ये कोणी अलिबागचा आहे हे कळलं तर सरळ जाऊन त्याची कॉलर पकडा आणि विचारा, ‘काय रे अलिबाग से आया क्या?’ रागावून त्याच्याकडून हो उत्तर मिळालं की हळूच कॉलर सोडून इज्जतीत त्याला विचारा, ‘काही नाही भाऊ, मग पोपटी कधी करायची?’ नाहीतर पुढच्या हंगामासाठी नवीन वर्षांची वाट पाहावी लागेल.

‘इंडियन बार्बेक्यू’ म्हणता येईल अशा इतर काही प्रथाही अन्य प्रदेशांमध्ये चांगल्या रुजल्यात. त्यातल्याच या काही…

देशावरची हुरडा पार्टी
देशावरसुद्धा हिवाळ्याच्या सिझनमध्ये हुरडा पार्टी केली जाते. यात ज्वारीची कोवळी कणसं कोळशावर भाजतात. हल्ली हा हिरवा हुरडा शहरामध्येसुद्धा मिळायला लागलाय. पण बोचऱ्या थंडीत संध्याकाळी शेतावर जाऊन शेकोटी पेटवून त्यावर ही कणसं भाजून केलेली हुरडा पार्टीच खरी. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्य़ांमध्ये तसंच विदर्भात या हुरडा पाटर्य़ा रंगतात. ताज्या हुरडय़ासोबत लसणीची चटणी, शेंगदाण्याची चटणी, खजूर, ओलं खोबरं, भुईमुगाच्या शेंगा, गूळ दिला जातो.

खानदेशी भरीत पार्टी
खानदेशी वांग्याचं भरीत हे खासच. सध्या थंडीच्या सीझनमध्ये त्या भागात संध्याकाळच्या भरीत पाटर्य़ा रंगतात. शेतावरची खानदेशी मोठी वांगी तिथेच दगडाच्या चुलीवर भाजायची आणि त्यात कांद्याची पात, लसूण-मिरची घालून झणझणीत भरीत बनवायचं. सोबत ज्वारी-बाजरीची खमंग भाकरी असली पाहिजे. वांगं भाजल्यावर ते कुटण्यासाठी खास लाकडी खल असतो. त्या लाकडाची चवही भरताला वेगळी लज्जत देते.

राजस्थानी जंगली घोष
शिकारीची परंपरा राजस्थानला जुनी आहे. पूर्वी राजे महाराजे शिकार केलेल्या प्राण्याला मसाला लावून वाळवंटात वाळूत पुरून भट्टीत शिजवत असतं. आता शिकार करणं बंद झाल्याने त्याऐवजी बकऱ्यांचा वापर केला जातो. मांस शिजायला तब्बल ४-५ तास लागतात. तोपर्यंत अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात.