|| विपाली पदे

सावरकरांच्या ‘जयोस्तुते’ ते ए.आर. रेहमान यांच्या ‘माँ तुझे सलाम’पर्यंत वेगवेगळ्या गाण्यांमधून, भाषांतून देशप्रेमाचे सूर तरुणाईनेही आळवले आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘उरी’ चित्रपटातील ‘हाऊ  इज द जोश’ या आवेशपूर्ण संवादाला ‘हाय, सर’ असा प्रतिसाद आबालवृद्धांकडून त्वेषाने ऐकू येतो. फेब्रुवारीमध्ये भारतीय वायुदलाने बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेला हल्ला असो किंवा नुकत्याच साजरा झालेला कारगिल विजय दिन असो, प्रत्येक वेळी देशाभिमानाच्या पोस्ट्स शेअर करण्यात तरुणाईचा मोठा वाटा होता. याच तरुणाईला जेव्हा त्यांच्या करिअरबाबत विचारणा होते, तेव्हा मात्र सैनिकी पेशापेक्षा खासगी क्षेत्राला झुकते माप मिळत असल्याचे दिसून येते. ‘शिवाजी जन्मावा, पण दुसऱ्याच्या घरात’ या मानसिकतेचा पुरेपूर प्रत्यय येत असतानाही तरुणाईच्या मनात भारतीय संरक्षण दलाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक जण कार्यरत आहेत..

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
eid al fitr 2024 chand raat ramadan eid 2024 know the date and timings of eid al fitr moon sighting
१० की ११ एप्रिल, भारतात कधी दिसणार ‘ईद’चा चंद्र? भारतासह परदेशात कशाप्रकारे ठरवली जाते ‘ईद’ साजरी करण्याची तारीख?
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

भारत आज वेगवेगळ्या क्षेत्रांत झपाटय़ाने प्रगती करतोय. भारताचा जागतिक पातळीवर दबदबा असणारे असेच एक क्षेत्र म्हणजे ‘संरक्षण’. आपल्या देशाने ७२ वर्षांच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात अनेक उघड आणि छुप्या युद्धांचा यशस्वीपणे सामना केला आहे. भारताचे लष्कर, नौदल आणि वायुदल तसेच निमलष्करी हे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षेसाठी सदैव सज्ज असतात. एक बलशाली राष्ट्र म्हणून उदयास येत असताना दिवसेंदिवस देशासमोर नवीन आव्हाने उभी राहात आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी संरक्षण दलांना कुशल सैनिकांची गरज आहे. म्हणूनच सैनिकी क्षेत्रातील करिअरच्या नानाविध संधी तरुण वर्गासमोर याव्यात यासाठी मुळातच देशाच्या संरक्षण व्यवस्थेची ओळख करून देणाऱ्या, त्याविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या व्यक्तींची आणि संस्थांची गरज आहे.

‘सैनिक’ या शब्दाचा अर्थ संपूर्ण देशाला कळावा आणि खास करून तरुण वर्गाला त्याविषयी समजावे, आपुलकी वाटावी म्हणून आपल्या देशात अनेक व्यक्ती, संस्था कार्यरत आहेत आणि त्यांनी उभारलेल्या संस्था मुख्यत्वे भारतीय सैन्याला तर मदत करतातच; पण त्याचबरोबरीने तरुणांना सैन्यात जाण्याविषयी व त्या क्षेत्राचा करिअर या दृष्टीने विचार करण्याचीही प्रेरणा देतात. याचेच एक आदर्श उदाहरण म्हणजे, स्वत:चे कर्तव्य समजून भारतातील असंख्य तरुणांना सैन्याची वाट दाखवणारी व्यक्ती ‘हिरकणी पुरस्कार’प्राप्त ‘अनुराधा गोरे’. आपला मुलगा कॅ . विनायक गोरे याला १९९५ साली वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी गमावले आणि तिथून त्यांचा भारतासाठी हजारो नाही तर लाखो विनायक देशार्पण करण्याचा प्रवास सुरू झाला. पेशाने शिक्षक असणाऱ्या गोरेताई मागची २४ वर्षे तरुणांना देशप्रेमाचे धडे देत आहेत. सुरुवातीला त्यांना गरज होती ती योग्य व्यासपीठाची. ते व्यासपीठ त्यांना एका पुण्यातील शाळेने उपलब्ध करून दिले आणि त्यानंतर त्या आजतागायत थांबलेल्या नाहीत. लाखो विनायक देशासाठी लढण्यास तयार करावेत म्हणून त्यांनी आत्तापर्यंत १३ पुस्तके लिहिली आहेत. त्याचबरोबरीने अनेक व्याख्याने, मुलाखती, लेख यांसारख्या विविध माध्यमांतून स्वत:चे विचार त्या देशभर पोहोचवतायेत.

अनुराधा गोरे या भारतीय दलातल्या संधी आणि सैनिकांसमोर येणाऱ्या आव्हानांविषयी तरुणांना अंत:दृष्टी देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही लक्ष देतात. नेतृत्व कौशल्यांचे प्रशिक्षण यासारख्या गोष्टींसाठीही शालेय सुट्टीच्या काळात मुलांसाठी कार्यशाळा घेण्यात त्या अजूनही व्यग्र असतात. त्यांच्या कार्यशाळा देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या आणि स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यकथांवर आधारित असतात. आपल्या या प्रयत्नांमधून अनुराधाताई गोरे तरुणांमधून ‘उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ घडवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

या महान कार्यातील आणखी एक नक्षत्र म्हणजे अनुराधा प्रभुदेसाई. केवळ पर्यटक म्हणून २००४ साली लडाखला गेल्या असताना १९९९ चे कारगिल युद्ध आणि त्याबाबत घडलेल्या घटना समाजापर्यंत पोहोचल्या नाहीत की काय हा विचार त्यांच्या मनात डोकावला आणि त्यांनी ‘लक्ष्य फाऊंडेशन’ ही संस्था २००९ साली स्थापन केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक सैनिकांना भारताच्या सीमांवर जाऊ न संपूर्ण देश त्यांच्याबरोबर असल्याचा विश्वास दिला आहे. एवढेच करून त्या थांबल्या नाहीत तर तरुणांमध्ये देशप्रेम व सैन्याबद्दल आकर्षण निर्माण व्हावे म्हणून त्या सतत सक्रिय असतात. देशप्रेमाची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटत राहावी यासाठी त्यांच्या संस्थेमार्फत त्या अनेक उपक्रमांचे आयोजन करत आहेत. त्यांनी मोठय़ा प्रमाणात ‘युवाप्रेरणा’ हा उपक्रम सुरू केला आहे. यात त्या सैन्यदलातील अधिकारी व शौर्यपदकप्राप्त सैनिकांना आमंत्रित करून त्यांना तरुणांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देतात. या उपक्रमांद्वारे जास्तीत जास्त तरुणांपर्यंत संरक्षण क्षेत्राविषयी माहिती पोहोचावी याकडे त्या जातीने लक्ष देतात. ‘लक्ष्य फाऊंडेशन’तर्फे प्रकाशित कारगिल युद्धावरील पुस्तकाच्या ७७,००० प्रतींचे वाटप त्यांनी विविध शाळांमध्ये केलेले आहे. तसेच त्यांनी संरक्षण विषयाशी निगडित अभ्यासक्रमाची बांधणी केली असून पुण्यातील ‘एमआयटी’ विद्यापीठामध्ये २०१७ पासून त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

नाशिक येथील कर्नल देशपांडे यांचे कार्यदेखील दखल घेण्यासारखे आहे. नाशिक येथील प्रसिद्ध भोसला मिलिटरी स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले आणि तिथेच त्यांनी शिकवायला सुरुवात केली. पुढे मग ते राजा शिवाजी मार्गदर्शन कें द्र येथे ६ वर्षे काम करत होते. नंतर तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी मुख्यत्वे नाशिकमधील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन सैनिकी शिक्षणाबाबत मार्गदर्शन करायला सुरुवात केली. प्रामुख्याने सैन्यात जाण्याची इच्छा असणाऱ्या मुलांना शारीरिक क्षमता, हजरजबाबीपणा तसेच आवश्यक असणारे जनरल नॉलेज यावर भर देण्यास ते सांगतात. अजूनही ते ‘एनडीए’ आणि ‘सीडीएस’सारख्या सैनिकी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करतात. आर्मीमधील ‘सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्ड’ याची त्यांना माहिती असल्यामुळे त्याप्रमाणे ते तरुणांना तयार करत आहेत. ‘उत्तम सैनिक होण्याच्या बरोबरीने प्रथम देशाचे उत्तम नागरिक व्हा’ असा संदेश तरुणांना ते कायम देतात. एकंदरीतच कर्नल देशपांडे गेली २५ वर्षे नाशिक शहरात सैनिकी शिक्षण आणि करिअरबद्दल प्रसार व प्रचार करत असून त्यादृष्टीने तरुणांना मार्गदर्शनदेखील करत आहेत.

देशासाठी लाखो सैनिक निर्माण करण्याच्या इच्छेने दिवसरात्र झटणाऱ्या अनेकांमध्ये अ‍ॅड. मीनल वाघ हे असे एक नाव आहे ज्या युवतींना मुख्यत्वे सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. पश्चिम महाराष्ट्रात मीडिया आणि पब्लिसिटी याच्या प्रमुख असणाऱ्या मीनलताई संपूर्ण भारतात विश्व हिंदू परिषदेमार्फत आर्मी सव्‍‌र्हिसेस आणि सेल्फ डिफेन्स याबाबतीत मे महिन्यामध्ये कार्यशाळा घेतात. यात त्या प्रामुख्याने आर्मीतील करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन सत्रे आयोजित करतात. तसेच त्यांनी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे पहिली मुलींची सैनिकी शाळा त्यांनी नाशिक येथे सुरू केली. वयाच्या ८ व्या वर्षांपासून दाखल झालेल्या या मुलींच्या मनात देशप्रेम जागृत करून त्यांना ‘एनसीसी’सारख्या मोठय़ा माध्यमांचा शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबरीने इतर सैनिकी परीक्षांसाठी कसा फायदा होईल याचे शिक्षण त्या देतात. ग्राऊंड सोल्जर्ससाठी त्या मुलींना तयार करतात. तसेच अनेक मुलींना त्यांनी वैद्यकीय शिक्षण देऊन सैनिकांसाठी लागणाऱ्या वैद्यकीय सेवांमध्ये भरती केले आहे. महाराष्ट्रात त्यांनी नगर, इचलकरंजी, सातारा, येवला, बारामती या आणि त्याचबरोबरीने अनेक शहरांमध्ये जाऊन मोठय़ा वक्त्यांना बोलावून मुलींसाठी व्याख्याने आयोजित केली आहेत. अशा प्रकारे त्या अजूनही मुलींना सैन्य क्षेत्राची माहिती व्हावी आणि त्यांना तिथे जाण्यासाठी योग्य ते मार्ग मिळावेत यासाठी सदैव कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा अनेक लहानमोठय़ा संस्था देशातील तरुणांमध्ये सैनिकांविषयी आत्मीयता निर्माण करण्याचे काम करत आहेत. करिअरच्या दृष्टीने सैनिक क्षेत्राचा विचार युवकांनी करावा यासाठी झटत आहेत.

भारतीय सैनिक जो शौर्य, निर्धार आणि निष्ठा यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे, भारतीय सैनिक जो असीम आकाशापासून ते अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवतो आहे, देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्यांचे रक्षण करतो आहे, दुश्मनाचा वार तो आपल्या निधडय़ा छातीवर अभिमानाने झेलतो आहे. असा ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा’, ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा’ हा भारतीय सैनिक! या ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हा सैनिक देशातील प्रत्येक तरुणाला समजावा, आपलासा वाटावा यासाठी अहोरात्र झटणाऱ्या, त्याला निव्वळ आपुलकी नाही तर स्वदेशासाठी बलिदानाची साथ करावी अशी शिकवण देणे हेच कर्तव्य मानणाऱ्या आणि ‘बलसागर भारत’ निर्माण करण्याची इच्छा असणाऱ्या अनेक वीरमातांना आणि संस्थांना मनापासून सलाम करावा असेच वाटते.